जयसिंगपूर (जि. कोल्हापूर) : महादेवी ऊर्फ माधुरी हत्तिणीची देखभाल करण्यासाठी वनताराच्या वैद्यकीय व अभियंता विभागाने बुधवारी नांदणी येथील मठाचे मठाधिपती स्वस्तिश्री जिनसेन भट्टारक महाराज व विश्वस्तांच्या उपस्थित जागेची पाहणी केली. यावेळी मठाने दाखविलेल्या जागेवर चांगल्या पद्धतीने सर्व सुविधायुक्त हत्तीचे संगोपन केंद्र उभारणार असल्याची माहिती स्वस्तिश्री जिनसेन भट्टारक महास्वामीजी यांनी दिली.उच्च न्यायालय व सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयावरून नांदणी मठाची हत्तीण वनतारा येथील केंद्रात पाठविली होती. यानंतर कोल्हापूर जिल्ह्यात महादेवी हत्तीण परत करा, या मागणीसाठी जनक्षोभ रस्त्यावर आल्यानंतर राज्य सरकारच्या बैठकीनंतर नांदणी मठाच्या जागेत वनताराच्या मार्गदर्शनाखाली हत्ती पुनर्वसन केंद्र सुरू करण्याचा निर्णय घेतला होता.या निर्णयानंतर बुधवारी वनतारा जामनगर येथील वैद्यकीय विभाग व इतर सुविधांसाठी बांधकाम विभागाचे तज्ज्ञ याप्रमाणे वनताराच्या तीन पदाधिकाऱ्यांनी जागेची पाहणी केली. यावेळी मठाधिपती भट्टारक महाराजांनी सहा एकर जागेत नांदणी मठाच्या हत्तिणीबरोबरच सांगली, कोल्हापूर व सीमाभागातील हत्तींवरही सोशलायझेशनसह इतर वैद्यकीय उपचार करण्याची सोय येथे करणार असल्याची माहिती दिली. यावेळी मठाचे विश्वस्त उपस्थित होते.
पुनर्वसन केंद्रासाठी सहा एकर जागामठाने अद्ययावत हत्ती पुनर्वसन केंद्रासाठी सहा एकर जागा दाखविली असून, या जागेवर वनताराच्या मार्गदर्शनाखाली सेंटर उभारणे सहज शक्य असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली. येथे हायड्रो थेरपी तसेच वैद्यकीय सुविधा केंद्र उभारण्यात येणार आहे. नांदणी परिसरातील हवामान हत्तींना अत्यंत चांगले असल्याची माहिती वनताराच्या वैद्यकीय अधिकाऱ्यांनी दिली.