विद्यामंदिर नाधवडे : स्पर्धा परीक्षांचे बाळकडू-
By Admin | Updated: July 10, 2015 00:38 IST2015-07-09T21:29:02+5:302015-07-10T00:38:28+5:30
-गुणवंत शाळा

विद्यामंदिर नाधवडे : स्पर्धा परीक्षांचे बाळकडू-
नाधवडे (ता. भुदरगड) येथील जिल्हा परिषदेची विद्यामंदिर नाधवडे ही प्राथमिक शाळा पाहिल्यावर कोणत्याच अंगाने ती सरकारी वा जिल्हा परिषदेची शाळा वाटत नाही. शाळेत पहिलीपासून स्पर्धा परीक्षेची तयारी करून घेतली जात असल्यामुळे ही शाळा विद्यार्थ्यांसाठी स्पर्धा परीक्षांचं बाळकडू ठरत आहे.
गावच्या पश्चिमेस शाळा आहे. समोर गोमुखी आकाराची बाग असून, बरोबर मधून फरशीच्या वाटेवरून जावं लागतं. दोन्ही बाजूंना सोनेरी दुरांडा आहे. त्याला विरोधी लाल-जांभळ्या पानांची शोभेची झुडपे आहेत. ती शाळेतल्या हसतमुख मुलांसारखी जणू स्वागतासाठी उभी असतात. आतल्या दोन्ही बाजूंना त्रिकोणी आकारात हिरवीगार लॉन, मऊ लुससुशीत बागेभोवती दगडी भिंत आणि कठडा आहे. भिंंती पाम शहरातल्या पार्कमधील बागेसारख्या असून इमारतीवर सर्व शिक्षा अभियानाचे पेन्सिलवर बसलेला मुलगा आणि मुलगी ‘हसतमुख सारे शिकूया, पुढे जाऊया’, असे बोधचिन्ह आहे.
सुखद भावना देणारी बाब म्हणजे कवितांच्या छान चाली ऐकायला मिळतात. विद्यार्थ्यांबरोबर बाई नवनिर्मित चालींचा आनंद घेणाऱ्या दिसतात. मराठी व इंग्रजी कवितांना चाली, मुलांना गाण्याची पट्टी, ताल, सूर उमगलाय. कविता ऐकत राहावी अशीच. मुख्याध्यापकांचे कार्यालय म्हणजे फलकांवरती विविध स्पर्धांमध्ये आणि परीक्षांमध्ये यश मिळविलेल्या यादींचे फलक व गुणवत्तेचा आरसाच जणू आहे. कार्यालय अपुरे पडावं इतके फलक आहेत. १९९५-९६ ते २००९-२०१० या काळात शिष्यवृत्ती परीक्षेत २१९ विद्यार्थी गुणवत्ता यादीत चमकले, तर आठ विद्यार्थी नवोदय विद्यालयात प्रवेशासाठी पात्र ठरलेत. चालू वर्षी नऊ विद्यार्थी शिष्यवृत्ती परीक्षेतील गुणवत्ता यादीत आहेत. वैशिष्ट्य म्हणजे गुणवत्तेचे सातत्य आणि शिक्षकांच्या परिश्रमामध्ये अखंडता आहे.
या शाळेतील इयत्ता पहिली ते सातवीची मुलं शक्य तेथे पाटी-पेन्सिल जास्तीत जास्त वापरतात. पाटीवर उदाहरणे सोडविणे व
सराव चालू असतो. या शाळेचा लौकिक परिसरात आहे. गुणवत्ता, दर्जा राखणारी शाळा, असा नावलौकिक असल्याने आसपासच्या गावातून ४१ मुलं शिकण्यासाठी इथं येतात.
कवायत, परिपाठ, पाठांतराचे उपक्रम, मानवी मनोरे, कविता गायन, लेझीम पथक, बोलके वर्ग, वृक्षारोपण, बाग-बगीचा, हस्ताक्षर प्रकल्प, गटपद्धतीचा वापर, वाढदिवस साजरा करणे, स्वाध्याय कार्डसचा वापर यांसारखे उपक्रम राबविणारी ही शाळा. फरक जाणवला तो प्रकर्षाने म्हणजे खात्याकडून आदेश आला, सर्वांगीण शैक्षणिक गुणवत्ता विकास पुस्तिकेत उपक्रम नमूद केले म्हणून ते राबवायचे, अशी मानसिकता या शिक्षकाम्ांध्ये नाही, तर विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गुणवत्तेसाठी ते उपक्रम अमलात आणून त्यांचा दर्जा कसा वाढेल यावर मनापासून भर देणारे शिक्षक आहेत. संगणक, ई-लर्निंग वगैरेंचे ज्ञान, साधन वापर
सुरू आहेच. तरीही अभ्यास, सराव, स्पर्धा परीक्षेच्या तयारीसाठी मुले सकाळी सात ते संध्याकाळी सहापर्यंत शाळेत असणं आणि त्यासोबत शिक्षक यावर अधिक भर देणारी ही विद्यामंदिर, नाधवडे ही शाळा खरोखरच आजच्या काळात आदर्श म्हणावी लागेल.
शिक्षकांनी झोकून देऊन, पेशाची जबाबदारी जाणून व ठेवून, विद्यार्थी हाच केंद्रबिंदू मानून काम केले तर गुणवत्ता रुजते, फुलते, बहरते. विद्यामंदिर, नाधवडे शाळा
ही शिक्षक, विद्यार्थी, मुख्याध्यापक हे एखाद्या कुटुंबाप्रमाणे आहेत !
- डॉ. लीला पाटील
शाळेची वैशिष्ट्ये
लेखन, वाचन, अंकज्ञानाची १०० टक्के तयारी करण्यावर भर दिला जातो.
प्रत्येक अक्षराची ओळख, ओळख झालेल्या अक्षरांचे शब्द, अक्षरांपासून शब्द तयार करा, शाब्दिक खेळ, मुलं अक्षरांशी, शब्दांशी खेळतात, असा हा शब्द-अक्षर खेळ.
दुसरीत बेरीज-वजाबाकीचं ज्ञान आणि सराव झाला की तिसरी-चौथीत गुणाकार, भागाकार शिकवणं अवघड नाही. गुणवत्ता यादीत मुलं येण्यासाठी सकारात्मक दृष्टी असलेले शिक्षकच महत्त्वाचे कारण ठरते.
शाळेत विद्यार्थी-पालक-शिक्षक प्रत्येकाला शिक्षणाची ओढ आहे. शिक्षक विद्यार्थ्यांना रागावले तर पालकांना चालते.
विद्यार्थी गैरहजर राहिला, तर पालकांना आणल्याशिवाय शाळेत येत नाही.
वर्गातील बोलके फळे सुंदर अक्षरांमुळे मुलांइतकेच आनंदी आणि हसरे दिसतात.
‘गट पद्धती’ आहे. एका गटात सहा मुले असून, त्यात किमान तीन मुले हुशार असतात व तीन मुले अप्रगत असतात. ही प्रज्ञावंत मुले या अप्रगत मुलांना समजावून सांगतात. त्यामुळे या काहीशा मागे राहिलेल्या मुलांची प्रगती होण्यास मदत होते.
शाळा सुटली तर मुलं व्हरांड्यात गटात बसून अभ्यास करताना आढळली.
विशेष म्हणजे रजा काढून घरी थांबलेले शिक्षक काम झालं की परत शाळेत येतात. तेवढाच एक तास वा जो मिळेल तो वेळ शिकवायला वापरत आहेत.
पहिलीचे वर्गशिक्षक तो वर्ग सातवीपर्यंत नेतात. विद्यार्थ्यांचं ‘पालकत्व शैक्षणिक’ असे ते स्वीकारतात.