विनय कोरेंवर भाजप मेहरबान

By Admin | Updated: July 11, 2015 01:37 IST2015-07-11T00:29:35+5:302015-07-11T01:37:53+5:30

वारणा दूध संघास ११.५१ कोटी : गडकरी यांच्याशी संबंधाचा लाभ

Vinay Koranvar BJP BJP | विनय कोरेंवर भाजप मेहरबान

विनय कोरेंवर भाजप मेहरबान

कोल्हापूर : जनसुराज्य शक्ती पक्षाचे नेते, माजी आमदार विनय कोरे यांच्यावर राज्यातील भाजप-शिवसेना युतीचे सरकार चांगलेच मेहरबान असल्याचे चित्र सध्या दिसत आहे. कोरे यांच्या नेतृत्वाखालील वारणा दूध संघास गडहिंग्लजला सॅटेलाईट डेअरी प्रकल्प उभारण्यासाठी शासनाने तब्बल ११ कोटी ५१ लाख रुपयांची मदत केली आहे. कृषी पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय विभागाने शुक्रवारी या प्रकल्पास प्रशासकीय मंजुरी देत असल्याचा आदेश काढला. कोरे यांच्या पन्हाळा रोडवरील वाघबीळजवळच्या केदारलिंग सहकारी सूतगिरणीस सरकारने काही दिवसांपूर्वीच दहा कोटी रुपयांची मदत केली आहे.
कोरे यांचे भाजप नेते व केंद्रीय रस्ते विकासमंत्री नितीन गडकरी व भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांच्याशीही चांगले संबंध आहेत. त्यामुळे त्यांच्या संस्थांना ही मदत केली जात असल्याची चर्चा आहे. जिल्ह्याच्या राजकारणात कोरे यांचा राष्ट्रवादीशी घरोबा आहे. गोकुळ दूध संघात ते काँग्रेसच्या विरोधात होते. जिल्हा बँक व आता बाजार समितीत त्यांची राष्ट्रवादीशी आघाडी आहे. राष्ट्रवादी काँग्रेस व भाजप यांच्यात सध्या जिल्ह्याच्या राजकारणात टोकाचा संघर्ष सुरू आहे व राष्ट्रवादीचे मित्र असलेल्या कोरे यांना भाजपचे सरकार सढळ हाताने मदत करीत आहे, असे चित्र यातून समोर आले आहे.
सॅटेलाईट डेअरी हा मूळ प्रकल्प २३ कोटी तीन लाख रुपयांचा आहे. त्यासाठी गडहिंग्लज औद्योगिक वसाहतीत पाच एकर जागा घेतली आहे. राष्ट्रीय कृषी विकास योजनेंतर्गत १८ जून २०१५ रोजीच्या राज्यस्तरीय प्रकल्प मंजुरी समितीच्या बैठकीत हा प्रस्ताव सादर करण्यात आला. या समितीने त्याच बैठकीत राष्ट्रीय कृषी विकास योजनेतून ५० टक्के हिस्सा व लाभार्थ्यांचा तेवढाच हिस्सा या अटीवर या प्रकल्पास मान्यता दिली. त्यानुसार २३ कोटींपैकी राज्य शासन व दूध संघ प्रत्येकी ११ कोटी ५१ लाख ९५ हजार एवढा हिस्सा घालतील. हा प्रकल्प दोन वर्षांत पूर्ण करणे बंधनकारक आहे. मंजूर प्रकल्प खर्चापेक्षा जास्त होणारा खर्च संघाने स्वत: करावयाचा आहे. संघाने सादर केलेल्या प्रकल्प अहवालानुसार त्याचे काम सुरू आहे की नाही, हे पाहण्यासाठी शासनाने प्रकल्प अंमलबजावणी समितीची स्थापना केली आहे. जिल्हा दुग्धविकास अधिकारी या समितीचे अध्यक्ष आहेत.

बागडे यांना १० कोटी २६ लाख
औरंगाबाद दूध संघाच्या मुख्य डेअरीचे विस्तारीकरण व अत्याधुनिकीकरण करण्यासाठी राज्य शासनाने १० कोटी २६ लाख रुपये निधी मंजूर केला आहे. भाजप नेते हरिभाऊ बागडे हे या दूध संघाचे अध्यक्ष आहेत.

Web Title: Vinay Koranvar BJP BJP

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.