कौशल्य विकासाला ‘व्हिडिओ कॉन्फरन्सिंग’ची जोड
By Admin | Updated: October 15, 2014 00:30 IST2014-10-15T00:25:26+5:302014-10-15T00:30:07+5:30
शिवाजी विद्यापीठ : शुक्रवारी उद्घाटन; कुलगुरू, प्र-कुलगुरू साधणार संवाद

कौशल्य विकासाला ‘व्हिडिओ कॉन्फरन्सिंग’ची जोड
कोल्हापूर : शिवाजी विद्यापीठाच्या कौशल्य विकास कार्यक्रमाला या वर्षीपासून ‘व्हिडिओ कॉन्फरन्सिंग’द्वारे जोडले जाणार आहे. त्याअंतर्गत विद्यार्थ्यांना विविध ठिकाणच्या तज्ज्ञांचे मार्गदर्शन उपलब्ध होणार आहे. शुक्रवारी (दि. १७) सकाळी साडेदहा वाजता कुलगुरू डॉ. एन. जे. पवार, प्र-कुलगुरू डॉ. अशोक भोईटे यांच्या प्रमुख उपस्थितीत या उपक्रमाचा प्रारंभ होईल, अशी माहिती विद्यार्थी कल्याण मंडळाचे संचालक डॉ. डी. के. गायकवाड यांनी दिली.
शिवाजी विद्यापीठ आणि राज्य शासनाचा उच्च व तंत्रशिक्षण विभाग पुरस्कृत माहिती तंत्रज्ञान साहाय्यता केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने गेल्या वर्षापासून महाविद्यालयांमध्ये कौशल्य विकास कार्यक्रम राबविण्यात येत आहे. त्याअंतर्गत तज्ज्ञ मार्गदर्शकांची उणीव दूर करण्याच्या उद्देशाने व्हिडिओ कॉन्फरन्सिंगची जोड देण्यात येत आहे. त्यामुळे ग्रामीण व शहरी विद्यार्थ्यांमधील कौशल्य प्रशिक्षणाची दरी कमी होण्यास मदत होणार आहे. उद्घाटनावेळी कुलगुरू डॉ. पवार, प्र-कुलगुरू डॉ. भोईटे यांच्यासह कुलसचिव डॉ. डी. व्ही. मुळे, ‘बीसीयुडी’चे संचालक डॉ. अर्जुन राजगे, वित्त व लेखाधिकारी व्ही. टी. पाटील, रयत शिक्षण संस्थेचे सचिव डॉ. गणेश ठाकूर, राज्य व्यवसाय शिक्षण मंडळाचे सदस्य शैलेश पगारिया, अरिहंत एज्युकेशन फाउंडेशनचे संचालक अतीश चोरडिया, बळवंत महाविद्यालयाचे डॉ. टी. एस. साळुंखे, देवचंद महाविद्यालयाचे डॉ. प्रकाश हेरेकर, प्राध्यापक, विद्यार्र्थी सहभागी होणार आहेत. (प्रतिनिधी)
ंविद्यापीठाच्या इतर परीक्षा विंभागांचे नामांतर
शिवाजी विद्यापीठाच्या ‘इतर परीक्षा विभाग - चार’ (ओ. ई.-४) या कक्षाचे नामकरण ‘अभियांत्रिकी व तंत्रज्ञान परीक्षा विभाग’ असे करण्यात आले आहे. त्याच्या नामफलकाचे अनावरण शुक्रवारी (दि. १७) दुपारी बारा वाजता होणार आहे. तसेच अभियांत्रिकी प्रात्यक्षिक परीक्षांचे गुण आॅनलाइन पाठविण्यासाठी विद्यापीठाच्या संगणक केंद्राने तयार केलेले सॉफ्टवेअर वापरण्याबाबत आयोजित कार्यशाळेचे उद्घाटन कुलगुरू डॉ. एन. जे. पवार यांच्या हस्ते होणार आहे, अशी माहिती परीक्षा नियंत्रक महेश काकडे यांनी दिली.