सरनोबत यांच्यामुळेच रखडले विविध प्रकल्प
By Admin | Updated: January 2, 2015 00:21 IST2015-01-01T23:31:00+5:302015-01-02T00:21:37+5:30
सचिन चव्हाण : प्रशासनाविरुद्ध लढणार

सरनोबत यांच्यामुळेच रखडले विविध प्रकल्प
कोल्हापूर : स्थायी समिती सभापतिपदाच्या एक वर्षाच्या कारकिर्दीत थेट पाईपलाईन, ‘केएमटी’ची १०४ नव्या बसेसची खरेदी, कसबा बावडा सांडपाणी प्रक्रिया केंद्र, १५३ कर्मचाऱ्यांना कायम करणे, आदी योजना मार्गी लावल्याचे समाधान आहे. मात्र, एलईडी स्ट्रीट लाईटसह मल्टिलेव्हल कार पार्किंग, नवीन प्रशासकीय इमारत, रंकाळा संवर्धन, पर्यटन विकास हे विषय निव्वळ प्रशासकीय ढिलेपणामुळे मागे राहिले. या सर्वांसाठी शहर अभियंता नेत्रदीप सरनोबत हेच जबाबदार आहेत, असा आरोप स्थायी समिती सभापती सचिन चव्हाण यांनी आज, गुरुवारी पत्रकार परिषदेत केला.
सचिन चव्हाण यांचा स्थायी समिती सभापतीचा कार्यकाल ३१ डिसेंबरला संपला. नवीन सभापतीची निवड उद्या, शुक्रवारी होत आहे. तत्पूर्वी, चव्हाण यांनी एक वर्षाच्या कारकिर्दीचा आढावा घेतला. प्रशासकीय ढीलेपणामुळे अनेक प्रकल्प कागदावरच राहिल्याची खंत त्यांनी यावेळी व्यक्त केली.
चव्हाण म्हणाले, ‘केएमटी’ वाचविण्यासाठी एक कोटी रुपयांचे अनुदान महापालिकेच्या बजेटमधून दिले. १०४ बसेस आल्यानंतरही वडापवर ठोस कारवाईशिवाय ‘केएमटी’ला ऊर्जितावस्था अशक्य आहे. ‘केएमटी’ फायद्यात यावी, यासाठी यापुढेही प्रयत्न करणार आहे. रंकाळा तलाव संवर्धन, पर्यटन विकास, पार्किंग व्यवस्था, नवीन अद्यायावत शासकीय इमारत, आदी मोठे प्रकल्प नेत्रदीप सरनोबत यांच्या ढिसाळ कारभारामुळेच रेंगाळले आहेत. स्थायी सभापतिपदाच्या कारकिर्दीबाबत अत्यंत समाधानी असून भविष्यात पक्ष व नेते जी जबाबदारी देतील ती पूर्ण करू, असेही त्यांनी यावेळी जाहीर केले. (प्रतिनिधी)
चार वर्षातील प्रकल्प सांगा अन् बक्षीस मिळवा
अभियंता सरनोबत यांनी गेल्या चार वर्षांत मार्गी लावलेला एक प्रकल्प सांगा, अन् बक्षीस मिळवा, असे आवाहनही सचिन चव्हाण यांनी केले.