भाजीपाला, फळ मार्केट तेजीत
By Admin | Updated: July 28, 2014 00:04 IST2014-07-27T23:26:52+5:302014-07-28T00:04:31+5:30
शाबू कडाडला : श्रावणामुळे उलाढाल वाढली

भाजीपाला, फळ मार्केट तेजीत
कोल्हापूर : श्रावण महिना सुरू झाल्याने शाबू, नारळासह भाजीपाला व फळांच्या दरात वाढ झाली आहे. शाबूच्या दरात किलोमागे तब्बल आठ रुपयांची, तर नारळाच्या दरात तीन रुपयांची वाढ झाली आहे. गेला महिनाभर शांतता असलेल्या कडधान्य मार्केटमध्ये थोडी रेलचेल सुरू झाली आहे.
श्रावण महिना सुरू झाल्याने उपवासामुळे मार्केटमधील उलाढाल वाढली आहे. भाजीपाला मार्केटमध्ये मागणी वाढल्याने या आठवड्यात थोडी तेजी दिसू लागली आहे. येत्या महिन्याभरात भाज्यांच्या दरात आणखी वाढ होईल, असा व्यापाऱ्यांचा अंदाज आहे. वांगी, टोमॅटो, गवार, कारली, भेंडीच्या दरात वाढ झालेली आहे. मेथी, पालक, पोकळा, शेपूच्या दरात वाढ झाली आहे. पेंढीमागे सरासरी तीन ते पाच रुपयांची वाढ झाली आहे.
श्रावण महिन्यास आजपासून सुरुवात झाल्याने त्याचा परिणाम फळ मार्केटवर दिसू लागला आहे. पावसाळ्यामुळे शांत असलेल्या फळ मार्केटने आज बऱ्यापैकी गती घेतली. मोसंबीच्या दरात चुमड्यामागे दोनशे रुपयांची वाढ झालेली आहे. उद्या श्रावणातील पहिला सोमवार असल्याने फळांच्या मागणीत आज वाढ झाली. रविवारी लक्ष्मीपुरी आठवडी बाजारात भाज्यांसह फळांची मागणी जोरात होती. परिणामी संत्री, चिक्कू, पेरू, सफरचंद, डाळींब, सीताफळ, अननसच्या दरातही वाढ झाली आहे. केळीची आवक वाढल्याने दरात वाढ दिसत नाही. किरकोळ बाजारात साठ रुपये किलोच्या डाळींबाचा दर ८० रुपयांवर गेला आहे. शाबूचा दर ७२ वरून ८० रुपयांवर गेला आहे. उपवासाला शाबू लागत असल्याने दरातही वाढ झालेली आहे. शाबू, नारळ, तूरडाळ याप्रमाणे सरकी तेलाच्या दरातही वाढ झाली आहे. (प्रतिनिधी)