माणसातील निर्दयतेचे दर्शन

By Admin | Updated: July 31, 2014 23:21 IST2014-07-31T22:42:30+5:302014-07-31T23:21:51+5:30

गटारीशेजारी टाकले स्त्रीजातीचे जिवंत अर्भक : घोसरवाड येथील प्रकार

View of the cruelty of man | माणसातील निर्दयतेचे दर्शन

माणसातील निर्दयतेचे दर्शन

कुरुंदवाड : घोसरवाड (ता. शिरोळ) येथे स्वामी गल्लीतील गटारीशेजारी स्त्रीजातीचे नवजात अर्भक सापडल्याने गावामध्ये खळबळ उडाली आहे. अर्भक जिवंत आहे. ही माहिती समजताच गावचे पोलीस पाटील अजितसिंह खोत यांनी अर्भकाला सांगलीच्या शासकीय रुग्णालयात दाखल केले. त्यावर उपचार सुरू आहेत. या प्रकाराने पुन्हा एकदा स्त्री-भ्रूण हत्या उघडकीस आली आहे. याबाबत रात्री उशिरापर्यंत पोलिसांत गुन्हा नोंद झाला नसला तरी कुरुंदवाड पोलीस याचा तपास करीत आहेत.
घोसरवाड हे सुमारे आठ हजार लोकवस्तीचे खेडे आहे. गावच्या दक्षिणेला स्वामी गल्ली आहे. या गल्लीतील गटारीशेजारी कुणीतरी नुकतेच जन्मलेले स्त्रीजातीचे अर्भक टाकून गेले होते. पहाटे चारच्या सुमारास सुशांत चव्हाण लघुशंकेला उठला असता त्याला अर्भक दिसले. अर्भकाची हालचाल होत असल्याने ही घटना त्यांनी त्वरित गावचे पोलीस पाटील अजितसिंह खोत यांना सांगितली. स्त्रीजातीचे अर्भक वाचविण्यासाठी खोत व ग्रामपंचायत सदस्य लक्ष्मण नाईकवडे यांनी टाकळी प्राथमिक आरोग्य केंद्राची रुग्णवाहिका बोलाविली व अर्भकाला सांगलीच्या शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले.
या घटनेची नोंद कुरुंदवाड पोलिसांत झाली नसली तरी
घटनेचे गांभीर्य ओळखून पोलीस निरीक्षक डी. एस. हाके यांच्या मार्गदर्शनाखाली बीट हवालदार आर. बी. डाके निर्दयी माता-पित्यांच्या शोधात आहेत. तसेच हे अर्भक मुलगी म्हणून की अनैतिक संबंधातून जन्माला आले म्हणून टाकण्यात आले आहे, याचा तपास पोलीस करीत आहेत. (वार्ताहर)

केवळ दैव बलवत्तर
अज्ञात गुरुवारी पहाटे हे अर्भक गटारीशेजारी टाकून गेले असावेत. या भागात मोकाट कुत्र्यांचा वावर मोठा असतो. मात्र, या ठिकाणी एकही कुत्रे आले नाही. शिवाय सतर्क नागरिक व पोलीस पाटील यांच्यामुळे या अर्भकाला जीवदान मिळाले असून, या अर्भकाचे केवळ दैव बलवत्तर असल्याचे घटनास्थळी बोलले जात आहे.

Web Title: View of the cruelty of man

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.