‘डॉक्टर्स डे’निमित्त ‘केएमए’तर्फे विविध उपक्रम
By Admin | Updated: July 2, 2015 01:03 IST2015-07-02T01:02:34+5:302015-07-02T01:03:00+5:30
स्वच्छ भारत मोहिमेस पाठिंबा : ‘डॉक्टर-रुग्णातील सुसंवाद’ यंदाचे ब्रीदवाक्य

‘डॉक्टर्स डे’निमित्त ‘केएमए’तर्फे विविध उपक्रम
कोल्हापूर : ‘डॉक्टर्स डे’निमित्त कोल्हापूर मेडिकल असोसिएशनच्यावतीने स्वस्थ भारत अभियानांतर्गत वर्षभर विविध उपक्रम राबविण्यात येणार आहेत. यंदाच्यावर्षी ‘डॉक्टर-रुग्णातील सुसंवाद’ हे ब्रीदवाक्य असून त्यानुसार संस्था काम करणार असल्याची माहिती अध्यक्ष डॉ. पी. एम. चौगुले यांनी पत्रकार परिषदेत दिली.
चौगुले म्हणाले, इंडियन मेडिकल असोसिएशनने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या आवाहनानुसार स्वच्छ भारत अभियानाला सक्रिय पाठिंबा दिला आहे. कारण स्वच्छता आणि आरोग्याचा घनिष्ठ संबंध आहेत. त्यासाठी स्वच्छतेचा प्रसार महत्त्वाचा आहे. म्हणून त्याअंतर्गत यावर्षी ‘आयएमए’ने डॉक्टर आणि रुग्णांतील संबंध या विषयावर जागृती करण्याचे नियोजन केले आहे. भारतात लोक डॉक्टरांना देव मानतात पण अनेकदा डॉक्टरांच्याही हातात रुग्णांना वाचवणे शक्य नसते. अशावेळी नातेवाईकांनी डॉक्टरांना समजून घेतले पाहिजे.
आपल्याला काही आजार झाला असे समजले की रुग्ण डॉक्टरांकडे येतात पण नागरिकांनी आजारीच पडू नये यासाठी कोणती काळजी घ्यावी. आजारपण टाळण्यासाठी कोणत्या गोष्टी महत्त्वाच्या असतात यावर ‘केएमए’ काम करणार आहे. चुकीची जीवनशैली, ताण-तणाव, अचानक उद्भवणारे आजार, पुढे होऊ शकणारे आजार आणि ते होऊ नयेत म्हणून आज घ्यावी लागणारी खबरदारी यावर ्असोसिएशन विविध व्याख्याने, चर्चासत्र, परिसंवाद आयोजित करणार आहे. तसेच याविषयी प्रत्येक गावा-गावांत जनजागृती करण्यात येणार आहे. स्वच्छ, जनजागृती याशिवाय रक्तदान शिबिर, बालआरोग्य केंद्र, वार्षिक कॉन्फरन्स, पौगंडावस्थेतील मुला-मुलींना मार्गदर्शन असे विविध उपक्रम घेण्यात येणार असल्याचे चौगुले यांनी सांगितले.
परिषदेस सचिव डॉ. अशोक जाधव, डॉ. प्रकाश पाटील, डॉ. अमोल कोडोलीकर, डॉ. रवींद्र शिंदे उपस्थित होते. ( प्रतिनिधी )
शाम ए गझल
‘डॉक्टर्स डे’निमित्त कोल्हापूर मेडिकल असोसिएशनच्या आर्टस् सर्कलतर्फे रविवारी (दि.५) ‘शाम ए गझल’ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. शाहू स्मारक भवन येथे संध्याकाळी ६ वाजता होणाऱ्या या कार्यक्रमात डॉक्टर्स गीत-संगीत, नृत्य, शेरो-शायरी, कव्वालीचे सवाल जवाब, सुफी गीत असे सांस्कृतिक कार्यक्रम सादर करणार आहेत.