विक्रमसिंह घाटगे यांचे स्मारक उभारणार
By Admin | Updated: September 26, 2015 00:59 IST2015-09-26T00:44:51+5:302015-09-26T00:59:29+5:30
शाहू साखर कारखाना सभा : समरजितसिंह घाटगे यांचा निश्चय

विक्रमसिंह घाटगे यांचे स्मारक उभारणार
कागल : स्वर्गीय राजे विक्रमसिंह घाटगे यांचे उचित स्मारक साखर कारखान्याच्यावतीने उभे करावे, अशा सूचना असंख्य सभासदांनी केल्या आहेत. स्वत: राजेसाहेबांनी छ. शाहू ग्रुपच्या माध्यमातून राजर्षी शाहूंचे जिवंत स्मारक उभे केले. त्याच पद्धतीने प्रत्यक्ष कार्यातून पिढ्यान्पिढ्या उपयोगी आणि प्रेरणादायी ठरेल, असे विक्रमसिंह राजेंचे स्मारक उभे करूया, असे प्रतिपादन छ. शाहू सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष समरजितसिंह घाटगे यांनी केले.
कारखान्याच्या ३८ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत ते बोलत होते. सभेत घाटगे यांनी साखर निर्यातीस परवानगी दिल्याबद्दल केंद्र सरकारचे अभिनंदन करून निर्यातीसाठी वाहतूक अनुदान उपलब्ध करून द्यावे, अशी मागणी केली. कारखाना लवकरच ३0 हजार लिटर क्षमतेचा इथेनॉल प्र्रकल्प उभा करणार असल्याचे जाहीर केले. सभेत ज्येष्ठ संचालक आमदार वीरकुमार पाटील, उपाध्यक्ष एस. के. मगदूम, श्रीमंत वीरेंद्रसिंह घाटगे, सर्व संचालक व सभासद उपस्थित होते.
यावेळी समरजितसिंह घाटगे म्हणाले, ज्या तत्त्वांच्यावर राजेसाहेबांनी साखर कारखाना चालवित तेच धोरण पुढे सुरू आहे. सध्या साखर उद्योगास अडचणी स्ुरूआहेत. मात्र, शाहू साखर कारखान्याच्या सभासदांच्या पाठबळावर व अडचणींचा काळ परतवून लावू.
विक्रमसिंहराजेंच्या नेतृत्वाखाली कारखान्याने यापूर्वी एफ.आर.पी.पेक्षा जास्त उसदर दिला आहे. आणि राखीव निधीही निर्माण केला. त्यामुळे आर्थिक नियोजनात आपला कारखाना भक्कम उभा आहे. आॅक्टोबर २0१५ मध्ये पुढील हंगाम सुरू करण्याचा मानस आहे. मात्र, सध्याचे साखरंचे दर पाहता एफ.आर.पी.ची रक्कम टप्प्याटप्प्यांने द्यावी लागणार आहे. देशातील ४0 लाख टन साखर निर्यात झाली, तर साखरेला दर येऊन उसाच्या दराला फायदा होईल. मात्र, परदेशातही आपल्यापेक्षा थोडे दर कमी असल्याने कें द्र सरकारने निर्यातीसाठी वाहतूक अनुदान द्यावे. उपाध्यक्ष एस. के. मगदूम यांनी स्वागत, तर विषय पत्रिकेचे वाचन कार्यकारी संचालक विजय औतोड यांनी केले. प्रश्नोत्तरांचे वाचन सचिव एस. ए. कांबळे यांनी, तर अमरसिंह घोरपडे यांनी आभार मानले. (प्रतिनिधी)
एफ.आर.पी. टप्प्याटप्प्याने
सर्वसाधारण सभेत अध्यक्ष समरजित घाटगे यांनी येणाऱ्या ऊस गळीत हंगामातील आर्थिक अडचणी मांडल्या. त्यांच्या संदर्भाने सभासद दत्तात्रय चव्हाण यांनी शाहू साखर कारखाना शेतकऱ्यांना पूर्ण एफ.आर.पी. देणार यात शंका नाही.
मात्र, ही एफ.आर.पी. टप्प्याटप्प्यांने दिली, तर सभासदांची हरकत नाही, असा ठराव मांडला. या ठरावास सभासदांकडून टाळ्यांचा कडकडाटात मंजुरी दिली.
राजेंशिवाय पहिली सभा
कोणत्याही पोलीस बंदोबस्तशिवाय गेली ३७ वर्षे कारखान्याची वार्षीक सर्वसाधारण सभा होत आली आहे.
सभेच्या केंद्रस्थानी अर्थातच विक्रमसिंह घाटगे असत. त्यांच्या निधनांनंतर ही ३८ वी वार्षिक सभा शुक्रवारी होत होती. ही राजेंच्याशिवाय पहिलीच सभा. त्यामुळे नूतन अध्यक्ष समरजितसिंह घाटगेंना ऐकण्यासाठी मोठी गर्दी झाली होती.