२७व्या रोजाने सामाजिक सलोख्याचे दर्शन
By Admin | Updated: July 16, 2015 00:54 IST2015-07-16T00:54:49+5:302015-07-16T00:54:49+5:30
इफ्तारमध्ये सर्वधर्मीयांचा सहभाग : पूर्वजांच्या प्रार्थनेसाठी कब्रस्तान परिसरात गर्दी--महिना रमजानचा सामाजिक सलोख्याचा !

२७व्या रोजाने सामाजिक सलोख्याचे दर्शन
एम. ए. पठाण - कोल्हापूर -रमजान महिन्यातील २७व्या रोजाचे मुस्लिम बांधवासमवेत अन्य धर्मीय समाजबांधवांनी पालन करून सामाजिक सलोख्याचे दर्शन घडविले. शहरातील बाबूजमाल दर्गा परिसर तसेच जिल्ह्यातील विविध ठिकाणी मुस्लिम बांधवांसमवेत अन्य धर्मीय बांधवांचा रोजा इफ्तारमधील सहभाग सामाजिक ऐक्य दर्शविणारा ठरला.
मुस्लिम तिथीप्रमाणे रमजान महिन्यातील शेवटच्या टप्प्यातील रोजास २१ पासून प्रारंभ होतो. या रोजामध्ये मुस्लिम बांधव २१, २३, २५, २७, २९ तारखेला लैलतुल कद्र अर्थात शब-ए-कद्र या रात्रीचा शोध घेत असतात. बहुसंख्य धर्मगुरूंच्या मते ही रात्र सत्ताविसाव्या रात्री येते. या रात्रीमध्ये मुस्लिम बांधव अल्लाहाची आराधना व समाजाच्या समृद्धीसाठी प्रार्थना करतात. तसेच वाईट कृत्याबद्दल क्षमा मागतात.
शहरातील हजरत पीर बाबूजमाल दर्गा परिसरात सायंकाळी अन्य धर्मीय बांधव रोजा इफ्तारसाठी एकत्र आले होते. मस्जिद व दर्ग्यातर्फे बसण्याची, खाद्य पदार्थांची व्यवस्था केली होती. विशेष म्हणजे पन्हाळा येथील सादोबा दर्गा येथील मंडपात मुस्लिम बांधवांसमवेत अन्य धर्मीय रोजा इफ्तार करण्यासाठी जमा झाले होते. पन्हाळा तालुक्यातील मसुदमाले येथे शाही मस्जिद असून, हिंदू बांधव श्रद्धेने ‘मसुदमालेची पांढर’ असे संबोधतात. येथे अन्य धर्मीय २७ व्या रोजाचे इफ्तार करण्यासाठी एकत्र येत असतात. राधानगरी, गगनबावडा, आजरा, चंदगड, करवीर, तालुक्यांतही अन्य धर्मीय बांधवांची रोजा करण्याची व इफ्तारची लगबग पाहावयास मिळाली. यामध्ये लहान मुलांनी केलेल्या रोजाचेही आकर्षण होते. शहरातील मस्जिदीमध्ये तरावीह पठण करणाऱ्या हाफिजी, मौलाना, खिदमतगार, बागी यांना चंदा कमिटीकडून जमा झालेल्या निधीचे वाटप काल मंगळवारी रात्री करण्यात आले. रात्री मस्जिदीमध्ये विश्वशांती समृद्धीसाठी प्रार्थना करण्यात आली. तसेच काही ठिकाणी मसाले दूध, मिठाईचे वाटप करण्यात आले.
बडी मस्जिदमध्ये मध्यरात्री दुआ
मुस्लिम बांधवांना अल्लाहच्या प्रार्थनेसाठी एकत्र आणण्याचे काम बिंदू चौकातील बडी मस्जिदकडून होत आहे. मंगळवारी रात्री सव्वाएक वाजता तसबीहचे पठण करून समस्त मानव जातीच्या उन्नतीसाठी दुआ करण्यात आली. त्यानंतर सहेरीची अर्थात जेवणाची व्यवस्था केली होती.
कब्रस्तान परिसरात गर्दी
मंगळवारी २७वी मोठी रात्र असल्याने आपल्या पूर्वजांसाठी प्रार्थना करण्यासाठी कब्रस्तान परिसरात मुस्लिम बांधवांनी गर्दी केली होती.