कोरोनाच्या वाढत्या प्रादुभार्वामुळे गावांच्या वेशी झाल्या बंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 27, 2021 04:24 IST2021-04-27T04:24:34+5:302021-04-27T04:24:34+5:30
सदाशिव मोरे आजरा : तालुक्यात १ एप्रिल २०२१ पासून ९५ पैकी ५२ गावे कोरोनाबाधित झाली आहेत. तर ९ गावातील ...

कोरोनाच्या वाढत्या प्रादुभार्वामुळे गावांच्या वेशी झाल्या बंद
सदाशिव मोरे
आजरा : तालुक्यात १ एप्रिल २०२१ पासून ९५ पैकी ५२ गावे कोरोनाबाधित झाली आहेत. तर ९ गावातील ११ जणांचा मृत्यू झाला आहे. तालुक्याच्या ग्रामीण भागात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढतच आहे. युवकांच्या सहभागाने गावातील सर्व व्यवहार व कार्यक्रम बंद झाले आहेत. कोरोनाला रोखण्यासाठी गावाच्या वेशीही बंद झाल्या आहेत.
गेले महिनाभरापासून कोरोनाचा प्रादुर्भाव तालुक्यात वाढत चालला आहे. गेल्या आठ दिवसात कोरोनाचा विस्फोट झाला आहे. तालुक्यात आजपर्यंत ३९० व्यक्ती कोरोनाबाधित आहेत. तर आज ३०१ रुग्ण सक्रिय आहेत.
११ लोकांचा मृत्यू झाला आहे.
लाटगाव, मुमेवाडी, आजरा, उत्तूर, महागोंड, भादवण, मडिलगे, कानोली, पोश्रातवाडी, सुळे या गावांमध्ये दहापेक्षा जास्त कोरोनाबाधित रुग्ण सापडले आहेत. त्यामुळे या गावांमध्ये भीतीचे वातावरण आहे.
कोरोनाला रोखण्यासाठी गावागावातील तरुणाई पुढे आली आहे. गावाच्या वेशी बंद केले आहेत. तर गावातील दुकाने, दूध संस्था यासह सर्व व्यवहार बंद करून कोरोनाला रोखण्याचा प्रयत्न केला जात आहे. बाहेरच्या व्यक्तींना गावात प्रवेश दिला जात नाही व गावातून बाहेरही कोणाला सोडले जात नाही.
गावात सर्व व्यवहार बंद असल्यामुळे दिवसभर स्मशान शांतता पसरलेली असते. कोरोनाबाधित रुग्णांना घरांसह शाळांमध्ये क्वॉरंटाईन करून ठेवले आहे. त्यांना योग्य आहार व औषधे देण्याचे काम तरुण मंडळीकडून केले जात आहे. सध्या कोरोनाबाधित रुग्णांचा तरुणाई हाच एकमेव आधार बनली आहे.
कोरोनामुळे शाळा-महाविद्यालये बंद असून ऑनलाइन अभ्यासक्रम सुरू झाला आहे. एसटी सेवा आठ दिवसांपासून बंद असून बसस्थानकावर शुकशुकाट आहे कोरोनाचा चालू वर्षाच्या पर्यटनावरही परिणाम झाला आहे. गोव्यासह कोकणात जाणारे पर्यटक थांबले आहेत. गवसे येथील आंतरराज्य सीमेवर पोलिसांकडून तपासणी नाक्यावर तपासणी केली जात आहे. याठिकाणी नागरिकांकडे पास आहे का, तसेच मास्के घातले आहे की नाही याची पाहणी करूनच सोडले जात आहे.
-------------------------
* कोरोनाने मृत्यू झालेली गावे
लाटगाव, मुमेवाडी, उत्तूर, महागोंड, भादवण, मडिलगे, खेडे, कानोली व पोश्रातवाडी. -------------------------
* आजरा तालुक्यातील ९५ पैकी ५२ गावे कोरोनाबाधित तर ४३ गावांमध्ये कोरोनाचा शिरकाव झालेला नाही.
-------------------------
* तालुक्यात ३९० पैकी ३०१ रुग्ण कोरोनाचे सक्रिय, ११ जणांचा मृत्यू तर आहेत तर ७० जणांना उपचारानंतर घरी पाठविले आहे.
------------------------
फोटो ओळी : मडिलगे (ता. आजरा) येथील बंद केलेला प्रवेशद्वार.
क्रमांक : २६०४२०२१-गड-०५