गडहिंग्लज : कोल्हापूर येथील वीरशैव को- ऑपरेटिव्ह बँकेचे विद्यमान अध्यक्ष सदानंद राजकुमार हत्तरकी (वय ५१, रा. हलकर्णी, ता. गडहिंग्लज) यांचे अल्पशा आजाराने निधन झाले.त्यांच्या पश्चात पत्नी, २ मुले, आई, बहिण, भाऊ असा परिवार आहे.बेळगाव येथील के.एल.ई.रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते.मंगळवारी मध्यरात्री त्यांची प्राणज्योत मालवली. जन्मगावी हलकर्णी येथे आज, बुधवारी (३) दुपारी २ वाजता त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध संघ 'गोकुळ'चे संचालक म्हणूनही त्यांनी काम पाहिले.गडहिंग्लज तालुका सहकारी साखर कारखाना व हलकर्णी भाग शिक्षण प्रसारक मंडळाचे संचालक म्हणूनही ते काम पहात होते. 'काँग्रेस'चे जेष्ठ नेते, 'गोकूळ' दूध संघ आणि वीरशैव बँकेचे माजी अध्यक्ष राजकुमार हत्तरकी आणि माजी जिल्हा परिषद सदस्या रेखाताई हत्तरकी यांचे ते चिरंजीव तर बेळगाव येथील उद्योजक शिवशंकर हत्तरकी यांचे ते कनिष्ठ बंधू होत.
वीरशैव बँकेचे अध्यक्ष सदानंद हत्तरकी यांचे निधन
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 3, 2024 11:31 IST