व्हायरल सर्दी-तापाचे संकट; रूग्णालयांत वाढली मुलांची गर्दी !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 9, 2021 04:31 IST2021-09-09T04:31:20+5:302021-09-09T04:31:20+5:30

कोल्हापूर : सध्या जिल्ह्यातील कोरोना संकट कमी झाले असले तरी व्हायरल सर्दी, तापाचे संकट घोंघावत आहे. याचा सर्वाधिक परिणाम ...

Viral cold-fever crisis; Crowds of children increase in hospitals! | व्हायरल सर्दी-तापाचे संकट; रूग्णालयांत वाढली मुलांची गर्दी !

व्हायरल सर्दी-तापाचे संकट; रूग्णालयांत वाढली मुलांची गर्दी !

कोल्हापूर : सध्या जिल्ह्यातील कोरोना संकट कमी झाले असले तरी व्हायरल सर्दी, तापाचे संकट घोंघावत आहे. याचा सर्वाधिक परिणाम बालकांवर होत असून, त्यामुळे रुग्णालयांमध्ये मुलांची गर्दी वाढली आहे. वातावरणात सातत्याने होत असलेले बदल, थंड हवामान, पाऊस, कधी कडक ऊन यामुळे या बाबी घडत आहेत, त्यामुळे बालकांची रोगप्रतिकारशक्ती वाढवणे गरजेचे आहे.

दुसऱ्या लाटेत तीन महिने जिल्ह्यात ठाण मांडलेल्या कोरोनाचे संकट आता कमी झाले आहे. तिसरी लाट लहान मुलांसाठी धोक्याची मानली जात असली तरी त्या आधीपासूनच बालकांना व्हायरल इन्फेक्शनचा त्रास मोठ्या प्रमाणात होत आहे. जुलै महिन्यात महापूर येऊन गेल्यानंतर पाऊसच पडलेला नाही. त्यानंतर पुढे काही दिवस तर कडकडीत ऊन पडत होते. आता गेल्या दोन-तीन दिवसांपासून पावसाने पुन्हा जोर धरला आहे. त्यामुळे वातावरणात गारवा आहे. श्रावणात तर सगळा ऊन-पावसाचा खेळ सुरू होता. याचा परिणाम बालकांच्या आरोग्यावर होत आहे. कधी कडक ऊन, कधी थंडी, पाऊस यामुळे बालकांना सर्दी, ताप, खोकला होत आहे. शिवाय श्वसनाचे आजार निर्माण होत आहेत.

---

कोरोना नाही, डेंग्यूचेही संकट

जिल्ह्यात सध्या डेंग्यूची साथ मोठ्या प्रमाणात आहे. एकाच कुटुंबातील सर्व सदस्य डेंग्यूने आजारी आहेत. त्यामुळे प्राथमिक उपचारानंतरही आजार कमी झाला नाही तर डेंग्यू, न्युमोनियासाठीच्या तपासण्या केल्या जातात.

---

ही घ्या काळजी

- थंडी, पावसाळ्यात मुलांना स्वेटर, टोपी, हात-पाय मोजे यासारखे गरम कपडे घालून ठेवा.

- न्युमोनियाची नवीन लस आली ती आवर्जून द्या.

- रोगप्रतिकारशक्ती वाढविणाऱ्या पालेभाज्या, कडधान्य, डाळी, उसळ अशा पदार्थांचा जेवणात समावेश करा.

----

लसीकरण वेळेत होणे गरजेचे

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शासनाने नवजात बालकांसाठी १२ जुलैपासून न्युमोनियावर नवीन लस आणली आहे. नवजात बालकांना अन्य लसीच्या डोसबरोबरच ही लसदेखील द्या. शिवाय त्यांचे पाच वर्षांपर्यंतचे ठरलेले लसीचे डोस नियमित दिले तर अनेक रोगांपासून बालकांचा बचाव होतो. ते वेळेवर देणे गरजेचे आहे.

--

लहान मुलांमध्ये रोगप्रतिकारशक्ती कमी असते, त्यामुळे वातावरणातील बदलांचा त्यांच्यावर लगेच परिणाम होतो. त्यामुळे सर्दी, ताप, खोकला, न्युमोनिया आणि श्वसनाचे आजार होतात. त्यापासून बचावासाठी ५ वर्षांपर्यंतचे डोस नियमित दिले पाहिजेत. तसेच नव्याने आलेली न्युमोनियाची लस आवर्जून द्यावी.

- डॉ. एल. एस. पाटील (बालरोगतज्ज्ञ)

--

फोटो ०८०९२०२१-कोल-बालरुग्ण ०१,०२

ओळ : वातावरणातील बदलांमुळे बालकांचे आजारी पडण्याचे प्रमाण वाढले आहे, त्यामुळे कोल्हापुरातील शासकीय रुग्णालयांमध्ये बालकांची गर्दी झाली आहे. (छाया : आदित्य वेल्हाळ)

---

Web Title: Viral cold-fever crisis; Crowds of children increase in hospitals!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.