शाहूपुरी परिसरात दिसेल ती गाडी फोडली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 4, 2018 12:38 AM2018-01-04T00:38:16+5:302018-01-04T00:39:21+5:30

The vehicle that was found in the Shahupuri area was broken | शाहूपुरी परिसरात दिसेल ती गाडी फोडली

शाहूपुरी परिसरात दिसेल ती गाडी फोडली

Next


कोल्हापूर : कोरेगाव भीमा येथे झालेल्या घटनेच्या निषेधार्थ बुधवारी सकाळपासूनच भीमसैनिकांनी पुकारलेल्या ‘बंद’ला उत्तम प्रतिसाद लाभला होता; तरीही काही तरुणांनी प्रथम गुजरी येथील बंद सराफी दुकानांवर दगडफेक करीत मोठ्या प्रमाणात नुकसान केले. हाच जमाव पुढे दसरा चौक येथे आला. या ठिकाणी काही काळ घोषणाबाजी करीत दसरा चौकातील मैदानात पार्किंग केलेल्या के.एम.टी.च्या बसेसवर तुफान दगडफेक केली.
त्यानंतर शेजारील दैनिक ‘तरुण भारत’च्या कार्यालयावर दगडफेक करीत हा जमाव व्हीनस कॉर्नर परिसरातील चौकात आला. या ठिकाणी उसाने भरलेला ट्रॅक्टर अडविण्यात आला. त्यानंतर हाच जमाव पुढे स्टेशन रोडवर आला. त्या ठिकाणी लावण्यात आलेली चारचाकी वाहने व पी. एन. जी., जुन्या उषा टॉकीजवर व अन्य बंद असलेल्या दुकानांवर तुफान दगडफेक केली. हाच जमाव शाहूपुरी व्यापारी पेठ, पुढे वामन गेस्ट हाऊस, हॉटेल अ‍ॅम्बॅसडर, राधाकृष्ण तरुण मंडळ, गृहिणी, पार्श्वनाथ बँक, आदींच्या दारांत दिसेल त्या चारचाकी व दुचाकींवर दगडफेक व लोखंडी रॉडने हल्ला चढविला. त्यात गाड्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान केले. त्याचे पडसाद म्हणून हिंदुत्ववादी कार्यकर्ते व ज्यांची वाहने फोडली असे सर्वजण एकत्रित येत वाहने फोडणाºया कार्यकर्त्यांवर तुटून पडले. त्यात दगडफेक करून पळून जाणाºया दोघांना गोकुळ हॉटेलच्या पाठीमागे पकडले. त्यातून दोघेही निसटले. मात्र, त्यांची दुचाकी कार्यकर्त्यांच्या हाती सापडली. संतप्त कार्यकर्त्यांनी ती दुचाकी पेटविली. काही काळानंतर पोलिसांनी या ठिकाणी येऊन परिस्थिती काबूत आणली व अग्निशमन दलाने आग विझविली.
दरम्यान, एक वाजता काही आंदोलकांनी नगरसेवक राहुल चव्हाण यांच्या घरासमोरील गाड्या फोडल्या. त्यामुळे संतप्त झालेले चव्हाण व त्यांचे कार्यकर्ते स्टेशन रोडवर येऊन ‘रास्ता रोको’ करण्याचा प्रयत्न करीत होते. यावेळी त्यांची समजूत काढत शहर पोलीस उपअधीक्षक डॉ. प्रशांत अमृतकर यांनी तोडफोड केलेल्या गाड्यांची पाहणी केली व गुन्हा दाखल करून कारवाई करण्याचे आदेश दिले. तरीही चव्हाण यांचे समाधान न झाल्याने त्यांनी व्हीनस कॉर्नर चौकात एकत्रित येत जोरदार घोषणाबाजी केली.
पर्यटकांच्या गाड्यांवर तुफान दगडफेक
पर्यटनासाठी आलेल्या पुणे, मुंबई, औरंगाबाद, आदी ठिकाणांचे पर्यटक जेवण करण्यासाठी शाहूपुरीतील वामन गेस्ट हाऊस, अ‍ॅम्बॅसडर हॉटेल, आदी ठिकाणी आले होते. त्यांच्या पार्किंग केलेल्या चारचाकींवर आंदोलक कार्यकर्त्यांनी तुफान दगडफेक केली. त्यामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेल्या पर्यटकांनी याबाबत नाराजी व्यक्त केली. झालेल्या नुकसानीला कुणाला जबाबदार धरायचे, असा सवाल माध्यम प्रतिनिधींसमोर केला.
शाहूपुरी पहिली गल्ली, दुसरी गल्ली या दोन गल्ल्यांमध्ये दिसेल त्या वाहनांवर कार्यकर्ते आक्रमक होत काठी, लोखंडी रॉड व मोठे दगड घेऊन अक्षरश: तुटून पडत होते. त्यातून अनेक वाहनांचे मोठे नुकसान झाले. अशीच परिस्थितीत संपूर्ण स्टेशन रोडवर होती. उषा टॉकीज ते दाभोळकर कॉर्नर परिसरात आंदोलक दिसेल त्या वाहनांच्या व बंद असलेल्या दुकानांच्या काचा फोडत सुटले होते. प्रक्षुब्ध झालेला जमाव दगडफेक करीत वरपर्यंत गेला व पुन्हा खाली दसरा चौकाकडे आला. दुपारी एक वाजल्यापासून पाच वाजेपर्यंत या मार्गांवरील वाहतूक तुरळक होती.
व्हीनस कॉर्नर चौकात सौम्य लाठीमार
बुधवारी दुपारच्या सुमारास दसरा चौकातून व्हीनस कॉर्नर चौकाकडे आला. त्यावेळी जमावाला थांबविण्याचा प्रयत्न पोलिसांनी केला; पण जमाव ऐकण्याच्या मन:स्थितीत नव्हता. जमावावर सौम्य लाठीमार करीत जमावाला पांगविले. त्यामुळे वातावरण काहीवेळ थंड झाले; पण त्यानंतर मोठ्या प्रमाणात जमाव पुन्हा चौकात आला. त्यांनी थेट या चौकातील दोन मोठ्या दुकानांवर दगडफेक केली. त्यामुळे पोलिसांनी लाठीमार केला. यावेळी जमावाने उसाने भरलेली ट्रॅक्टर-ट्रॉली थांबविली व स्टेशन रोडवर ठिय्या मारला. पोलिसांना पाहताच तेथून शाहूपुरी पहिल्या गल्लीत जमाव गेला. तेथे असणाºया चारचाकी, रिक्षा व दुचाकी वाहनांची तोडफोड करीत हा जमाव पुढे मार्गस्थ झाला. त्यामुळे व्हीनस कॉर्नर चौकात तणावपूर्ण वातावरण होते.
केएमटीचेही नुकसान
भीमसैनिकांनी दिलेल्या ‘बंद’च्या हाकेमुळे दसरा चौकातील मैदानात के.एम.टी. बसेस पार्किंग करून ठेवल्या होत्या. त्या ठिकाणी जमलेल्या कार्यकर्त्यांनी तुफान दगडफेक करीत बसेस फोडल्या. त्यामुळे त्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले. या बसेस बंदिस्त सुभाष स्टोअर्स अथवा बुद्ध गार्डनमध्ये पार्क केल्या असत्या तर त्यांचे नुकसान झाले नसते. याबाबतचा निर्णय अधिकाºयांनी का घेतला नाही, असा सवाल नागरिकांतून विचारला जात होता.

Web Title: The vehicle that was found in the Shahupuri area was broken

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.