व्हिडिओ पार्लर ‘हॉट लिस्ट’वर

By Admin | Updated: November 27, 2015 01:05 IST2015-11-27T00:47:19+5:302015-11-27T01:05:36+5:30

मनोजकुमार शर्मा : संशयास्पद मशीन जप्त करून परवाने रद्दचे आदेश; अधिकाऱ्यांनाही खडे बोल

Video Parlor on 'Hot List' | व्हिडिओ पार्लर ‘हॉट लिस्ट’वर

व्हिडिओ पार्लर ‘हॉट लिस्ट’वर

कोल्हापूर : शहरातील सर्व व्हिडिओ गेम पार्लरची चौकशी करा, बेकायदेशीर व्यवसाय चालणाऱ्या पार्लरवर छापे टाका, मशीन जप्त करा, त्यांचे परवाने रद्द करण्याबाबत प्रस्ताव पाठवा, अशा सक्त सूचना पोलीस अधीक्षक डॉ. मनोजकुमार शर्मा यांनी बुधवारी झालेल्या विशेष बैठकीत पोलीस अधिकाऱ्यांना दिल्या.
कोल्हापूर शहरातील व्हिडिओ गेम पार्लरमध्ये बेकायदेशीर जुगार, खासगी सावकारी चालत असल्याची माहिती मिळाल्याने पोलिसांनी वेगवेगळ्या ठिकाणी व्हिडिओ पार्लरवर छापे टाकून कारवाईचा बडगा उचलला. त्या पार्श्वभूमीवर गुरुवारी जिल्ह्यातील पोलीस अधिकाऱ्यांची तातडीची बैठक येथील पोलीस अधीक्षक कार्यालयात झाली.
दरम्यान, या कारवाईतून फरारी झालेला मुख्य व्हिडिओ गेम पार्लर चालक रणधीर बाळासाहेब महाडिक (रा. ताराबाई पार्क) याचा पोलीस त्याच्या मोबाईल लोकेशनवरून शोध घेत असल्याचेही डॉ. शर्मा यांनी यावेळी सांगितले. या कारवाईमुळे शहरातील सर्व व्हिडिओ पार्लर गेली दोन दिवस बंदच आहेत.
या बैठकीमध्ये, शहरातील काही पोलीस ठाण्याच्या हाकेच्या अंतरावर सुरू असणाऱ्या व्हिडिओ गेम पार्लरमधील बेकायदेशीर व्यवसायावरून काही पोलीस अधिकाऱ्यांची कानउघाडणीही शर्मा यांनी केली. शहरातील व्हिडिओ पार्लरमधील अवैध व्यवसायाची माहिती पोलीस अधिकाऱ्यांना नाही याबाबत त्यांनी आश्चर्य व्यक्त केले.
व्हिडिओ पार्लरमध्ये दररोज लाखो रुपयांची उलाढाल सुरू असून अनेकांचे संसार धुळीस मिळत आहेत. अशा व्हिडिओ गेम पार्लरवर छापे टाकून गुन्हे दाखल करा. त्यांचे परवाने रद्द करण्याबाबत प्रस्ताव तयार करून पाठवा. प्रत्येक पोलीस ठाण्याच्या अधिकाऱ्यांनी हद्दीतील व्हिडिओ गेम पार्लरवर लक्ष ठेवून त्यांनी कारवाईबाबत लवकरच रिझल्ट द्यावा, अशा सक्त सूचना डॉ. शर्मा यांनी यावेळी केल्या.
जिल्ह्यामध्ये मटका, जुगारासह बेकायदेशीर व्यवसाय बंद आहे. त्यामुळे काहीजण या व्हिडिओ पार्लरच्या माध्यमातून आपल्या अवैध व्यवसायाचे डोके वर काढण्याचा प्रयत्न करत आहेत. याची खबरदारी घ्या, अशाही सूचना यावेळी दिल्या. या बैठकीस अप्पर पोलीस अधीक्षक डॉ. एस. चैतन्या, गृहपोलीस उपअधीक्षक अनिल पाटील, करवीर विभागीय पोलीस उपाधीक्षक अमरसिंह जाधव यांच्यासह जिल्ह्यातील सर्व पोलीस ठाण्यांचे निरीक्षक, सहायक पोलीस निरीक्षक, आदी अधिकारी उपस्थित होते.

जप्त यंत्रे तज्ज्ञांकडून तपासणार
कोल्हापूर शहरातील लक्ष्मीपुरी, शाहूपुरी, जुना राजवाडा व राजारामपुरी परिसरातील व्हिडिओ गेम पार्लरवर पोलिसांनी टाकलेल्या छाप्यातील जप्त व्हिडिओ गेमची यंत्रे ही त्या-त्या कंपनीच्या तज्ज्ञांकडून तपासून घेण्यात येणार आहेत. या कंपनीच्या तज्ज्ञांशी संपर्क साधला असून येत्या दोन दिवसांत ते अधिकारी कोल्हापुरात येऊन जप्त केलेल्या व्हिडिओ गेम यंत्रांची तपासणी करून त्यामध्ये काही फेरफार केल्याची तपासणी करणार आहेत. येत्या दोन दिवसांत पुन्हा व्हिडिओ गेम पार्लरचालकांवर गुन्हे दाखल करण्यात येतील, असेही अप्पर पोलीस अधीक्षक डॉ. एस. चैतन्या यांनी यावेळी सांगितले.


अधिकाऱ्यांची कानउघाडणी
अनेक पोलीस ठाण्यांच्या शेजारीच व्हिडिओ गेम पार्लर सुरू असतानाही त्याबाबत पोलीस अधिकारी अनभिज्ञ कसे? असाही प्रश्न पोलीस अधीक्षक डॉ. मनोजकुमार शर्मा यांनी विचारला, असे व्हिडिओ गेम पार्लरमध्ये बेकायदेशीर जुगार सुरू असल्याचे पुन्हा प्रकार उघडकीस आल्यास संबंधित अधिकाऱ्यांची गंभीर दखल घेतली जाईल, असेही डॉ. शर्मा यांनी यावेळी सुनावले.


रणधीर महाडिकचा
शोध सुरू
शहरात अनेक ठिकाणी सुरू असणाऱ्या व्हिडिओ गेम पार्लरचा मालक हा रणधीर महाडिक असल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले आहे; पण तो सध्या फरारी असल्याने त्याच्या मोबाईल लोकेशनवरून त्याचा शोध घेण्याचे काम सुरू आहे. त्याने मोबाईल फोन बंद ठेवल्याने तपासकामात अडचणी येत असल्याचे सांगताच तो असा किती दिवस पळून राहणार, असाही प्रश्न डॉ. शर्मा यांनी यावेळी अधिकाऱ्यांना केला.

Web Title: Video Parlor on 'Hot List'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.