ग्रामस्थांनी ‘सीईपीटी’चे काम बंद पाडले
By Admin | Updated: September 2, 2014 00:02 IST2014-09-01T21:29:07+5:302014-09-02T00:02:53+5:30
पोकलॅनच्या मोडतोडीचा प्रयत्न : प्रदूषित पाण्याचा गंभीर विषय

ग्रामस्थांनी ‘सीईपीटी’चे काम बंद पाडले
हुपरी : हुपरी पंचतारांकित औद्योगिक वसाहतीतून बाहेर पडणाऱ्या प्रदूषित पाण्याला वैतागलेल्या तळंदगे ग्रामपंचायतीने ‘सीईपीटी’ प्रकल्पाच्या तरसरीबरोबर विस्तारीकरणाचे सुरू असलेले काम बंद पाडले.
विस्तारीकरणाचे ठेकेदार आणि सरपंच मंगल वाघमोडे, उपसरपंच राजू हवालदार, तसेच ग्रामपंचायत सदस्यांमध्ये मोठ्या प्रमाणात वादावादी झाली. यावेळी पोकलॅन मशीनची मोडतोड करण्याचा प्रयत्न झाल्याने पोकलॅन चालकाने घाबरून मशीनसह पळ काढला.
प्रदूषित पाण्याची योग्य पद्धतीने विल्हेवाट लावून तळंदगे ग्रामस्थांची डोकेदुखी थांबल्याशिवाय तरसरी प्रकल्पाचे विस्तारीकरण आम्ही होऊ देणार नाही, असा इशारा यावेळी ग्रामपंचायतीच्यावतीने देण्यात आला.
याबाबत घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी, पंचतारांकित औद्योगिक वसाहतीच्या ‘सीईपीटी’ प्रकल्पातून कोणत्याही प्रकारची प्रक्रिया न करता प्रदूषित पाणी तळंदगे गावाच्या ओढ्यात सोडण्यात येते. परिणामी, या पाण्यामुळे गावातील विहिरी, बोअरवेल, ओढे यांच्यातील पाणीही प्रदूषित होऊन ग्रामस्थांबरोबरच जनावरांचेही आरोग्य धोक्यात आले आहे.
ओढा परिसरातील जमीनही नापीक होण्याचा धोका निर्माण झाला आहे, असा तळंदगे, इंगळी ग्रामस्थांचा आरोप आहे. याप्रश्नी वेळोवेळी रस्त्यावर उतरून आंदोलनेही करण्यात आली आहेत. लोकप्रतिनिधींचे पाठबळ आंदोलनकर्त्यांना मिळत नसल्याने ग्रामस्थांच्या आक्रोशाला औद्योगिक विकास महामंडळाचे अधिकारी व उद्योगपती भीक घालत नाहीत. गावच्या ओढ्यात प्रदूषित पाण्याची मोठ्या प्रमाणात दिवसेंदिवस वाढच होत आहे.
त्यामुळे ग्रामस्थ अक्षरश: वैतागलेले आहेत. ‘सीईपीटी’ प्रकल्पालगत असणाऱ्या सुमारे ४३ एकर शासकीय गायरानामध्ये सीईपीटी प्रकल्पातून बाहेर पडणाऱ्या प्रदूषित पाण्यावर ‘रिसायकल’ पद्धतीने प्रक्रिया करणाऱ्या ‘तरसरी’ विस्तारीकरणाच्या कामास पोकलॅन मशीनद्वारे सुरुवात केली होती.
याबाबतची माहिती समजताच सरपंच मंगल वाघमोडे, उपसरपंच राजू हवालदार यांच्यासह सर्व सदस्य, कर्मचारी प्रकल्पस्थळी आले व त्यांनी काम बंद पाडण्याचा प्रयत्न केला. यावेळी ठेकेदारांचे कर्मचारी व ग्रामस्थांमध्ये जोरदार वादावादी झाली. संतप्त ग्रामस्थांनी पोकलॅन मशीनची मोडतोड करण्याचा प्रयत्न करताच पोकलॅन चालकाने मशीनसह पळ काढला.
विस्तारीकरणास विरोध राहणारच : वाघमोडे
याबाबत सरपंच वाघमोडे व उपसरपंच हवालदार म्हणाले, प्रदूषित पाण्यावर कोणतीही प्रक्रिया न करता प्रदूषित पाणी गावाच्या ओढ्यात सोडण्यात येते. त्यामुळे संपूर्ण गावाची डोकेदुखी होऊन बसली आहे. त्यावर कायमस्वरूपी मार्ग काढावा, अशी मागणी होऊनही या मागणीकडे दुर्लक्ष करून ग्रामपंचायतीला कोणत्याही प्रकारची माहिती किंवा पूर्व परवानगी न घेता विस्तारीकरणाच्या कामास बेकायदेशीररीत्या सुरुवात केली आहे. या विस्तारीकरणाला आमचा विरोध राहणार आहे.