भिडे आसमंती ध्वजा वैष्णवांची...!
By Admin | Updated: July 28, 2015 01:24 IST2015-07-28T00:35:49+5:302015-07-28T01:24:14+5:30
कोल्हापूर-नंदवाळ दिंडी : टाळ-मृदंगाच्या तालावर विठूचा गजर

भिडे आसमंती ध्वजा वैष्णवांची...!
कोल्हापूर : टाळ-मृदंग वाजती, आंगदे प्रेमे गर्जती, भद्रजाती विठ्ठलाचे, मुखी विठ्ठलनामाचा गजर... हाती भागवत धर्माची भगवी पताका, डोक्यावर पांढरी टोपी, गळ््यात टाळ, तर महिलांच्या डोईवर तुळशी वृंदावन, टाळ-मृदंगाचा अखंड गजर, संत तुकाराम, संत ज्ञानेश्वरांसह महाराष्ट्रातील विविध संतांच्या प्रतिमा, फुलांनी सजलेला रथ, पालखी अशा लव्याजम्यानिशी कोल्हापूर-नंदवाळ दिंडी मोठ्या उत्साहात झाली. या दिंडीत हजारो भाविकांनी सहभाग घेतला.
श्री ज्ञानेश्वर-माऊली पालखी सोहळा भक्त मंडळाच्यावतीने गेल्या १२ वर्षांपासून कोल्हापूर-नंदवाळ पायी दिंडीचे आयोजन केले जाते. पंढरपूरच्याही आधी विठुराया नंदवाळी आला म्हणून या स्थानाचे विशेष महत्त्व आहे. सोमवारी सकाळी साडेनऊ वाजण्याच्या सुमारास मिरजकर तिकटी येथील विठ्ठल मंदिरात महालक्ष्मी दिनदर्शिकेचे मालक सदाभाऊ शिर्के यांच्या हस्ते विठ्ठलाची आरती झाली. त्यानंतर चांदीच्या पादुका आणि पालखी पूजन रामचंद्र काळे यांच्या हस्ते झाले. यावेळी बाळासाहेब पोवार, रामभाऊ चव्हाण, दिंडीप्रमुख आनंदराव लाड महाराज, आमदार चंद्रदीप नरके, किसन भोसले, पोलीस निरीक्षक अमृत देशमुख, नगरसेवक आर. डी. पाटील, रामचंद्र काळे, रमेश रणदिवे आदी उपस्थित होते.
या सोहळ्यानंतर विणेकरी, टाळकरी, मानाचे अश्व, मानदंड धरणारे मानकरी आणि विठ्ठल नामाचा गजर करणारे वारकरी अशी पायी दिंडी सुरू झाली. अत्यंत शिस्तबद्धरितीने भजन, कीर्तन करत दिंडी बिनखांबी गणेश मंदिर येथून मार्गस्थ झाली. ही दिंडी निवृत्ती चौक, उभा मारुती चौक, खंडोबा तालीम, जुना वाशी नाका, सानेगुरुजी वसाहतीमार्गे पुईखडी येथे आल्यानंतर संकल्पसिद्धी मंगल कार्यालयासमोर दुपारी एक वाजता रिंगण सोहळा झाला. या सोहळ्याचे पूजन महापौर वैशाली डकरे, उपमहापौर ज्योत्सना मेढे-पवार, नगरसेवक शारंगधर देशमुख, सचिन चव्हाण, मधुकर रामाणे, चंद्रकांत घाटगे आदींच्या उपस्थित झाले. दिंडी मार्गावर रामचंद्र कुंभार, अभय देशपांडे, ज्ञानेश्वर गवळी, आमदार नरके यांच्यासह शाहू सैनिक तरुण मंडळ, एकजुटी तरुण मंडळ, गोकुळ दूध संघ, अल्ट्राटेक कंपनी आदींनी फराळाचे वाटप केले. रिंगण सोहळ्यानंतर पालखीने नंदवाळकडे प्रस्थान केले. डॉ. डी. वाय. पाटील हॉस्पिटल, जि. प. आरोग्य विभागाने गरजू भाविकांना प्रथमोपचार दिले.(प्रतिनिधी)
चांदीची पालखी
पुढील वर्षी चांदीची पालखी करण्याचा मानस वारकऱ्यांनी केला आहे. यासाठी ८ किलो चांदी जमा झाली आहे, तर सोमवारी महापौर वैशाली
डकरे, नगरसेवक मधुकर रामाणे, सचिन चव्हाण, नगरसेवक शारंगधर देशमुख, सूरज
देशमुख, कृष्णराव धोतरे यांनी प्रत्येकी एक किलो चांदी देण्याचे जाहीर केले.
दिंडीत अंध वारकरी
अंध युवक मंच (गंधर्वनगरी)चे २५ अंध वारकरी या दिंडीत पायी सहभागी झाले होते. या युवकांनी संपूर्ण १४ किलोमीटरचे वारीचे अंतर सर्वांबरोबर पार केले.
फराळाचे वाटप
आषाढी वारी यात्रेसाठी येणाऱ्या भाविक भक्तांसाठी वाशी येथील व्यापारी संघटना, लोकराजा प्रतिष्ठान तसेच विविध संस्थांनी फराळ व केळी वाटप केले.
नंदवाळमध्ये भक्तीचा महासागर
सडोली (खालसा) : टाळ-मृदंग, हरिनामाचा गजर व धाव विठ्ठला पाव विठ्ठला, महाराष्ट्राची लेक लाडकी वाचव बा, असा विठ्ठलाचा धावा करीत विठ्ठलभक्तीचा महासागर सोमवारी प्रतिपंढरपूर नंदवाळमध्ये लोटला. सोमवारी पहाटे करवीरचे आमदार चंद्रदीप नरके यांच्या हस्ते शासकीय महापूजा पार पडली.
नंदवाळ येथील विठ्ठल मंदिरात कोल्हापूर, रत्नागिरी, बेळगाव, जिल्ह्यांतील भाविकांनी रविवारपासून दर्शनासाठी मोठी गर्दी केली होती. राधानगरी, करवीर तालुक्यातील सडोली, बाचणी, आरे, सावर्डे, हळदी, महे व इतर भागांतून सुमारे १५० दिंड्या ज्ञानोबा-तुकारामच्या गजरात नंदवाळ नगरीमध्ये दाखल झाल्या होत्या.
नंदवाळ येथील विठ्ठल मंदिरात सोमवारी पहाटे आमदार नरके यांच्या हस्ते व शंकर शेळके, शंकर फाटक, पोलीसपाटील भीमराव पाटील, भोगावती साखर कारखान्याचे संचालक रघुनाथ जाधव, देवस्थान समितीचे सदस्य, ग्रामस्थ, भाविकांच्या उपस्थितीत महापूजा झाली.
विठूनामाच्या गजराने नंदवाळ परिसर दुमदुमून गेला होता. भजन, अभंगाच्या तालात वारकरी मंडळींसह भाविक भान हरपून दिंडीमध्ये सहभागी झाले होते. हातात टाळ, डोकीवर वृंदावन आणि मुखी विठ्ठलाच्या नामाचा गजर असे दृश्य सर्वत्र दिसत होते.(वार्ताहर)