‘कोल्हापूर पोलीस’चा निसटता विजय

By Admin | Updated: December 1, 2014 00:00 IST2014-11-30T23:48:15+5:302014-12-01T00:00:40+5:30

केएसए लीग फुटबॉल : पाटाकडील ‘अ’ विरुद्ध बालगोपाल यांच्यात बरोबरी

Victory of 'Kolhapur Police' Vijay | ‘कोल्हापूर पोलीस’चा निसटता विजय

‘कोल्हापूर पोलीस’चा निसटता विजय

कोल्हापूर : के. एस. ए. लीग फुटबॉल सामन्यात आज, रविवारी कोल्हापूर पोलीस संघाने उत्तरेश्वर प्रासादिक वाघाची तालीम मंडळाचा १-० असा निसटता पराभव केला; तर पाटाकडील तालीम मंडळ ‘अ’ विरुद्ध बालगोपाल तालीम मंडळ यांच्यातील तुल्यबळ लढत गोलशून्य बरोबरीत राहिली.
छत्रपती शाहू स्टेडियममध्ये सुरू असलेल्या के.एस.ए. लीग फुटबॉल स्पर्धेत कोल्हापूर पोलीस संघ विरुद्ध उत्तरेश्वर प्रासादिक वाघाची तालीम मंडळ यांच्यात सामना झाला. सामन्याच्या प्रारंभापासून आक्रमक असणाऱ्या पोलीस संघाच्या निखिल साळोखेने चौथ्या मिनिटास अप्रतिम गोलची नोंद केली. ही आघाडी कमी करण्यासाठी ‘ उत्तरेश्वर’कडून ओंकार वाघमारे, आदित्य भोईटे, निखिल तिबिले, अक्षय बोडके, स्वराज पाटील यांनी सामन्यात बरोबरी आणण्याचा प्रयत्न केला. पूर्वार्धात १-० अशी आघाडी पोलीस संघाकडे राहिली.
उत्तरार्धात ‘उत्तरेश्वर’कडून स्वराज पाटील याने अनेक खोलवर चढाया करीत पोलीस संघाच्या बचावफळीला हैराण केले. ‘पोलीस’चा गोलरक्षक अमर आडसुळे याने अनेक गोल वाचविले. पोलीस संघाच्या बचावफळीत नितीन रेडेकर याने उत्तरेश्वरच्या आघाडीच्या खेळाडूंची आक्रमणे परतावून लावली. अखेरपर्यंत सामन्यात बरोबरी न करता आल्याने निखिल साळोखेच्या एकमेव गोलवर पोलीस संघाने हा सामना १-० असा जिंकला.
दुपारच्या सत्रात पहिला सामना पाटाकडील तालीम मंडळ ‘अ’ विरुद्ध बालगोपाल तालीम मंडळ यांच्यात झाला. दोन्ही संघ तुल्यबळ असल्याने शॉर्ट पासिंग व लॉँग पासिंग करीत गोल करण्याचे प्रयत्न दोन्ही संघांच्या आघाडीच्या खेळाडूंकडून झाले. ‘पाटाकडील’कडून रूपेश सुर्वे, हृषीकेश मेथे-पाटील, अजिंक्य नलवडे, नियाज पटेल यांनी अप्रतिम खेळ केला; तर रूपेश सुर्वेच्या पासवर हृषीकेश मेथे-पाटीलच्या संधी वाया गेल्या. ‘बालगोपाल’कडून सचिन गायकवाड, अभय संभाजीचे, ऋतुराज पाटील, बबलू नाईक, महादेव तलवार, श्रेयस मोरे, रोहित कुरणे यांचा खेळ उत्कृष्ट झाला.
उत्तरार्धात दोन्ही संघांकडून गोल करण्याचे जोरदार प्रयत्न झाले. बालगोपालच्या रोहित कुरणे याने पेनल्टी क्षेत्राबाहेरून मारलेला जोरदार फटका गोलपोस्टवरून गेला. अखेरपर्यंत पूर्ण वेळेत गोल न झाल्याने सामना गोलशून्य बरोबरीत राहिला.


शाहू स्टेडियम येथे चालू असलेल्या के. एस. ए. लीग फुटबॉल स्पर्धेत रविवारी दुपारच्या सत्रात पाटाकडील तालीम मंडळ ‘अ’ विरुद्ध बालगोपाल तालीम मंडळ यांच्यात झालेल्या लढतीमधील चेंडूवर ताबा मिळविण्यासाठी चाललेला क्षण.


आजचे सामने
दुपारी २.०० वाजता - संध्यामठ तरुण मंडळ विरुद्ध उत्तरेश्वर प्रासादिक
दुपारी ४.०० वाजता - पाटाकडील ‘अ’ विरुद्ध दिलबहार ‘अ’

Web Title: Victory of 'Kolhapur Police' Vijay

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.