आळते येथे ग्रामस्थांचा तपासणी पथकावर हल्ला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 23, 2021 04:25 IST2021-05-23T04:25:11+5:302021-05-23T04:25:11+5:30

हातकणंगले : आळते ( ता. हातकणंगले ) येथील हॉस्पिटलबद्दल ...

Villagers attack investigation team at Aalte | आळते येथे ग्रामस्थांचा तपासणी पथकावर हल्ला

आळते येथे ग्रामस्थांचा तपासणी पथकावर हल्ला

हातकणंगले : आळते ( ता. हातकणंगले ) येथील हॉस्पिटलबद्दल जिल्हाधिकाऱ्यांकडे आलेल्या तक्रारीनुसार तहसीलदार हातकणंगले यांच्या आदेशाने खासगी हॉस्पिटल आणि मेडिकलच्या तपासणीसाठी गेलेल्या तालुका आरोग्य अधिकारी डॉ. सुहास कोरे व त्यांच्या पथकावर ग्रामस्थांनी हल्लाबोल करत अर्वाच्च भाषेत शिवीगाळ केली. संतप्त ग्रामस्थांच्या आक्रमक पवित्र्याने आरोग्य अधिकाऱ्यांच्या पथकालाने कारवाईविनाच तेथून माघारी परतावे लागले. घटनेमुळे गावात तणावपूर्ण शांतता असून, हातकणंगले पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत परिस्थिती नियंत्रणात आणली.

आळते येथील डॉ. कोळाज यांच्याबाबत जिल्हाधिकांऱ्याकडे तक्रार झाली होती. त्या अनुषंगाने तहसीलदारांच्या आदेशानुसार हातकणंगले पं.स. वैद्यकीय अधिकारी डॉ. सुहास कोरे व त्यांचे पथक शनिवारी आळते येथे खासगी हॉस्पिटल व मेडिकल स्टोअर्सच्या तपासणीसाठी दोन सरकारी गाड्यांच्या ताफ्यासह दाखल झाले होते. मेडिकल स्टोअर्समध्ये कोणकोणती औषधे ठेवली जातात, याची विचारणा करून कोविडची लक्षणे असलेल्या रुग्णांच्या औषधांची डॉक्टरची चिठ्ठी आल्यास प्रथमतः ती आमच्या मोबाईलवर पाठवायची सूचना देऊन पथक कोळाज डॉक्टरांच्या ओपीडीमध्ये तपासणीसाठी गेले.

पथकाची तपासणी सुरू असताना अचानकपणे ग्रामस्थ मोठ्या संख्येने हॉस्पिटलमध्ये व बाहेर जमा झाले. पथक कारवाई करणार हे समजताच ग्रामस्थ आक्रमक होते. पथकातील अधिकाऱ्यांना शिवीगाळ केली तसेच काही ग्रामस्थ डॉ. कोरे यांच्या अंगावर धावून गेले. एक ग्रामस्थ पथकाच्या गाडीच्या पुढे झोपून आत्महत्या करणार असे ओरडू लागला. संतप्त ग्रामस्थ व डॉक्टर यांच्यामध्ये बराच वेळ वादावादी झाली. अखेर पोलीस पाटील रियाज मुजावर व ग्रामपंचायतीचे पदाधिकारी यांनी समझोत्याची भूमिका घेत वादावर पडदा टाकला. डॉ. कोरे यांच्या पथकाने ग्रामस्थांच्या गर्दीतून सुटका करून घेत तेथून परतले.

तालुका आरोग्य आधिकारी डॉ. सुहास कोरे यांच्याशी संपर्क साधला असता ग्रामस्थांचा गैरसमज झाला होता. सदरची भेट ही नियमित तपासणीचा भाग आहे. घडलेल्या प्रकारामध्ये जमाव व ग्रामस्थांची आक्रमक मानसिकता होती. सध्याच्या परिस्थितीत आपल्याला कोविडविरुद्ध लढायचे आहे, असे त्यांनी सांगितले.

वरिष्ठांकडे दाखल झालेल्या तक्रारीची दखल घेणे हे शासकीय यंत्रणेचे काम आहे. आळते गावामध्ये वैद्यकीय पथकाच्या आडवे येणे. त्यांच्या कामात अडथळा निर्माण करणे हा प्रकार गैरसमजातून झाला आहे. शासकीय कामात अडथळा केल्यास गुन्हे दाखल करण्याची ताकीद उपस्थित ग्रामस्थांना देण्यात आली आहे.

प्रदीप उबाळे

तहसिलदार, हातकणंगले

Web Title: Villagers attack investigation team at Aalte

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.