वाहन परवान्याची ‘आॅनलाईन’ डोकेदुखी
By Admin | Updated: October 17, 2014 00:51 IST2014-10-17T00:49:54+5:302014-10-17T00:51:50+5:30
शिकाऊ चालकांना त्रास : अर्ज भरण्यासाठी नेट कॅफेत १०० रुपयांचा भुर्दंड

वाहन परवान्याची ‘आॅनलाईन’ डोकेदुखी
कोल्हापूर : दिवसेंदिवस राज्यात दुचाकी व चारचाकी गाड्यांची संख्या वाढत आहे. त्यामुळे वाहन चालविण्याचा परवाना काढणाऱ्यांचीही संख्या वाढू लागली आहे. मात्र, शासनाने नुकत्याच काढलेल्या आदेशानुसार ‘संगणकीय शिकाऊ अनुज्ञप्ती’ अर्थात शिकाऊ परवान्यासाठी पूर्वनियोजित वेळ घ्यावी लागत आहे. याकरीता नेटकॅफेमध्ये अर्ज करताना उमेदवाराला शंभर रुपये मोजावे लागत आहेत. त्यामुळे सध्या प्रादेशिक परिवहन कार्यालयात आलेल्या उमेदवारांना शासकीय
फी पेक्षा भरणावळ खर्चच जास्त द्यावा लागत आहे. राज्य शासनाच्या परिवहन खात्याने एजंटगिरीला आळा घालण्यासाठी वाहन चालविण्याचा शिकाऊ परवाना मिळविण्यासाठी आॅनलाईन प्रक्रीया सुरु केली. मात्र, ही सोय उमेदवारांच्या गैरसोयीचीच अधिक होत आहे. प्रादेशिक परिवहन विभागाकडे शिकाऊ परवाना काढण्यासाठी केवळ ३१ रुपये फी आहे. मात्र, नेटकॅफेवर अर्ज भरण्यासाठी व प्रिंट काढण्यासाठी नेटधारक शंभर रुपये आकारत आहेत. त्यामुळे शासकीय फीपेक्षा अर्ज भरणावळ खर्च अधिक झाला आहे. दररोज या आॅनलाईन प्रणालीद्वारे १२० इतक्या परीक्षार्थींना परवाना देण्याचा कोटा आहे. त्यानुसार दिवसाला ८० इतके परवाने कोल्हापूर येथील कार्यालयाकडून दिले जात आहेत. पूर्वनियोजित वेळेनुसार या उमेदवारांची आॅनलाईन संगणकीय चाचणी घेतली जाते. या चाचणीत उत्तीर्ण होणाऱ्या उमेदवारांना शिकाऊ परवाना दिला जातो. एक सप्टेंबरपासून अशा पद्धतीने इंटरनेटद्वारे पूर्वनियोजित वेळ घेणे बंधनकारक केले आहे. त्याप्रमाणे १५ आॅक्टोबरपर्यंत १४०० उमेदवारांनी या योजनेनुसार शिकाऊ परवाना घेतला. परीक्षार्र्थींमध्ये केवळ २१४ जण नापास झाले आहेत. नापास झालेल्या उमेदवारांना पुन्हा दुसऱ्या दिवशी परीक्षेसाठी पाचारण केले जाते. मात्र ही पद्धत गैरसोयीचीच ठरत आहे.
शिकाऊ परवान्यासाठी आॅनलाईन अपॉईमेंट अर्थात पूर्वनियोजित वेळ घेण्याच्या प्रक्रियेची माहिती संकेतस्थळावर दिली आहे. त्यानुसार नेटद्वारे अर्जही सर्वसामान्यांना भरता येतो. मात्र, काही मंडळी अर्ज भरण्यासाठी जादा पैसे आकारत असतील, तर त्यांच्यापासून सावध राहावे. याचबरोबर अगदी दहा रुपयांमध्ये अशाप्रकारचे अर्ज भरण्यासाठी लवकरच ‘सेतू’कडे विचारणा के ली जाईल. सर्वसामान्यांनी ६६६.२ं१ं३ँ्र.ल्ल्रू.्रल्ल या संकेतस्थळावर भेट दिल्यास शिकाऊ परवाना कसा काढायचा याची सर्व माहिती तत्काळ व सोप्या भाषेत मिळेल
- लक्ष्मण दराडे (प्रादेशिक परिवहन अधिकारी, कोल्हापूर)