ज्ञान संपन्नता वाढविणारी व्हन्नूरची विद्यामंदिर शाळा
By Admin | Updated: June 23, 2015 00:08 IST2015-06-23T00:08:02+5:302015-06-23T00:08:02+5:30
गुणवंत शाळा

ज्ञान संपन्नता वाढविणारी व्हन्नूरची विद्यामंदिर शाळा
खडकाळ जमीन, काताळाचे साम्राज्य असलेल्या परिसरात हिरवी पाने, विविधरंगी फुले, मेंदीची देखणी रांग बागेची सीमा दाखविणारी. पाण्याचे नळ व त्यातून नेमके हवे तेवढे पाणी जाईल, अशी सोय. हे सगळं बागेचं नयनरम्य दृश्य मनाला प्रसन्नता देणारे. विद्यार्थी, शिक्षक व ग्रामस्थांच्या परिश्रमातून फुललेली ही बाग. मुलींचे झांजपथक लयबद्ध व संगीतमय स्वागताला. मनाचा उल्हास आणि प्रत्यक्ष शाळा व वर्ग पाहताना तो चढत्या क्रमाने वाढत जाण्याचा अनुभव. ज्ञान संपन्नता वाढविणारी ही शाळा आहे ‘अ’ श्रेणीतील कागल तालुक्यातील विद्यामंदिर व्हन्नूर.
येथे पहिली ते सातवीपर्यंत वर्ग असून पटसंख्या २२६ आणि ९ शिक्षक आहेत. या शाळेत इमारत, क्रीडांगण, स्टेज, किचन शेड अशा सुविधा आहेत. स्टेज अगदी कायम स्वरूपाचे व त्यापुढे मंडप आहे. परिपाठावेळी मुलांना ऊन व पावसाचा त्रास होऊ नये म्हणून तसेच स्नेहसंमेलन व अन्य कार्यक्रमांसाठी हे स्टेज उभारले आहे.
शाळेची शून्यातून घोडदौड सुरू आहे. दिवस-रात्र ध्यानात-मनात, विचारात-आचारात शाळा आणि गुणवत्ता हाच निकष पाहणारे शिक्षक येथे आहेत. ‘शाळा गावात पोहोचलीय आणि गाव शाळेत’ अशी स्थिती. शैक्षणिक गुणवत्ता, सामाजिक उपक्रम आणि विद्यार्थ्यांचा बौद्धिक विकास राखण्यात शाळेने सातत्य राखले आहे. ‘रोटरी’ने ४.५० लाख रु. खर्च करून मुला-मुलींसाठी भिंतीसह टाईल्स लावून टॉयलेट व मुताऱ्या बांधून दिल्या आहेत. ग्रंथालयालासुद्धा ५००० रुपयांची देणगी दिली आहे. लोकसहभागातून शैक्षणिक उठावाच्या माध्यमातून बाग, टॉयलेट, ग्रंथखरेदी, स्टेज वगैरेंमुळे शाळा पर्यावरण, श्रमसंस्कार मूल्य, ज्ञानसंवर्धन व स्वच्छता साध्य करणारी आहे.
व्हन्नूर शाळेने शासनाच्या प्रवेश धोरणाचे काटेकोर पालन केले आहे. शाळेत २५ टक्के प्रवेश हा वंचित मुलांना द्यावा, हा शासन निर्णय आहे. शाळेत ४२ टक्के मुले-मुली मिळून मागास व धनगर समाजाची आहेत. बेल्ट, टाय, बूट, सॉक्स, ओळखपत्र अशा युनिफॉर्ममध्ये चेहऱ्यावर आत्मविश्वास असलेली मुल-मुली येथे आहेत. मुलींचे लेझीम पथक आहे. विद्यार्थ्यांसाठी योगासने घेतली जातात. एवढेच काय तर शिक्षक पालकांसाठीही योगासन शिबिराचे आयोजन करतात. अगदी सकाळच्या प्रहरी जवळपास १२० पालक योगासनवर्गाला हजर असतात.
आठ कॉम्प्युटर असलेल्या संगणक कक्षात विद्यार्थी ते हाताळतात. कॉम्प्युटरच्या तासांच्या टाईमटेबलमुळे हा कक्ष सतत बिझी असतो. वर्गनिहाय चौथी ते सातवीपर्यंतचे विद्यार्थी संगणक हाताळतात. अध्ययनासाठी व जनरल नॉलेजसाठी नेट व लॅपटॉप आहे. बागेतील हिरवळ, फुलझाडे, कंपाऊंड लगतचे वृक्ष ही सर्जनशीलता विद्यार्थ्यांच्या परिश्रमातून तयार झाली आहे. इंग्रजी, मराठी भाषेतून परिपाठ, प्रश्नमंजूषा, भाषणं, नकला, नृत्यनाटिका, बालसभा वगैरेत पारंगत असलेली मुलं-मुली ही तर शाळेसाठी भूषणावह. बागकाम वर्गनिहाय वार वाटून दिलेले आहे. शाळा बिनकुलपाची असून विद्यार्थी शाळेत अध्ययनासाठी नियमितपणे येतात. गट व गटप्रमुख ही पद्धत आणि शिस्त व संस्कारातून अध्ययन सुपरव्हिजनशिवायसुद्धा चालू राहते. खेळ, कॉम्युटर व अन्यही सराव शाळेच्या वेळेव्यतिरिक्त चालू असतो. शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्षांचे पटसंख्या, गुुणवत्ता वाढीच्यादृष्टीने योगदान खूप मोठे आहे. शिक्षकांच्या सच्चेपणाची व कृतिशील साथ असून गुणवत्ता सिद्ध करण्यासाठी प्रयत्न होत राहिल्याने जिल्हा परिषदेची शाळा असूनसुद्धा पट टिकून आहे. ‘माझी शाळा’ ही भावना लोकप्रतिनिधींची, पालकांची व ग्रामस्थांची.
- डॉ. लीला पाटील
शाळेची वैशिष्ट्ये
बोलके व्हरांडे, डिजिटल वर्ग, पुस्तक पताका, नकाशे, तक्ते यामुळे विद्यार्थी ज्ञानसमृद्ध होण्यास मदत होत आहे.
पहिली ते सातवीसाठी बेंच व्यवस्था, कॉम्प्युटर लॅब, ग्रंथालय, सुसज्ज प्रयोगशाळा विद्यार्थ्यांसाठी सदैव खुली.
अल्पसंख्येने अप्रगत विद्यार्थी व त्यासाठी जादा तास आहेत. लेखन, वाचन व गणित क्षमता विद्यार्थ्यांमध्ये आहे.
शुद्धलेखन, हस्ताक्षर स्पर्धा, सराव, प्रकट वाचन, तोंडी, लेखी आणि गणिताची तयारी. या गट पद्धतीने अध्ययन व
गट अध्ययन उपक्रम नियोजनबद्ध राबिवले जाते.
तोंडी-लेखी गणित, कोडी, गणिती खेळ, प्रयोग करून लेखन, पाढे पाठांतर वगैरेंमुळे विद्यार्थी गुणवत्तेत मागे नाहीत.
गावातील एखाद्या कुटुंबात दु:खद घटना घडल्यास विद्यार्थी व शिक्षक त्या घरी जाऊन सांत्वन करण्याची पद्धत पाळणारे, सुखद घटनांमध्ये अभिनंदन करून सहभाग, वाढदिवसानिमित्त विद्यार्थी शाळेला पुस्तक भेट देण्याचा पायंडा.
हात धुवादिन, स्वच्छतागृहांची सफाई, बाग, क्रीडांगणाची देखभाल, स्वच्छ भारत मिशनमध्ये सहभाग.
दिवाळी व उन्हाळी सुटीमध्ये संस्कार शिबिर.
मुलांना कोथिंबिरीच्या पेंडीच्या किमतीपासून पंतप्रधानांचे परदेशी दौरे व जागतिक घडामोडींची माहिती
मुक्त लायब्ररी, वृतपत्र वाचन
यातून ‘वाचाल तरच वाचाल’ हा संदेश कृतीत उतरविला आहे.
१२०० पुस्तकांची लायब्ररी व
ओपन लायब्ररी ही संकल्पना राबविली आहे.