ब्रह्मवृंदाच्या एकजुटीचे दर्शन
By Admin | Updated: August 30, 2014 00:17 IST2014-08-30T00:08:36+5:302014-08-30T00:17:52+5:30
औरंगाबाद : ब्रह्यवृंदाने एकसाथ, एका सुरात गणपती अथर्वशीर्षाची २१ आवर्तने म्हणत एकजुटीचे दर्शन घडविले.

ब्रह्मवृंदाच्या एकजुटीचे दर्शन
औरंगाबाद : ब्रह्यवृंदाने एकसाथ, एका सुरात गणपती अथर्वशीर्षाची २१ आवर्तने म्हणत एकजुटीचे दर्शन घडविले. गणेशोत्सवाची सुरुवात चार वेदांच्या मंत्रोच्चाराने करण्यात आली.
विश्व ब्राह्मण सेवाभावी संस्थेच्या वतीने या धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. सामूहिक अथर्वशीर्षाचे पठण करण्यासाठी संस्थेच्या वतीने समाजबांधवांना आवाहन करण्यात आले होते. त्यास पाठिंबा देत शुक्रवारी सिडकोतील सप्तपदी मंगल कार्यालय ब्रह्यवृंदाने भरून गेले होते.
वे.शा.सं. श्रीराम धानोरकर (ऋग्वेद), दुर्गादास शास्त्री मुळे (यजुर्वेद), दिनेश कुलकर्णी (अथर्ववेद), वासुदेव शास्त्री ठोसर (सामवेद), अशोक देव, भोगावकर गुरुजी यांनी एकानंतर एक चार वेदांचे मंत्रोच्चारण करून गणेशोत्सवास सुरुवात केली.
संस्थेच्या महिला प्रतिनिधी प्रमुख अनुराधा पुराणिक यांनी सांगितले की, ब्राह्मण समाज विखुरलेला आहे.
या समाजातील बांधवांची एकजूट करण्यासाठी उपक्रमाचे आयोजन केले जाते. समाजातील गरीब, गुणवंत विद्यार्थ्यांना आम्ही शिक्षणासाठी आर्थिक मदतही करतो. यावेळी उपक्रमांचा माहितीपट दाखविण्यात आला.
प्रारंभी, संस्थेचे अध्यक्ष सुरेश देशपांडे यांनी सर्वांचे स्वागत केले. प्रास्ताविक आर.सी. कुलकर्णी यांनी केले. सूत्रसंचालन अनुया बावरकर यांनी केले. प्रकाश वझरकर यांनी आभार मानले. सोहळा यशस्वी होण्यासाठी रत्नाकर कुलकर्णी, रमेश पाथ्रीकर, प्रकाश वझरकर, कुलदीपक देशपांडे, अरविंद मोदी, अवधूत नाकाडे आदींनी परिश्रम घेतले.
मंत्रोच्चाराने सर्व वातावरण मंगलमय झाले होते. संस्कृतच्या प्राध्यापिका मंजूषा कुलकर्णी यांनी सामूहिक अथर्वशीर्ष पठणाचे महत्त्व विशद केले. यानंतर विश्वकल्याणासाठी शांतीपाठ करण्यात आला. त्यानंतर सर्वत्र ओंकाराचा स्वर घुमला. ‘ॐ नमस्ते गणपतये, त्वमेव प्रत्यक्षं तत्त्वमसि’ असे उच्चारण करीत ब्रह्मवृंदाने अथर्वशीर्षाची २१ आवर्तने म्हटली. यावेळी एकसाथ, एका सुरात, अथर्वशीर्ष म्हणताना सर्वांच्या चेहऱ्यावर तेज झळकत होते. मंगलमय वातावरणात आरती करण्यात आली. त्यानंतर प्रसादाचे वाटप करण्यात आले.
शहरात रक्ताचा तुटवडा जाणवत असल्याने विश्व ब्राह्मण सेवाभावी संस्थेने उपस्थितांना रक्तदान करण्याचे आवाहन केले. यास प्रतिसाद देत ५० जणांनी रक्तदान केले. रक्तसंकलनाचे कार्य दत्ताजी भाले रक्तपेढीने केले.