उद्धव गोडसेप्रेमसंबंधातून वाद वाढल्यानंतर वरिष्ठ पोलिस निरीक्षक अभय कुरुंदकर याने सहायक पोलिस निरीक्षक अश्विनी बिद्रे-गोरे यांचा निर्घृण खून केला. मृतदेहाचे तुकडे वसईच्या खाडीत फेकून पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न केला. पण, या दोघांतील वादाचे व्हिडीओ नातेवाइकांच्या हाती लागले आणि वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी शिताफीने दडपलेल्या खुनाच्या गुन्ह्याला दोन वर्षांनी वाचा फोडली. कोल्हापूर : जिल्ह्यातील आळते (ता. हातकणंगले) येथील अश्विनी गोरे-बिद्रे या २००६ मध्ये पोलिस दलात उपनिरीक्षक पदावर रुजू झाल्या. पुणे येथे पहिले पोस्टिंग मिळाले. त्यानंतर त्यांची सांगलीला बदली झाली. त्याच ठिकाणी त्यांची तत्कालीन पोलिस निरीक्षक अभय कुरुंदकर याच्याशी ओळख झाली. ओळखीचे रूपांतर प्रेमात झाले. पुढे या दोघांची वेगवेगळ्या ठिकाणी बदली झाली तरी त्यांचे प्रेमसंबंध सुरूच होते.हळूहळू दोघांमध्ये वादाचे खटके उडू लागले. तो अश्विनीला जिवे मारण्याची धमकी देत होता. तुझ्या नवऱ्याला गायब करेल, अशी भीती घालत होता. अखेर हा वाद विकोपाला गेला. एप्रिल २०१६ मध्ये अश्विनी कळंबोली पोलिस ठाण्यात कार्यरत होत्या. ११ एप्रिलच्या रात्री त्या कुरुंदकरला भेटायला ठाण्याला गेल्या. तेव्हा कुरुंदकर ठाणे पोलिस ठाण्यात वरिष्ठ पोलिस निरीक्षकपदावर कार्यरत होता. रात्री हे दोघे कुरुंदकरच्या मीरा भाईंदर येथील फ्लॅटवर गेले. तो तिथे एकटाच राहत होता. दोघांमध्ये कडाक्याचे भांडण झाले आणि यातच कुरुंदकरने अश्विनीच्या डोक्यात बॅट घालून तिचा निर्घृण खून केला.मित्र महेश फळणीकर, राजू पाटील आणि कारचा चालक कुंदन भंडारी यांना फोन करून त्याने बोलावून घेतले. आधीच घरात आणून ठेवलेल्या करवतीने मृतदेहाचे तुकडे केले. ते तुकडे घरातील फ्रीजमध्ये ठेवले. त्यानंतर दुसऱ्या दिवशी रात्री मृतदेहाचे तुकडे एका पिशवीत भरून कारमधून तो वसईच्या खाडीकडे गेला. त्याने मित्राच्या मदतीने मृतदेहाचे तुकडे खाडीत फेकून दिले. अश्विनी यांच्या मोबाइलवरून तिच्या भावाला व्हॉट्सॲप मेसेज करून सहा महिने विपश्यनेसाठी उत्तर भारतात जाणार असल्याचे भासवले. त्यानंतर फ्लॅटची स्वच्छता केली. भिंतींवर उडालेले रक्ताचे डाग घालवण्यासाठी रंगरंगोटी केली. पण, तो गुन्ह्याचे सगळे पुरावे नष्ट करू शकला नाही.लॅपटॉपमध्ये मिळाले वादाचे व्हिडीओपोलिसी शिताफीने एक खून पचवल्याच्या आविर्भावात कुरुंदकर वावरत होता. पण, अश्विनी यांचे पती राजू गोरे यांना सुरुवातीपासूनच कुरुंदकरवर संशय होता. अनेक दिवस पत्नीचा संपर्क होत नसल्याने त्यांनी मेहुणे आनंद बिद्रे यांच्या मदतीने शोध सुरू केला. कळंबोली येथील तिच्या फ्लॅटचे कुलूप तोडून झडती घेतली असता एक लॅपटॉप आणि मोबाइल मिळाला. यातून अश्विनी आणि कुरुंदकर यांच्यातील वादाचे व्हिडीओ मिळाले.कुरुंदकर अनेकदा तिला जिवे मारण्याची धमकी देऊन मारहाण करत असल्याचे त्यावरून स्पष्ट झाले. मोबाइलमधील कॉल डिटेल्समधून याला आणखी दुजोरा मिळाला. हेच पुरावे घेऊन गोरे-बिद्रे कुटुंबीय नवी मुंबई पोलिसांकडे गेले. त्यांनी कुरुंदकरवर संशय घेऊन त्याच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली. पण, पोलिस दलातील दबदबा आणि राजकीय नेत्यांशी असलेल्या लागेबांध्यांमुळे कुरुंदकर ताकास तूर लागू देत नव्हता.
माध्यमांचा दबाव आणि कुटुंबीयांचा पाठपुरावाकुरुंदकरच्या विरोधातील भक्कम पुरावे हाती लागताच बिद्रे-गोरे कुटुंबीयांनी न्यायालयात धाव घेतली. प्रसारमाध्यमांकडे दाद मागितली. लोकप्रतिनिधींच्या भेटी घेऊन हा गंभीर गुन्हा समोर आणला. उच्च न्यायालयाचा आदेश आणि वाढत्या दबावामुळे नवी मुंबई पोलिसांनी हा गुन्हा दाखल करून घेतला. सहायक पोलिस आयुक्त संगीता अल्फान्सो आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी दबाव झुगारून तपास केला.विशेष सरकारी वकील प्रदीप घरत यांनी न्यायालयात कौशल्य पणाला लावून आरोपींना शिक्षेपर्यंत पोहोचवले. यातील राजू पाटील वगळता अन्य तिघांना न्यायालयाने दोषी ठरवले असून, लवकरच शिक्षेचा निर्णय होणार आहे. पोलिस दलाला काळिमा फासणाऱ्या अधिकाऱ्याने सर्व ताकत पणाला लावून गुन्हा दडपण्याचा प्रयत्न केला. मात्र, वादाचे काही व्हिडिओ आणि इतर परिस्थितिजन्य पुराव्यांमुळे तो शिक्षेपर्यंत पोहोचलाच. अखेर त्याला आज जन्मठेप झाली.