वैशाली डकरे होणार नव्या महापौर

By Admin | Updated: July 1, 2015 00:47 IST2015-07-01T00:47:51+5:302015-07-01T00:47:51+5:30

नाट्यपूर्ण घडामोडी : महापौरपदासाठी एकमेव अर्ज दाखल; अधिकृत घोषणा शनिवारी

Vaishali Dkre will be the new Mayor | वैशाली डकरे होणार नव्या महापौर

वैशाली डकरे होणार नव्या महापौर

वैशाली डकरे होणार नव्या महापौर
नाट्यपूर्ण घडामोडी : महापौरपदासाठी एकमेव अर्ज दाखल; अधिकृत घोषणा शनिवारी
कोल्हापूर : महापौरपदासाठी इच्छुकांनी केलेले जोरदार प्रयत्न, ताणलेली उत्कंठा आणि गेल्या २४ तासांत पडद्यामागे घडलेल्या जोरदार हालचाली, अशा नाट्यपूर्ण घडामोडींनंतर कॉँग्रेसकडून कोल्हापूरच्या ४२ व्या महापौरपदाच्या उमेदवार म्हणून वैशाली राजेंद्र डकरे यांच्या नावावर मंगळवारी शिक्कामोर्तब झाले. डकरे यांचा एकमेव अर्ज आल्याने शनिवारी
(दि. ४) होणाऱ्या विशेष सभेत त्यांच्या निवडीची औपचारिकता पूर्ण होईल.
दरम्यान, दुपारी दीड वाजल्यापासून तीन वाजेपर्यंत कॉँग्रेस कमिटीच्या कार्यालयात माजी गृहराज्यमंत्री सतेज पाटील यांनी नगरसेवकांशी वैैयक्तिकरीत्या बंद खोलीत चर्चा करून मते जाणून घेतली. यानंतर चार वाजता फोन करून निरोप देतो, त्यावेळी नाव जाहीर करण्यात येईल, असे सांगून सतेज पाटील यांनी मुलाखतीचे सोपस्कार आटोपून कार्यालय सोडले.
गटनेते, कारभारी, पदाधिकारीही नावाबाबत अनभिज्ञ होते. शारंगधर देशमुख व सचिन चव्हाण मधल्या काळात जनसुराज्य व राष्ट्रवादीच्या संपर्कात होते. दर पाच मिनिटांच्या घडामोडी व चर्चा नेत्यांच्या कानांवर घातली जात होती. चर्चेतून मार्ग काढू, काळजी करू नका, असा प्रा. जयंत पाटील यांचा निरोप आल्यानंतरच सर्वांनी सुस्कारा सोडला.
मात्र, चार वाजल्यानंतर इच्छुकांमध्ये घालमेल सुरूझाली. नवीन महापौर कोण होणार याची उत्कंठा मुदत संपण्यास तास राहिला तरी टिकून होती. मीना सूर्यवंशी की वैशाली डकरे यांच्या नावांत एकमत होत नव्हते. अखेर ४ वाजून २० मिनिटांनी शहराध्यक्ष प्रल्हाद चव्हाण यांना सतेज पाटील यांनी फोन करून वैशाली डकरे यांच्या नावाची घोषणा करण्यास सांगितले. एकमताने घेतलेला हा निर्णय सर्वांनी स्वीकारावा, असे आवाहन चव्हाण करीत असतानाच नगरसेविका मीना सूर्यवंशी व माजी नगरसेवक नंदकुमार सूर्यवंशी हे नाराज होऊन बैठक सोडून निघून गेले.यानंतर डकरे यांनी समर्थकांसह महापालिका गाठली. नगरसचिव उमेश रणदिवे यांच्याकडे अनुक्रमे अजित पवार व प्रदीप उलपे आणि अर्पणा आडके व रेखा पाटील सूचक व अनुमोदक असलेले दोन अर्ज ४ वाजून ३९ मिनिटांनी दाखल केले.
दरम्यान, जनसुराज्य पक्षाचे नगरसेवक व विरोधी पक्षनेता मुरलीधर जाधव यांनी दुपारी एक वाजता दोन अर्ज नेले होते. त्यामुळे अर्ज दाखल केल्यानंतरही
दगाफटका व्हायला नको, यासाठी पाच वाजेपर्यंत कॉँग्रेसचे सर्व पदाधिकारी नगरसचिव कार्यालयात ठाण मांडून बसलेले होते.
महापौरपदाचा एकच अर्ज दाखल झाल्याचे स्पष्ट होताच डकरे समर्थकांनी महापालिकेच्या दारात फटाक्यांची जोरदार आतषबाजी करुन जल्लोष व्यक्त केला.


कहीं खुशी, कहीं गम
महापौरपदासाठी नाव निश्चित करताना सतेज पाटील यांचा कस लागला. राजेंद्र डकरे, नंदकुमार सूर्यवंशी तसेच सुरेश ढोणुक्षे हे माजी नगरसेवक पाटील यांचे नेतृत्व मानणारे आहेत. त्यामुळे अवघ्या चार महिन्यांचा महापौर करताना पाटील यांना तारेवरची कसरत करावी लागली. कॉँग्रेस कमिटीत त्यामुळेच दिवसभर तणाव होता. महापौरपदाचे नाव जाहीर होताच ‘कहीं खुशी, कहीं गम’ असेच वातावरण नगरसेवक व कार्यकर्त्यांत होते.

Web Title: Vaishali Dkre will be the new Mayor

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.