विजयाची चाहूल आणि अभिनंदनाचे फलक व फटाक्यांची आतषबाजी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 5, 2020 04:59 IST2020-12-05T04:59:44+5:302020-12-05T04:59:44+5:30
विजयाची चाहूल आणि अभिनंदनाचे फलक व फटाक्यांची आतषबाजी. **प्रा. जयंत आसगावकर यांच्या विजयाने करवीरच्या पश्चिम भागात जल्लोष. लोकमत न्यूज ...

विजयाची चाहूल आणि अभिनंदनाचे फलक व फटाक्यांची आतषबाजी
विजयाची चाहूल आणि अभिनंदनाचे फलक व फटाक्यांची आतषबाजी.
**प्रा. जयंत आसगावकर यांच्या विजयाने करवीरच्या पश्चिम भागात जल्लोष.
लोकमत न्यूज नेटवर्क
कोपार्डे : पुणे शिक्षक मतदारसंघात अटीतटीची लढतीची शक्यता वर्तविण्यात येत होती; पण महाविकास आघाडीचे उमेदवार प्रा. जयंत आसगावकर यांची फेऱ्यागणिक वाढणारे मताधिक्यामुळे त्यांची कर्मभूमी असणाऱ्या करवीरच्या पश्चिम भागांत विजयाची चाहूल लागल्याने निकाल जाहीर होण्याअगोदरच उत्साही कार्यकर्त्यांनी अभिनंदनाचे फलक झळकाविले आहेत.
त्यांच्या सांगरूळ गावात व करवीरच्या पश्चिम भागात, तर गुरुवारी रात्रीपासूनच फटाक्यांची आतषबाजी सुरू झाली होती.
सांगरूळ शिक्षण संस्थेचे सचिव प्रा. जयंत आसगावकर यांना काँग्रेसने महाविकास आघाडीची उमेदवारी जाहीर केली. कोल्हापूर जिल्ह्याला प्रथमच उमेदवारी मिळाल्यानंतर महाविकास आघाडीच्या नेत्यांनी विजयाची मोट बांधायला सुरुवात केली. यात कोल्हापूर जिल्ह्यातील अन्य उमेदवार माघारीसाठी प्रयत्न झाले. पालकमंत्री सतेज पाटील व मंत्री हसन मुश्रीफ यांना यात यश आले. जिल्ह्यातील सर्व शिक्षण संस्था, शिक्षक यांनी आसगावकर यांच्या प्रचाराला गती दिली. चंद्रकांत पाटील यांचे आव्हान परतविण्यासाठी महाआघाडीच्या नेत्यांनी पायाला पाने बांधली होती. यात तरुणांनी पुणे सांगली, सातारा, सोलापूर या भागांत प्रचारात स्वतः झोकून दिले होते.
एक्झिट पोल आसगावकर यांच्या बाजूला असला तरी अपक्ष उमेदवार आ. दत्ता सावंत यांचे कडवे आवाहन होते. सर्वच पातळीवर प्रा. आसगावकर यांची यंत्रणा गतिमान व नियोजनबद्ध असल्याने विजयाचा कल आसगावकर यांच्याकडे झुकत होता. हेच चित्र गुरुवारी मतमोजणी सुरू झाल्यापासून होते. प्रा. आसगावकर यांची पहिल्या फेरीपासून विरोधातील उमेदवारावर आघाडी होती. पहिल्या पसंतीच्या मतमोजणीबरोबर दुसऱ्या पसंतीच्या मतदानातही आसगावकर आघाडीवर असल्याने त्यांच्या सांगरूळसह करवीरच्या पश्चिमेला असणाऱ्या गावात उत्साह वाढला. विजयाची चाहूल लागताच प्रा. आसगावकर यांच्या अभिनंदनासाठी सोशल मीडियातून शुभेच्छा, गावच्या वेशीवर सायंकाळपासूनच अभिनंदनाचे फलक लावायला सुरुवात झाली होती. आज निर्णायक मताधिक्याची माहिती मिळताच सकाळपासून विजयोत्सव साजरा होत होता.
-------------------------^^^-------------------------
(फोटो)
पुणे शिक्षक मतदारसंघात प्रा. जयंत आसगावकर यांचा विजय निश्चित झाल्यानंतर करवीर तालुक्यातील अनेक गावात फटाक्यांची आतषबाजी व गुलालाची उधळण करीत जल्लोष करण्यात आला.