विजयन अडखळणार... चंडींची वाट सेफ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 26, 2021 04:22 IST2021-03-26T04:22:30+5:302021-03-26T04:22:30+5:30
तिरुवनंतपुरम : डाव्या लोकशाही आघाडीकडून पुन्हा मुख्यमंत्रीपदाचे प्रमुख दावेदार असलेले केरळचे विद्यमान मुख्यमंत्री पिनराई विजयन हे कन्नूर जिल्ह्यातील ...

विजयन अडखळणार... चंडींची वाट सेफ
तिरुवनंतपुरम : डाव्या लोकशाही आघाडीकडून पुन्हा मुख्यमंत्रीपदाचे प्रमुख दावेदार असलेले केरळचे विद्यमान मुख्यमंत्री पिनराई विजयन हे कन्नूर जिल्ह्यातील धर्मधाम विधानसभा मतदारसंघातून सलग दुसऱ्यांदा रिंगणात आहेत. त्यांच्याविरोधात काँग्रेसने सी. रघुनाथ यांना उमेदवारी दिली आहे. विजयन यांचा हा मतदारसंघ डाव्यांचा बालेकिल्ला असला तरी एका अपक्ष महिलेने त्यांच्याविरोधात उमेदवारी करून आरोपांची राळ उडवून दिल्याने विरोधकांना ऐतेच खतपाणी मिळाले आहे. २०१७ मध्ये वालयार भागात बलात्कार होऊन दोन सख्ख्या बहिणींचा खून झाला होता. या मुलींच्या आईनेच विजयन यांच्याविरोधात अपक्ष उमेदवारी दाखल केली आहे. आधीच सोने तस्करीच्या प्रकरणावरून विजयन यांची कोंडी झाली असताना आता बलात्कार प्रकरणाच्या चौकशीतही हलगर्जी केल्याचा आरोप त्यांच्यावर होत असल्याचे विजयन चांगलेच अडचणीत सापडले आहेत. गत निवडणुकीत या मतदारसंघात विजयन यांनी त्यांचे प्रतिस्पर्धी काँग्रेसचे उमेदवार दिवाकरण यांचा ३६ हजार मतांनी पराभव केला होता. याआधी विजयन १९७०, १९७७ आणि १९९१ या काळात कुथुपरम्बा मतदारसंघातून विधानसभेचे प्रतिनिधित्व करत होते, तर १९९६ मध्ये ते पय्यानूरमधून निवडून गेले होते. दुसरीकडे काँग्रेसचे मुख्यमंत्रीपदाचे प्रबळ दावेदार मानले जाणारे ओमन चंडी हे कोट्टायम जिल्ह्यातील पुथुपल्लीमधून रिंगणात आहेत. अकरा वेळा या मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करणाऱ्या चंडी यांना २६ वर्षीय जेक सी थॉमस यांनी आव्हान दिले आहे. रबर उत्पादनात अग्रेसर असलेल्या कोट्टायम जिल्ह्यात रबर दरावरून राजकारण पेटले आहे. सध्याच्या विजयन सरकारने रबरला प्रतिकिलो १०० ते १५० रुपयांचा भाव दिला आहे. मात्र, काँग्रेस सरकारच्या काळात हाच भाव २५० रुपयांच्याही पुढे होता. चंडी याचाच लाभ उठविण्याच्या तयारीत आहेत. कोट्टायमपासून जवळच असलेल्या शबरीमाला मंदिरातील महिलांच्या प्रवेशाच्या प्रकरणालाही ऐन निवडणुकीच्या तोंडावर चांगलीच ‘हवा’ दिल्याने डाव्यांची गोची झाली आहे.