दत्तवाडसह परिसरात ग्रामस्थ धास्तावले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 06:59 IST2021-02-05T06:59:38+5:302021-02-05T06:59:38+5:30
* प्रशासनाने बंदोबस्त करण्याची मागणी दत्तवाड : गावात भटकी कुत्री, शेतात बिबट्यासदृश प्राणी, तर दूधगंगा नदीत मगरींचा वावर... यामुळे ...

दत्तवाडसह परिसरात ग्रामस्थ धास्तावले
* प्रशासनाने बंदोबस्त करण्याची मागणी
दत्तवाड : गावात भटकी कुत्री, शेतात बिबट्यासदृश प्राणी, तर दूधगंगा नदीत मगरींचा वावर... यामुळे दत्तवाड परिसरातील शेतकरी, ग्रामस्थांत भीतीचे वातावरण पसरले आहे. प्रशासनाने याचा बंदोबस्त करावा, अशी मागणी होत आहे.
दत्तवाडसह परिसरातील घोसरवाड, टाकळीवाडी, नवे दानवाड गावात भटक्या कुत्र्यांनी उच्छाद मांडला आहे. कुत्री ग्रामस्थांवर हल्ले करून त्यांना चावा घेत आहेत. यापूर्वी अशा घटना घोसरवाड, दत्तवाड येथे वारंवार घडल्या आहेत. अपराध मळा येथे यल्लव्वा वडर हिच्यावर अज्ञात प्राण्याने हल्ला करून तिला ठार केले आहे, तर खराडे फार्म हाऊस रेळेकर रोपवाटिका तुळशी धरण वसाहत येथे जंगली प्राण्याचा वावर आढळला आहे. गावातील विविध चौकात भटक्या कुत्र्यांचा वावर मोठ्या प्रमाणात वाढला आहे. पशुसंवर्धन खात्याने मध्यंतरी सात कुत्र्यांना पकडून त्यांची शस्त्रक्रिया केली आहे. मात्र ती कुत्री परत गावात सोडल्याने ग्रामस्थांत भीतीचे वातावरण आहे. तसेच घोसरवाड येथे लहान मुलांवर कुत्र्यांनी हल्ला केला आहे, तर दुसरीकडे दूधगंगा नदीपात्रात मगर सर्रास दिसत असून पाणी पिणाऱ्या बकरीवर तसेच पाळीव जनावरे यांच्यावर मगरीने हल्ला केल्याच्या घटना घडल्या आहेत. नदीकाठी गवत कापणीसाठी, पाणी पिण्यासाठी, मोटरी सुरू करण्यासाठी शेतकऱ्यांना जाताना भीती वाटत आहे. तसेच आठ दिवसात शेतात कामाला जाताना शेतकरी व शेतमजूर महिला यांना बिबट्यासदृश प्राण्याची भीती वाटत आहे. घरातील लहान मुलांना घराबाहेर सोडण्याचे पालकांनी बंद केले आहे. दत्तवाडसह परिसरातील गावात वन्यप्राणी व भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त करावा, ग्रामस्थांच्या मनातील भीती घालवावी यासाठी प्रशासनाने तातडीने उपाययोजना कराव्यात, अशी मागणी होत आहे.
चौकट -
वन्यप्राण्याचा अद्यापही शोध नाही
आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर यांनी दत्तवाडला भेट देऊन वन विभागाला सूचना दिल्या. मात्र फक्त पाहणी करूनच हा विभाग परत फिरला. हल्ला करणारा तो प्राणी कोण होता, याचा अद्याप तपास लागलेला नाही.