जागा रस्त्यात जाणार म्हणून गाव जगापासून दूर
By Admin | Updated: April 23, 2015 00:56 IST2015-04-22T21:37:20+5:302015-04-23T00:56:46+5:30
जावळी तालुका : ग्रामस्थ आंदोलनाच्या तयारीत; चालू काम बंद केले

जागा रस्त्यात जाणार म्हणून गाव जगापासून दूर
पाचगणी : स्वातंत्र्य मिळून साठ वर्षे होऊनही जावळी तालुक्यातील सनासाळी (रुईघर) ही वाडी आजही दळणवळणाच्या रस्त्यापासून दूर आहे. काही लोकप्रतिनिधींनी लक्ष घालून या रस्त्यासाठी मार्ग काढला. कामाचा शुभांरभही केला; पंरतु काहींनी आपली जागा रस्त्यात जाणार म्हणून या कामात खो घालून सुरू काम बंद पाडले आहे. त्यामळे येथील ग्रामस्थ संतापले असून, आंदोलनाच्या पवित्र्यात आहेत.
रुईघर, ता. जावळी गावच्या पश्चिमेला व भिलार डोंगराच्या पायथ्याशी २५ ते ३० कुटुंबांची सनासाळी ही वाडी आहे. सुमारे १२५ वस्तींची ही वाडी आजही आदिवासींप्रमाणेच जीवन जगत आहे. या वाडीतून पाचगणीला जाण्यासाठी पायी डोंगर चढून गणेशपेठला यावे लागते. तर शाळकरी मुलांना बेलोशी, शिंदेवाडी, दापवडी अथवा पाचगणीला जाण्यासाठी रुईघर गावातून पायवाटेने जावे लागते. त्यामुळे पावसाळा व उन्हाळ्यात मुले घरी येईपर्यंत पालकांच्या मनात काळजीची पाल चुकचुकते. आजारी व्यक्तीला डॉक्टरकडे नेताना डालातून न्यावे लागते. त्यामळे ही वाडी रस्त्याअभावी मोठ्या समस्यांना सामोरी जात आहे.
शासनाने पाणंद रस्त्याचे पुनर्जीवन करण्याकरिता खेडोपडी व वाडी-वस्तीतील लोकांना प्रोत्साहित केले आहे. त्यामुळे बऱ्याच वाडी-वस्त्या दळणवळणाच्या टप्प्यात आल्या आहेत. पंरतु रुईघर सनासाळी मात्र मूठभर गावकऱ्यांच्या अडेलतट्टूभूमिकेमळे याला अपवाद ठरली आहे. शासनपातळीवर दखल घेतली जात नाही म्हणून वाडीतील गावकऱ्यांनी ही सुविधा आपणच श्रमदानातून सोडवू, असा निर्धार केला. प्रत्यक्षात कामाला सुरुवात केली. याला विद्यमान जिल्हा परिषद सदस्यांनी या ग्रामस्थांना आधार देऊन आम्हीही तुमच्या पाठीशी आहोत, असा विश्वास दिला. विश्वासाला पात्र ठरत शासकीय ठेकेदार पाठवून प्रत्यक्ष काम सुरू केले. सर्व यंत्रणा कामाला लागली आणि सनासाळीपासून दीड किलोमीटरचा रस्ता गावाच्या वेशीपर्यंत पूर्ण झाला.
शिंदेवाडी-रुईघर रस्त्याला जोडण्यासाठीचा हा रस्ता रुईघर गावातून जातो. रस्ता या ठिकाणी आल्याबरोबर गावातील एकाने आपली जागा रस्त्यात जाणार म्हणून गाजावाजा करीत माहितीच्या अधिकाराखाली शासकीय यंत्रणेलाच वेठीस धरण्याचा प्रयत्न केला. त्यांना काहींची साथ मिळाल्याने त्यांनी या कामात अडथळा आणून काम थांबवले.
या कामासाठी लागणारी सर्व साधनसामुग्री सध्या जागेवर असून, हे काम पूर्ण न झाल्यास मोठी समस्या निर्माण होणार आहे. स्थानिक पातळीवर याचा विचार करून सामोपचाराने हा प्रश्न मिटवणे गरजेचे आहे. स्वातंत्र्यानंतर साठ वर्षांनी जर या वाडीला रस्ता मिळत असेल तर ग्रामस्थांनीही याला तडजोड करून तोडगा काढण्याची आवश्यकता आहे. अर्धवट राहिलेल्या रस्त्याचे काम पुन्हा सुरू करून ते पूर्ण करावे,अशी मागणी वाडीतील लोकांनी केली आहे.
काहींमुळे रस्ता बंद पडला आहे. सनासाळी वाडीसाठी रस्ता सुरू न झाल्यास आम्ही तीव्र आंदोलन करणार असल्याचे ग्रामस्थांनी सांगितले. (वार्ताहर)
आम्ही आजही दळणवळणाअभावी आदिवासींचे जिणे जगत आहोत. आम्ही सर्व ग्रामस्थ श्रमदानासाठी पुढे येत आहोत. आम्हाला शासकीय पातळीवरून तसेच लोकप्रतिनीधीही सहकार्य करत असताना काही मूठभर लोकांमळे रस्ता मिळणार नसेल तर आम्ही उपोषणाला बसणार आहे.
- मारुती शेडगे, ग्रामस्थ
मतांसाठी आमच्याकडे पाहिले...
पन्नास वर्र्षांत सर्वांनींच आमच्याकडे फक्त मतांसाठी पाहिले. आम्ही आमच्या व्यथा प्रत्येक वेळी मांडल्या; पंरतु निवडणुकीनंतर कोणत्याही लोकप्रतिनिधीने आमच्या अडचणी सोडविण्याचा प्रयत्न केलेला नाही. सरपंच, सभापती, जिल्हा परिषद सदस्य, आमदार, खासदार यांच्याकडे लेखी व तोंडी तक्रारीही केल्या आहेत; पंरतु याची दखल अद्यापही कुणी घेतली नाही, असे ग्रामस्थांचे म्हणणे आहे.