गडहिंग्लजमध्ये ‘बसर्गे’प्रकरणी विराट मोर्चा

By Admin | Updated: July 31, 2014 23:24 IST2014-07-31T23:15:46+5:302014-07-31T23:24:55+5:30

तरुणाईचा संताप : तपास सक्षम अधिकाऱ्याकडे सोपविण्याची मागणी; राज्यव्यापी आंदोलनाचा इशारा

Virat Morcha in 'Busyge' in Gadhinglj | गडहिंग्लजमध्ये ‘बसर्गे’प्रकरणी विराट मोर्चा

गडहिंग्लजमध्ये ‘बसर्गे’प्रकरणी विराट मोर्चा

गडहिंग्लज : जिल्हा पोलीसप्रमुखांनी आठ दिवसांची मुदत घेतली. बसर्गे प्रकरणाला १५ दिवस उलटले तरीही नराधमाला पकडण्यात पोलीस प्रशासन अपयशी ठरले. या प्रकरणाचा तपास काढून घेऊन जिल्ह्याबाहेरील सक्षम अधिकाऱ्याकडे सोपवावा. अन्यथा, याप्रश्नी राज्यव्यापी आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा राज्य महिला लोक आयोगाच्या कार्याध्यक्षा अ‍ॅड. वर्षा देशपांडे यांनी दिला.
बसर्गे प्रकरणाचा निषेध व नराधमाला पकडण्याच्या मागणीसाठी प्रांत कचेरीवर विराट मोर्चा काढण्यात आला. महिला आयोगाची गडहिंग्लज शाखा आणि महिला कृती समितीतर्फे हा मोर्चा गडहिंग्लजच्या इतिहासात लक्षवेधी ठरला.
लक्ष्मी मंदिरापासून मोर्चाला सुरुवात झाली. लक्ष्मी रोड, शिवाजी चौक, नेहरू चौक, वीरशैव बैठक, संकेश्वर रोड, कांबळे तिकटी, कडगाव रोड, चर्च रोड, आजरा रोड, दसरा चौक मार्गे मोर्चा प्रांत कचेरीवर आल्यानंतर सभा झाली.
यावेळी देशपांडे म्हणाल्या, राजर्षि शाहूंच्या व गृहमंत्र्यांच्या जिल्ह्यात आणि चंदगडसारख्या डोंगरी व दुर्गम प्रदेशात आणि सत्ताधारी राष्ट्रवादीच्या महिला आमदारांच्या मतदारसंघातील लाजिरवाण्या घटनेत पुरोगामी महाराष्ट्राचे गृहखाते अजूनही संवेदनशील दिसत नाही.
दिल्लीतील निर्भयाची, मुंबईतील फोटो जर्नालिस्ट तरुणीची व बसर्गेच्या तरुणीची अब्रू वेगळी आहे का? पीडित तरुणीलाच आरोपीसारखी वागणूक देऊन तिचा छळ आणि बलात्काऱ्याला संरक्षण देण्याची पोलिसांची भूमिका संशयास्पद वाटते. महिला संघटनांची मदत घेऊन या प्रकरणाचा छडा लावावा.
निषेध सभेत नगराध्यक्षा लक्ष्मी घुगरे, विरोधी पक्षनेत्या प्रा. स्वाती कोरी, अलका भोईटे, बाळेश नाईक, सुनील शिंत्रे, शिवाजीराव होडगे, दिग्विजय कुराडे, सरला आरबोळे, संजीवनी पाटील, स्मिता मुजूमदार, एकता शिंदे यांची भाषणे झाली. गणपतराव पाटोळे यांनी प्रास्ताविक केले. कॉ. उज्ज्वला दळवी यांनी आभार मानले.
मोर्चात उपनगराध्यक्ष कावेरी चौगुले, अ‍ॅड. शैला जाधव, प्राचार्य मंगलकुमार पाटील आदींसह विविध पक्ष-संघटना, महिला व तरुण मंडळे, बचत गटांचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांसह महाविद्यालयीन युवक-युवती मोठ्या संख्येने सहभागी झाल्या होत्या. (प्रतिनिधी)



तीन दिवसांत पीडितेची भेट घडवा..!
शासन व गृहखात्याकडे मागणी
पोलिसांच्या दबावामुळे पीडित तरुणी व तिच्या कुटुंबीयांना धोका निर्माण झाला आहे. तपासाचा भाग म्हणून सत्यापर्यंत जाण्यासाठी तीन दिवसांच्या आत गडहिंग्लजमध्ये महिलांसाठी काम करणाऱ्या ज्येष्ठ कार्यकर्त्यांची व तिची भेट घडवा, अन्यथा आंदोलनाबरोबरच न्यायालयीन लढाईही लढावी लागेल, असा इशारा राज्य महिला आयोगातर्फे पोलीस उपाधिक्षकांना दिलेल्या निवेदनातून दिला आहे. निवेदनावर, आयोगाच्या कार्याध्यक्षा अ‍ॅड. वर्षा देशपांडे, ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या रत्नमाला घाळी, कॉ. उज्ज्वला दळवी, प्रा. स्वाती कोरी, अरुणा शिंदे, सुनंदा गुंडे, शारदा अजळकर, प्रा. अनुराधा मगदूम, अ‍ॅड. एस. डी. पाटील व सुवर्णलता गोईलकर यांच्या स्वाक्षऱ्या आहेत. मुख्यमंत्री व गृहमंत्र्यांसह विशेष पोलीस महानिरीक्षक, जिल्हा पोलीस अधीक्षकांनाही हे निवेदन पाठविण्यात आले आहे.

मोर्चेकऱ्यांवर दबाव आणून हलकर्णी पोलीस ठाण्यावरील मोर्चा दडपला. तसाच प्रयत्न गडहिंग्लजमध्येही झाला. मोर्चा निघू नये यासाठी मोर्चाच्या आदल्यादिवशी सायंकाळपर्यंत मोर्चाची नोटीस देखील स्वीकारली नाही. रात्री उशिरापर्यंत महिला कृती समितीच्या पदाधिकाऱ्यांना पोलिसांनी केविलवाणी धडपड केली. दबाव तंत्राचा वापरही झाला. मात्र, रणरागिनींनी या प्रकरणातील संतप्त लोकभावना संघटित करून शासन व पोलिसांच्या डोळ्यात अंजन घातल्याचे या विराट मोर्चावरून स्पष्ट झाले.
तोंडावर पट्टी...हातात काळे झेंडे !
‘बसर्गे’प्रकरणाला दोन आठवडे उलटूनही तपासात अपयशी ठरलेल्या पोलिसांच्या निषेधासाठी व धिक्कारासाठी मुलींनी आपल्या तोंडावर काळी पट्टी, तर मुलांनी हातात काळे झेंडे घेतले होते. काही कार्यकर्त्यांनी डोक्याला काळी टोपी घातली होती. ऐन पावसाळ्यात देखील सुमारे पाच हजारांहून अधिक मुला-मुलींचा सहभाग असणारा हा मोर्चा गडहिंग्लजच्या इतिहासात पहिल्यांदाच निघाल्यामुळे या प्रकरणातील जनसंताप अधोरेखित झाला.

सहभागी महाविद्यालये, संस्था
शिवराज महाविद्यालय, डॉ. घाळी कॉलेज, ओंकार कॉलेज, डॉ. ए. डी. शिंदे पॉलिटेक्निक, साधना ज्युनिअर कॉलेज आॅफ सायन्स अँड व्होकेशनल, रावसाहेबअण्णा कित्तूरकर ज्युनिअर कॉलेज अँड व्होकेशनल, गडहिंग्लज ज्युनिअर कॉलेज, राजर्षि शाहू ज्युनिअर कॉलेज, एस. एन. कॉलेज, मूकबधीर विद्यालय, एम. आर. कॉलेज, काँगे्रस, राष्ट्रवादी, शिवसेना, भाजप, जनता दल, जनसुराज्य, भारिप बहुजन महासंघ, लिंगायत धर्म सभा, मराठा मंडळ, जिजाऊ ब्रिगेड, राष्ट्र सेवा दल, अंनिस, गडहिंग्लज तालुका शैक्षणिक व्यासपीठ, तालुका मुख्याध्यापक व माध्यमिक शिक्षक संघ, तंटामुक्त समिती गिजवणे, आदी संस्था आणि संघटनांनी मोर्चात सहभाग घेतला होता.

Web Title: Virat Morcha in 'Busyge' in Gadhinglj

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.