सामाजिक न्याय विभागाच्या शाळांमध्ये मुख्याध्यपकांची वाणवा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 21, 2021 04:28 IST2021-08-21T04:28:51+5:302021-08-21T04:28:51+5:30
मार्केट यार्ड : शासनाच्या सामाजिक न्याय विभागामार्फत अनुसूचित व नवबौद्ध विद्यार्थ्यांसाठी चालविल्या जात असलेल्या जिल्ह्यातील एकाही निवासी शाळेला ...

सामाजिक न्याय विभागाच्या शाळांमध्ये मुख्याध्यपकांची वाणवा
मार्केट यार्ड : शासनाच्या सामाजिक न्याय विभागामार्फत अनुसूचित व नवबौद्ध विद्यार्थ्यांसाठी चालविल्या जात असलेल्या जिल्ह्यातील एकाही निवासी शाळेला मुख्याध्यापक नाही. त्यामुळे या निवासी शाळांचा कारभार रामभरोसे सुरू असून, त्याचा परिणाम विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीवर होत आहे. शासनाने या शाळांमध्ये तत्काळ मुख्याध्यपकांची नेमणूक करावी, अशी पालकांची अपेक्षा आहे.
जिल्ह्यात मसूद माले, गगनबावडा, राधानगरी, शिरोळ अशा चार ठिकाणी अनुसूचित व नवबौद्ध विद्यार्थ्यांसाठी शासनाच्या सामाजिक न्याय विभागामार्फत निवासी शाळा चालवल्या जातात. या प्रत्येक शाळेची पटसंख्या दोनशेच्या आसपास असून, सुमारे ८०० विद्यार्थ्यांचे भविष्य शाळांमधून घडवले जात आहे. मात्र यापैकी एकाही शाळेला मुख्याध्यापक नसल्यामुळे तेथील कामकाज शिक्षकांवर सुरू आहे. मुख्याध्यापकांविना सुरु असलेल्या या शाळेतील विद्यार्थ्यांचे भवितव्य अंधूक झालेले असून, या शाळांमधून जिल्हाधिकारी किंवा मोठ्या पदावर जाण्याची स्वप्नं पाहणारे विद्यार्थी कसे घडणार, असा प्रश्न यानिमित्ताने उपस्थित केला जात आहे. या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांच्या भवितव्याचे गांभीर्य विचारात घेऊन शासनाने या शाळांना त्वरित मुख्याध्यापक नेमून विद्यार्थ्यांना न्याय देणे गरजेचे आहे.
कोट-
सामाजिक न्याय विभागामार्फत जिल्ह्यामध्ये चालवल्या जाणाऱ्या चारही निवासी शाळा मुख्याध्यापकांविना चालवल्या जात आहेत ही वस्तुस्थिती आहे. शासन स्तरावर या प्रश्नाचे गांभीर्य विचारात घेऊन पाठपुरावा सुरू आहे.
- विशाल लोंढे
सहाय्यक आयुक्त
सामाजिक न्याय विभाग
कोल्हापूर.