कागणीनजीक रस्त्यावर थांबवलेली वाहने देताहेत अपघातांना आमंत्रण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 14, 2021 04:21 IST2021-04-14T04:21:42+5:302021-04-14T04:21:42+5:30
कागणी-कालकुंद्री रस्त्यालगत कागणी (ता. चंदगड) येथे रस्त्याच्या दुतर्फा उभी असणारी वाहने रहदारीला अडथळा ठरत असून, अपघाताना आमंत्रण देत आहेत. ...

कागणीनजीक रस्त्यावर थांबवलेली वाहने देताहेत अपघातांना आमंत्रण
कागणी-कालकुंद्री रस्त्यालगत कागणी (ता. चंदगड) येथे रस्त्याच्या दुतर्फा उभी असणारी वाहने रहदारीला अडथळा ठरत असून, अपघाताना आमंत्रण देत आहेत. ती तत्काळ बाजूला करून रस्ता वाहतुकीस सुरळीत करावा, अशी मागणी प्रवासी व वाहनधारकांतून होत आहे.
गडहिंग्लज, नेसरी, कोवाड ते बेळगाव मार्गापासून कागणी, कालकुंद्री, कुदनूर, दड्डी मार्गे हत्तरगी येथील राष्ट्रीय महामार्गाला जोडणाऱ्या या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात वाहनांची वर्दळ आहे.
या मार्गावरून लहान-मोठी वाहने यावरून ये-जा करतात. कागणी गावानजीक या रस्त्यालगत ट्रक, ट्रॅक्टर, ट्रॉली व चार चाकी वाहने थांबवलेली असतात.
घरांसमोर लाकडे, दगड, विटा व शेणाचे ढिगारे टाकून नागरिकांनी रस्त्यावर अतिक्रमण केले आहे. त्यामुळे वाहतुकीस अडथळा होऊन अपघाताचे प्रसंग घडत आहेत.
दोन दिवसांपूर्वी थांबवलेल्या ट्रॉलीमुळे वाळू वाहतूक करणारा ट्रक व पिंजर भरलेला ट्रॅक्टर यांच्यात धडक झाली. अन्य वाहनांमुळे समोरून मोठे वाहन आल्यास दुचाकीलाही वाट मिळत नाही. त्यामुळे संबंधितानी ही वाहने अन्यत्र हलवावीत.
बांधकाम विभागानेही याकडे लक्ष देऊन ग्रामपंचायतींना याबाबत सूचना द्याव्यात, अशी मागणी प्रवासी व वाहनधारकांतून होत आहे.
--------------------------
* फोटो ओळी : कागणी-कालकुंद्री (ता. चंदगड) मार्गावर कायमस्वरूपी थांबवलेल्या अशा वाहनांमुळे अपघात घडत आहेत.
क्रमांक : १३०४२०२१-गड-०५