‘व्हीआयपी चषक’ ‘अण्णा मोगणे’कडे
By Admin | Updated: April 20, 2015 00:22 IST2015-04-19T23:36:23+5:302015-04-20T00:22:56+5:30
युवराज युवलूसकर, विशाल कल्याणकर, विशाल मोरे यांनी उत्कृष्ट फलंदाजी करत लक्षणीय कामगिरी

‘व्हीआयपी चषक’ ‘अण्णा मोगणे’कडे
कोल्हापूर : कोल्हापूरच्या अण्णा मोगणे सहारा संघाने मुंबईच्या राष्ट्रीय केमिकल फर्टिलायझर (आरसीएफ) संघावर २० धावांनी मात करत व्हीआयपी चषक क्रिकेट स्पर्धेचे विजेतेपद पटकावले. सामन्यात मोगणे संघाच्या युवराज युवलूसकर, विशाल कल्याणकर, विशाल मोरे यांनी उत्कृष्ट फलंदाजी करत लक्षणीय कामगिरी केली. शास्त्रीनगर मैदान येथे रविवारी अण्णा मोगणे सहारा व आरसीएफ संघात अंतिम सामना झाला. नाणेफेक जिंकत ‘आरसीएफ’ संघाने प्रथम गोलंदाजी घेत प्रथम फलंदाजीस मोगणे संघास पाचारण केले. मोगणे संघाकडून ४० षटकांत सर्वबाद २९७ धावा करण्यात आल्या. त्यात युवराज युवलूसकर ९२, विशाल कल्याणकर ७०, विशांत मोरेने ७०, तर सूरज शिंदे याने नाबाद २२ धावा केल्या. ‘आरसीएफ’कडून अरसलान शहा, संतोष उपाध्ये यांनी प्रत्येकी दोन बळी घेतले, तर आदिनाथ गायकवाड, तरंजितसिंग धिल्लॉन यांनी प्रत्येकी एक बळी घेतला.
उत्तरादाखल खेळताना फलंदाजीस आलेल्या ‘आरसीएफ’ संघाकडून सुनील चावरीने ९०, संतोष उपाध्येने ४७ धावा करत दमदार सुरुवात केली. त्यास शिवम दुबे यांनी चांगली साथ दिली. मात्र, अण्णा मोगणे संघाच्या भरत पुरोहित, वैभव चौगुले, अमोल निलुगडे, विकास जाधव यांच्या दमदार गोलंदाजीसमोर त्यांचा टिकाव लागला नाही. भरत पुरोहितने ‘आरसीएफ’चे चार फलंदाज टिपत विजय दृष्टिक्षेपात आणला. ‘आरसीएफ’चा संपूर्ण संघ ४० षटकांत सर्वबाद २७७ धावांतच गुंडाळत अण्णा मोगणे संघाने विजयावर आपली मोहोर उठवली.
स्पर्धेचा बक्षीस समारंभ आंतरराष्ट्रीय बुद्धिबळपटू ऋचा पुजारी व कपिल पाठारे यांच्या हस्ते झाले. यावेळी जिल्हा क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष बाळ पाटणकर, माजी नगरसेवक काका पाटील, नगरसेवक राजू हुंबे, उमेश माने, राजू पठाण आदी उपस्थित होते.