विजय कोंडके महामंडळातून बाहेर
By Admin | Updated: August 5, 2014 00:12 IST2014-08-04T23:17:07+5:302014-08-05T00:12:36+5:30
अविश्वास ठराव मंजूर : सांगावकर, नलवडे, पन्हाळकर यांचे सभासदत्व रद्द

विजय कोंडके महामंडळातून बाहेर
कोल्हापूर : अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाचे उपाध्यक्ष मिलिंद अष्टेकर यांच्याविरोधात विनयभंगाचा खोटा गुन्हा दाखल केलेल्या छाया सांगावकर, अर्जुन नलवडे, सुरेंद्र पन्हाळकर यांना पाठीशी घालत अध्यक्षपदाचा राजीनामा देण्यास नकार दिलेले विजय कोंडके यांच्याविरोधात कार्यकारिणी सदस्यांनी आज, सोमवारी अविश्वास ठराव मंजूर केला. तसेच उपाध्यक्ष आणि महामंडळाची बदनामी केल्याबद्दल तक्रार दाखल केलेल्या तिघांचेही सभासदत्व रद्द करण्याचा ठराव या बैठकीत करण्यात आला.
महामंडळाच्या पुनर्लेखापरीक्षणाचा अहवाल देण्यावरून ३० जुलैला झालेल्या भांडणानंतर छाया सांगावकर यांनी उपाध्यक्ष मिलिंद अष्टेकर यांच्याविरोधात जुना राजवाडा पोलीस ठाण्यात विनयभंगाची तक्रार दाखल केली होती. यावर निर्णय घेण्यासाठी आज महामंडळाच्या कार्यकारिणीची तातडीची बैठक बोलावली होती. यावेळी उपाध्यक्ष अष्टेकर, माजी अध्यक्ष प्रसाद सुर्वे, कार्यवाह सुभाष भुरके, सदस्य सदानंद सूर्यवंशी, सतीश बीडकर यांच्यासह सदस्य उपस्थित होते. सव्वाबाराच्या दरम्यान, कोंडके महामंडळाच्या दारात आले. मात्र, जोपर्यंत तुम्ही सांगावकर, नलवडे आणि पन्हाळकर यांचे सभासदत्व रद्द करण्याचा शब्द देत नाही, तोपर्यंत तुम्हाला बैठकीस जाऊ देणार नाही, अशी भूमिका घेत सदस्यांनी त्यांना पाऊण तास घेराव घातला. अध्यक्षांनी शब्द दिल्यानंतर बैठकीला सुरुवात झाली. बैठकीत या तिघांचे सभासदत्व रद्द करण्यासाठी ९ विरुद्ध १ असा ठराव करण्यात आला. सदस्यत्व रद्द करू नये, असे एकमेव मत अध्यक्षांचे होते. या तीन व्यक्तींमुळे महामंडळाच्या परंपरेला आणि सन्मानाला धक्का लागलेला असताना अध्यक्ष त्यांना पाठीशी घालत असल्याच्या कारणावरून कार्यकारिणीतील संचालकांनी अध्यक्षांना धारेवर धरत त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली. सायंकाळपर्यंत चाललेल्या या बैठकीच्या अखेरपर्यंत अध्यक्षांनी राजीनामा देण्यास नकार दिल्याने अखेर कार्यकारिणीने त्यांच्याविरोधात ८ विरुद्ध २ असा अविश्वास ठराव मंजूर करून त्यांना कार्यमुक्त केले.
विनयभंगाची तक्रार दाखल केल्याप्रकरणात अध्यक्षांनी विरोधकांच्या बाजूने कल देत या प्रकरणाच्या चौकशीसाठी समिती नेमण्यात येईल, असे दोन दिवसांपूर्वी प्रसिद्धीपत्रकाद्वारे जाहीर केले होते. (प्रतिनिधी)
नूतन अध्यक्षांची निवड २५ रोजी
महामंडळाचे अध्यक्षपद विजय कोंडके आणि विजय पाटकर यांना एक-एक वर्षासाठी विभागून देण्यात आले होते. त्यानुसार कोंडके यांची अध्यक्षपदाची मुदत २७ आॅगस्टला संपणार होती. परंतु, त्याआधीच त्यांना कार्यमुक्त करण्यात आल्याने आता हे पद रिक्त झाले आहे. २५ आॅगस्टला महामंडळाच्या कार्यकारिणीची बैठक होणार आहे. या बैठकीत नूतन अध्यक्षांची निवड होईल, अशी माहिती कार्यवाह सुभाष भुरके यांनी दिली. नूतन अध्यक्षपदी आता विजय पाटकर यांची वर्णी लागण्याची शक्यता आहे.