पशुवैद्यकीय सेवा रिक्त पदांमुळे "व्हेंटिलेटर"वर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 30, 2020 04:31 IST2020-12-30T04:31:37+5:302020-12-30T04:31:37+5:30

* चार वर्षांपासून तालुका पशुधन अधिकारी मिळेना संदीप बावचे जयसिंगपूर: शिरोळ तालुक्यातील पशुसंवर्धन विभागाला रिक्त पदांचे ग्रहण लागले ...

Veterinary service vacancies due to "ventilator" | पशुवैद्यकीय सेवा रिक्त पदांमुळे "व्हेंटिलेटर"वर

पशुवैद्यकीय सेवा रिक्त पदांमुळे "व्हेंटिलेटर"वर

* चार वर्षांपासून तालुका पशुधन अधिकारी मिळेना

संदीप बावचे

जयसिंगपूर: शिरोळ तालुक्यातील पशुसंवर्धन विभागाला रिक्त पदांचे ग्रहण लागले आहे. या विभागात महत्त्वाची पदे रिक्त असल्याने शासकीय यंत्रणेला पशुवैद्यकीय सेवा देण्यास अडचणी भासत आहेत. २२ पैकी दहा पशुवैद्यकीय दवाखान्यांत डॉक्टरच नसल्याने अडचणी येत आहेत. तालुका पशुधन विकास अधिकाऱ्याचे पद चार वर्षांपासून रिक्त असून शासनाने रिक्त पदे भरणे गरजेची आहेत.

शिरोळ तालुक्यात एकूण २२ पशुवैद्यकीय दवाखाने आहेत. त्यात जिल्हा परिषदेचे सहा तर केंद्र सरकारच्या सोळा दवाखान्यांचा समावेश आहे. मात्र, त्यापैकी दहा पशुधन विकास अधिकाऱ्यांची पदे रिक्त आहेत तर तालुका पशुधन विकास अधिकाऱ्यांचे पददेखील चार वर्षांपासून रिक्त आहे. त्यामुळे या पदाचा अतिरिक्त कार्यभार पन्हाळ्याचे अधिकारी डॉ. रोहित रानभरे यांच्याकडे सोपविण्यात आला आहे. तालुक्यात ८८५०१ जनावरांची संख्या आहे. मात्र, पशुधनावर उपचार करण्यासाठी शासकीय यंत्रणा अपुरी पडत आहे. त्यामुळे पशुपालकांना खासगी पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांवर अवलंबून राहावे लागते. दूध संघांकडून सभासदांच्या पशुधनासाठी सेवा पुरविली जात असली तरी लसीकरण हे शासकीय यंत्रणेकडूनच करून घ्यावे लागते.

कृष्णा, पंचगंगा, वारणा व दूधगंगा या बारमाही वाहणाऱ्या नद्यांमुळे शेती हा प्रमुख व्यवसाय आहे. त्याला पशुधनाचा जोड व्यवसाय म्हणून शेतकरी गाय, म्हैस ही दुभती जनावरे वाढवून दूध व्यवसायाकडे वळल्यामुळे अर्थकारण वाढले आहे. मोठ्या प्रमाणात गावागावांमध्ये दूध संस्थांची संख्याही मोठी आहे. मात्र, पशुधनावर उपचार करण्यासाठी पशुवैद्यकीय अधिकारीच नसल्यामुळे अडचणी येतात.

चौकट - पदे भरणे गरजेचे

जिल्हा परिषदेकडे श्रेणी-१ चे दोन पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांचे पद रिक्त आहे तर केंद्र सरकारच्या श्रेणी-१ चे दोन तर श्रेणी-२ चे सहा पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांची पदे रिक्त आहे. अपुऱ्या पदांमुळे पशुवैद्यकीय सेवा देताना शासकीय यंत्रणेची दमछाक होत आहे. त्यामुळे रिक्त पदे भरणे गरजेचे बनले आहे.

Web Title: Veterinary service vacancies due to "ventilator"

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.