जिल्ह्यात चार माणसांमागे एक वाहन
By Admin | Updated: January 19, 2015 00:31 IST2015-01-18T23:37:08+5:302015-01-19T00:31:15+5:30
वाहने झाली उदंड : वर्षाला ५० हजार वाहने रस्त्यावर; दोन वाहने असलेली कुटुंबे अधिक

जिल्ह्यात चार माणसांमागे एक वाहन
अंजर अथणीकर - सांगली जिल्ह्यामध्ये वाहनांची संख्या दिवसेंदिवस वाढत असून वर्षाला किमान ५० हजार वाहने नव्याने रस्त्यावर येत आहेत. आज जिल्ह्यामध्ये ६ लाख ६८ हजार ४२२ वाहने आहेत. याचे जिल्ह्यातील लोकसंख्येचे प्रमाण काढले असता, तब्बल चार माणसामागे एक इतके प्रमाण वाढले आहे. कुटुंबामध्ये किमान दोन वाहने, अशी संख्या झाली आहे.
सांगली जिल्ह्यामध्ये गेल्या दहा वर्षात वाहनांच्या विक्रीचा वेग वाढला आहे. वाहन विक्रेत्यांची सुलभ कर्ज पध्दती व गरज म्हणूनही वाहनांची संख्या वेगाने वाढत आहे. विशेषत: कार आणि दुचाकींची संख्या वेगाने वाढत आहे. सांगली जिल्ह्याची लोकसंख्या सुमारे तीस लाख असून, वाहनांची संख्या ६ लाख ६८ हजार ४२२ इतकी आहे. त्यामुळे याचे माणसी प्रमाण जवळपास साडेचार लोकांमागे एक वाहन असे झाले आहे. वर्षाला ५० ते ५५ हजार वाहने नव्याने रस्त्यावर येत आहेत. प्रौढ लोकसंख्येचा विचार केला, तर तीन माणसांमागे एक वाहन असे प्रमाण होते.
वाहनांची संख्या भरमसाट वाढल्याने विशेषत: शहरी भागात पार्किंगचा प्रश्न गंभीर बनत चालला आहे. अनेक कुटुंबांना आता रात्रीच्या वेळी वाहन लावण्याची समस्या सतावत आहे. बहुतांशी अपार्टमेंटमध्ये पार्किंग व्यवस्था नसल्याने त्यांचाही प्रश्न गंभीर बनला आहे.
दिवसेंदिवस रस्ते अपघातांचे प्रमाणही वाढत असून हे अपघात बहुतांशी वेळा मानवी चुकांमुळेच घडत आहेत. वाहन चालविताना सदैव वाहतूक नियमांचे पालन करण्याची दक्षता प्रत्येकानेच घेणे, आज काळाची गरज आहे. अपघातांचे प्रमाण कमी व्हावे यासाठी वाहतुकीचे नियम पाळण्यासंदर्भात वाहनचालक व नागरिक यांच्यामध्ये जागृतीसाठी ११ ते २५ जानेवारी या कालावधित रस्ता सुरक्षा अभियान राबविले जात आहे.
दुचाकी, कारची संख्या वाढली
जिल्ह्यामध्ये दुचाकी आणि कारची संख्या वेगाने वाढत आहे. महिन्याला सुमारे चार हजार वाहने नव्याने रस्त्यावर येत असताना, यामध्ये दुचाकींची संख्या ही जवळपास तीन हजार आहे. त्यानंतर जीप, कार यांची संख्याही पाचशेहून अधिक आहे. मालवाहतुकीच्या छोट्या वाहनांची संख्याही वाढत आहे. गेल्या वर्षभरात एकूण वाहनांच्या संख्येमध्ये दुचाकी ९.४६ टक्के, कार १२.२२ टक्के, जीप १२ टक्के, तर ट्रकच्या संख्येत ३.८२ टक्के वाढ झाली आहे.
वर्षात तीनशे जणांचा अपघाती बळी
एकीकडे वाहनांची संख्या वाढत असताना दुसरीकडे अपघातांचे प्रमाणही वाढत आहे. सांगली जिल्ह्यात गेल्या वर्षभरात ३०० जण अपघातांमुळे दगावले आहेत. यामध्ये तरुणांची संख्या अधिक आहे. अपंगत्व आलेल्यांची संख्याही हजारहून अधिक आहे. सुमारे दीड हजार अपघातांची वर्षभरात नोंद झाली आहे. वाहतूक नियमांचे पालन न करणे, मानवी चुका, त्याचबरोबर वाहन व रस्ते खराब आदी कारणे अपघात वाढण्यासाठी कारणीभूत ठरत आहेत. सार्वजनिक वाहनांचा वापरही दिवसेंदिवस कमी होत चालला आहे.
१९८० मध्ये होते दहा हजार लोकांमागे एक वाहन
गेल्या दहा वर्षात वाहनांची संख्या वेगाने वाढली आहे. सांगली जिल्ह्यामध्ये १९८० मध्ये दहा हजार लोकांमागे केवळ एक वाहन होते. इतकी अल्प वाहनांची संख्या होती. आता साडेचार लोकांमागे एक वाहन झाले आहे. २००० पासून वाहनांचा वेग वाढला आहे.
जिल्ह्यातील सध्याची वाहनांची संख्या
दुचाकी : ५,0९,३५०
कार : ५१,९८९
जीप : १९,५६८
ट्रक : ९०,0२१
टँकर : ६८७
डिलिव्हरी व्हॅन : २०,८८०
ट्रॅक्टर : २५,३७२
ट्रेलर : १८,0९८
जेसीबी, क्रेन : १,0१०
रिक्षा : ८,७०४
४एकूण : ६,६८,४२२