जिल्ह्यातील पशुवैद्यकीय दवाखाने बेवारस स्थितीत

By Admin | Updated: December 19, 2014 23:31 IST2014-12-19T21:35:52+5:302014-12-19T23:31:48+5:30

डॉक्टरांची पदे रिक्त : शेतकऱ्यांना आर्थिक भुर्दंड; शासकीय लसीकरण योजनांचा लाभ मिळेना

Veterinary dispensaries in the district are unemployed | जिल्ह्यातील पशुवैद्यकीय दवाखाने बेवारस स्थितीत

जिल्ह्यातील पशुवैद्यकीय दवाखाने बेवारस स्थितीत

अतुल आंबी - इचलकरंजी जिल्ह्यातील पशुवैद्यकीय संस्थांकडे अधिकारी व कर्मचाऱ्यांची पदे मोठ्या प्रमाणात रिक्त असल्याने जिल्ह्यातील अनेक दवाखाने धूळ खात बेवारसपणे पडून आहेत. परिणामी अनेक ठिकाणी परिसरातील नागरिकांनी अतिक्रमण केले आहे, तर ज्या गावातील दवाखाने बंद आहेत, तेथील शेतकऱ्यांना आर्थिक भुर्दंड बसत असून, शासनाकडून येणाऱ्या लसीकरणाच्या योजनांचा लाभही मिळत नाही. परिणामी साथीचे आजार मोठ्या प्रमाणात पसरत आहेत.
जिल्ह्यात पशुवैद्यकीय दवाखान्यांमध्ये जिल्हा परिषद व राज्यस्तरीय असे दोन विभाग करण्यात आले आहेत. यामध्ये जिल्हा परिषदेकडे पशुधन विकास अधिकारी वर्ग-१ ची ९५ मंजूर पदे असून, ४३ पदे भरली आहेत व ५२ पदे रिक्त आहेत. सहायक अधिकारी वर्ग- ३ ची १५ पैकी १० पदे भरली असून, ५ रिक्त आहेत, तर पशुधन पर्यवेक्षक दोन पदे रिक्त आहेत. राज्यस्तरीय शासनाच्या पशुवैद्यकीय ३६ दवाखान्यांत एकूण ३६ अधिकारी, ३६ कर्मचारी पदे मंजूर असून, त्यातील चौदा पदे रिक्त आहेत. यामध्ये साजणी, माणगाव, चंदूर, कुंभोज, सावर्डे, पारगाव, दत्तवाड, दानोळी, यड्राव, हेरवाड, शिरढोण, जांभळी, आदी गावांचा समावेश आहे. या गावांमध्ये वैद्यकीय अधिकारी व कर्मचारी नसल्याने शेतकऱ्यांना आपली जनावरे खासगी डॉक्टरांकडे तपासून घ्यावी लागतात. महागड्या औषधोपचारांमुळे शेतकऱ्यांना आर्थिक भुर्दंड बसत आहे. तसेच शासकीय लसीकरण योजनांचा लाभही शेतकऱ्यांना मिळत नाही. परिणामी साथीचे आजार मोठ्या प्रमाणात पसरतात.
तसेच आता या आकडेवारीमध्ये वाढ झाली असल्याची शक्यता आहे. मात्र, पशुवैद्यकीय दवाखाने आणि वैद्यकीय अधिकारी व कर्मचारी यांची संख्या मात्र वाढण्याऐवजी घटली आहे. दूध उत्पादनात सधन मानल्या जाणाऱ्या जिल्ह्यात शेतकऱ्यांना सरकारी दवाखान्यात आपल्या जनावरांचे उपचार करण्यासाठी धडपड करावी लागत आहे. काही दवाखान्यात वैद्यकीय अधिकारी नाहीत. काही ठिकाणी आठवड्यातून एक-दोन दिवस डॉक्टरांची उपस्थिती असते. त्यामुळे जनावरे दवाखान्यात आणून परत न्यावी लागतात. जनावरांची हेळसांड थांबविण्यासाठी शासनाने डॉक्टरांची रिक्त पदे तत्काळ भरावीत, अशी मागणी शेतकरी वर्गातून होत आहे.


जिल्ह्यातील आकडेवारी
२००७ च्या पशुगणनेनुसार एकूण दोन लाख ५३ हजार ३४७ गायी, सहा लाख ४६ हजार २१७ म्हशी, एक लाख ९१ हजार ४५९ शेळ्या, एक लाख ६५ हजार ६६८ मेंढ्या, आठ लाख ६८ हजार ३१९ कोंबड्या, एक हजार ६९६ घोडे, १३६ गाढवे, चार हजार ५८६ डुकरे, असे २१ लाख ३१ हजार ४२८ जनावरे आहेत, तर पाळीव कुत्रे, ससे व अन्य जनावरांची नोंद नाही.

Web Title: Veterinary dispensaries in the district are unemployed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.