उपनगराध्यक्ष निवड शुक्रवारी
By Admin | Updated: December 23, 2016 23:00 IST2016-12-23T23:00:09+5:302016-12-23T23:00:09+5:30
जयसिंगपूर नगरपालिका : स्वीकृत सदस्यसंख्या तीन होणार; इच्छुकांकडून मोर्चेबांधणी सुरु

उपनगराध्यक्ष निवड शुक्रवारी
जयसिंगपूर : जयसिंगपूर उपनगराध्यक्ष व स्वीकृत सदस्य निवडीसाठी नगराध्यक्ष नीता माने यांनी ३० डिसेंबरला विशेष सभा आयोजित केली आहे. निवडीचा कार्यक्रम जाहीर झाल्याने इच्छुकांचे लक्ष आता या सभेकडे लागले आहे. नगराध्यक्षांना मतदानाचा अधिकार प्राप्त झाल्याने पालिकेत आता दोनऐवजी तीन स्वीकृत नगरसेवक संख्या होणार असल्यामुळे शाहू आघाडीला दोन स्वीकृत नगरसेवक निवडण्याचा अधिकार प्राप्त झाला आहे.
शासनाकडून नगराध्यक्षांच्या अध्यक्षतेखाली उपनगराध्य व स्वीकृत सदस्यांची निवड करण्याचे आदेश देण्यात आले होते. त्यामध्ये २५ दिवसांत बैठक बोलावण्याबाबत सूचना देण्यात आल्या होत्या. दरम्यान, ३० डिसेंबर रोजी विशेष सभेचे आयोजन नगराध्यक्ष माने यांनी केले आहे. सकाळी १० ते १२ या वेळेत उपनगराध्यक्षपदासाठी अर्ज दाखल होतील. १२ वाजता अर्जांची छाननी होऊन साडेबारापर्यंत अर्ज माघारीची मुदत ठेवण्यात आली असून,
त्यानंतर मतदानप्रक्रिया होऊन उपनगराध्यक्षाची निवड केली जाणार आहे. तर ३० डिसेंबर रोजीच स्वीकृत सदस्यांची घोषणा होणार आहे. दरम्यान, २६ डिसेंबरला या निवडी घेण्याच्या हालचाली झाल्या होत्या. मात्र, गुरुवारी रात्री याबाबत बदल होऊन ३० डिसेंबरला उपनगराध्यक्ष व स्वीकृत सदस्य निवडीसाठी विशेष सभा घेण्याचा निर्णय झाला.
दरम्यान, उपनगराध्यक्ष पदासाठी महिला नगरसेवकाला शाहू आघाडीकडून संधी दिली जाण्याची शक्यता आहे. यामुळे या पदावर वर्णी कोणाची लागणार याकडे लक्ष लागले आहे. १३ सदस्यसंख्येमुळे शाहू आघाडीला दोन स्वीकृत सदस्य निवडण्याचे अधिकार मिळाले आहेत. संभाजी मोरे यांची स्वीकृत सदस्यपदी निवड निश्चित मानली जात
असून, सा. रे. पाटील गटाकडून संधी कोणाला? याबाबत उत्सुकता आहे. (प्रतिनिधी)
‘शाहू’कडे दोन स्वीकृत
नगराध्यक्षांना मतदानाचा अधिकार प्राप्त झाल्यामुळे सभागृहात २४ नगरसेवक व नगराध्यक्ष असे २५ संख्याबळ असणार आहे. शासनाकडून मिळालेल्या आदेशानुसार यापुढे सभागृहात तीन स्वीकृत नगरसेवक असणार आहेत.
सर्वाधिक तेरा सदस्यसंख्या असल्यामुळे शाहू आघाडीला दोन स्वीकृत नगरसेवक निवडता येणार आहेत; अशी माहिती मुख्याधिकारी हेमंत निकम यांनी दिली.