महापौरपदी वैशाली डकरे
By Admin | Updated: July 5, 2015 00:48 IST2015-07-05T00:48:40+5:302015-07-05T00:48:40+5:30
निवड बिनविरोध : दोन महिन्यांसाठी संधी; हद्दवाढीसाठी प्रयत्नांची ग्वाही

महापौरपदी वैशाली डकरे
कोल्हापूर : हलगीचा कडकडाट, रांगोळीचा सडा, फेटे परिधान केलेले नगरसेवक, कार्यकर्त्यांचा जल्लोष, आप्तस्वकियांची उपस्थिती अशा उत्साही वातावरणात कोल्हापूरच्या ४२व्या महापौरपदी कॉँग्रेसच्या वैशाली राजेंद्र डकरे यांची शनिवारी बिनविरोध निवड झाली. पीठासन अधिकारी तथा जिल्हाधिकारी डॉ. अमित सैनी यांच्या अध्यक्षतेखाली निवडीसाठी विशेष सभा झाली. महापौरपदासाठी उच्च न्यायालयातील याचिकेच्या निकालाच्या अधीन राहूनच महापौर निवड बिनविरोध झाल्याचे डॉ. सैनी यांनी घोषित केले. निवडीनंतर डकरे समर्थकांनी गुलालाची उधळण करीत फटाक्यांची जोरदार आतषबाजी केली. डकरे या माजी गृहराज्यमंत्री सतेज पाटील यांच्या समर्थक आहेत.
महापालिकेची निवडणूक आॅक्टोबरमध्ये होत आहे. त्याच्या अगोदर आचारसंहिता लागणार असल्याने डकरे यांना काम करण्यासाठी दोनच महिने मिळतील. कमी कालावधी त्यांना मिळत असूनही ते पद मिळावे यासाठी प्रचंड चुरस झाली. तृप्ती माळवी यांचे नगरसेवकपद रद्द झाल्याने १५ नोव्हेंबरपर्यंत उर्वरित कालावधीसाठी महापौरपदासाठी डकरे यांचा एकच अर्ज दाखल झाला. विशेष सभेत या निवडीची औपचारिकता पूर्ण झाली.
सकाळी अकरा वाजता सभेत नियमाप्रमाणे डॉ. सैनी यांनी दिलेल्या माघारीचा कालावधी संपल्यानंतर महापौर निवडीची घोषणा केली. नगरसेवकांनी बाके वाजवून डकरे यांच्या निवडीचे जोरदार स्वागत केले.
डकरे यांना काम करण्यास दोनच महिन्यांचा कालावधी मिळणार असल्याने लगेचच कार्यालय प्रवेश करून त्यांनी कामकाज सुरू केले.
दरम्यान, सकाळी साडेदहाच्या सुमारास माजी मंत्री सतेज पाटील व कॉँग्रेस शहराध्यक्ष प्रल्हाद चव्हाण यांच्यासमवेत ‘अजिंक्यतारा’ येथील कार्यालयातून दुचाकी रॅलीने केशरी रंगाचा फेटा घालून डकरे महापालिकेत आल्या. स्वागतासाठी कार्यकर्त्यांनी विठ्ठल रामजी चौकापासून महापौर दालनापर्यंत रांगोळीचा सडा घातला होता. कार्यकर्त्यांनी कॉँग्रेसच्या विजयाच्या घोषणा दिल्या. निवडीनंतर डकरे समर्थकांनी शहरातील प्रमुख मार्गांवरून मिरवणूक काढली.