कालव्याच्या पाण्यासाठी सीमाभागातील गावे तहानलेली
By Admin | Updated: May 7, 2015 00:19 IST2015-05-06T22:54:01+5:302015-05-07T00:19:34+5:30
शेतकऱ्यांतून संताप : निकृष्ट दर्जाचे काम; सहा वर्षांपासून एकदाही पाणी नाही, सरकारने कोट्यवधी रुपये खर्चूनही उपयोग नाही

कालव्याच्या पाण्यासाठी सीमाभागातील गावे तहानलेली
राजेंद्र हजारे - निपाणी --सीमाभागातील शेतकऱ्यांना पाटबंधारे खात्यातर्फे कालव्यांद्वारे पाणी देण्याची योजना सरकारने राबविली. निढोरी कालव्यातून येणाऱ्या पाण्यामुळे ४,५४१ हेक्टर जमीन ओलिताखाली येणार होती. त्यासाठी बेनाडी, शिवापूरवाडी, आप्पाचीवाडी, सौंदलगा, कुर्ली गावांमध्ये २००८साली कालव्यांचे काम पूर्ण झाले. परंतु, सहा वर्षांपासून एकदाही कालव्यात पाणी आले नाही. बांधकाम निकृष्ट झाल्यानेच कालव्याच्या पाण्यासाठी सीमाभागातील गावे आसुसलेली आहेत.
कागल तालुक्यातील चिखली बंधाऱ्यातून वेदगंगा नदी तिरावरील हदनाळ, म्हाकवे, आप्पाचीवाडी, भाट नांगनूर, कुर्ली, सौंदलगा, आडी, बेनाडी, कन्नूरपर्यंत २५ किलोमीटर अंतराचा निढोरी शाखा कालवा आहे. त्यासाठी चिकोडी तालुक्यातील २१ किलोमीटर, तर कागल तालुक्यातील म्हाकवे गावातून ४ किलोमीटरचा कालवा तयार झाला. त्याची खोली आठ फुटांवर ठेवण्यात आली असून, गरजेनुसार त्याची उंची कमी-जास्त करण्यात आली आहे. कालव्यासाठी जमिनी दिलेल्या शेतकऱ्यांना एकरी एक लाख रुपये देण्यात येणार होते, पण भरपाईची रक्कम अजून बऱ्याच शेतकऱ्यांना मिळालेली नाही.
मुख्य कालव्याबरोबर १२ उपकालव्यांची निर्मिती करण्यात आली आहे. वेदगंगा नदीला जोडणारे उपकालवे निर्माण केल्याने अतिरिक्त पाणी वाया न जाता नदीद्वारे पुढील शेतकऱ्यांना मिळण्याची योजनासुद्धा आखली आहे. हदनाळ येथे १.२६ कि.मी., म्हाकवे ४ कि.मी. भाटनांगनूर-आप्पाचीवाडी ६, कुर्ली ४, कुर्ली-सौंदलगा ३, सौंदलगा ५, आडी आणि बेनाडी प्रत्येकी ३ कि.मी., बेनाडी ते शिवापूरवाडीपर्यंत १३ कि.मी.चा उपकालवा तयार आहे. अनेक ठिकाणी कालव्याला भगदाड पडले आहे, तर काही ठिकाणी कालव्यांच्या भिंती कोसळल्या आहेत. सहा वर्षांतून एकदाही पाणी न आल्याने पिचिंगमधून झाडे-झुडपे उगवली आहेत. सरकारने कोट्यवधी रुपये खर्चूनही कालव्यांच्या पाण्यापासून शेतकरी अलिप्तच आहेत. त्यामुळे शासनाचा निधी पूर्णपणे वाया गेला आहे. यापूर्वी निढोरी कालव्यातून म्हाकवेपर्यंत पाणी पोहोचले होते, पण त्याचा वेग आणि दाब कमी होत गेल्याने कुर्ली, सौंदलगापर्यंतच पाणी आले. मात्र, बेनाडी, आडी, कन्नूर भागापर्यंत ते पाणीच कधीच पोहोचले नाही. परिणामी, माळभागातील शेतकऱ्यांतून संताप व्यक्त होत आहे.
कालव्यांच्या निर्मितीनंतर दोनवेळा पाण्याची चाचणी घेतली; पण पाणी पुढे सरकण्यासाठी योग्य त्या उपाययोजना झाल्या नाहीत. केवळ पाटबंधारे खात्याच्या दुर्लक्षामुळेच कालवे ओस पडले आहेत.
- रायगोंडा पाटील, शेतकरी, बेनाडी.