वडूज : उरमोडीचे पाणी सांगली जिल्ह्याला पळविणाऱ्यांचा निषेध

By Admin | Updated: August 20, 2014 00:28 IST2014-08-19T23:10:40+5:302014-08-20T00:28:51+5:30

पत्रकबाजी करण्याऐवजी कॅबिनेटमध्ये योजनेस विरोध करावा

Vaduz: Urmodi water in Sangli district protests | वडूज : उरमोडीचे पाणी सांगली जिल्ह्याला पळविणाऱ्यांचा निषेध

वडूज : उरमोडीचे पाणी सांगली जिल्ह्याला पळविणाऱ्यांचा निषेध

वडूज : सांगलीच्या मंत्र्यांनी उरमोडी योजनेचे पाणी त्यांच्या जिल्ह्यातील गावांना घेऊन जाण्याचा डाव केला आहे. या योजनेचे भूमिपूजनही ढाणेवाडी गावात झाले. या प्रकाराबाबत जलसंपदामंंत्री शशिकांत शिंदे व माणचे आ. जयकुमार गोरे या दोघांनी कागदोपत्री पत्रकबाजी करण्याऐवजी कॅबिनेटमध्ये योजनेस विरोध करावा,’ अशी मागणी खटाव-माण तालुक्यातील सर्वपक्षीय कार्यकर्त्यांनी केली.
‘उरमोडी उपसा सिंंचन योजनेचे पाणी सांगलीला नेण्याचा निर्णय रद्द करा,’ या मागणीसाठी खटाव-माण तालुक्यातील सर्वपक्षीय कार्यकर्त्यांनी तहसीलदार कार्यालयावर मोर्चा काढला. यावेळी सुरेंद्र गुदगे म्हणाले, ‘खटाव-माणची जनता पाण्यासाठी टाहो फोडत असताना दिशाभूलीचे राजकारण करत पाणी सांगलीकडे पळविले जात आहे. ही एकप्रकारे येथील जनतेची चेष्टा शासनकर्ते करीत आहेत. आम्ही मोर्चा काढला म्हणून आमच्यावर टीका करणाऱ्यांनी आत्मपरीक्षण करावे. सांगलीकरांचे गोडवे गाणाऱ्यांनी आपली भूमिका स्पष्ट करावी.’
दत्ता जगदाळे म्हणाले, ‘मोठे आंदोलने करून व मुख्यमंत्र्यांनी शब्द देऊनही औंधसह सोळा गावांना द्यायला शासनाकडे पाणी नाही. परंतु, सांगली जिल्ह्याला द्यायला पाणी आले कोठून, अशा प्रकारे आमचा अंत बघणाऱ्यांना आगामी काळात धडा शिकविला जाईल.’ स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हा प्रवक्ते संजय भगत, भाजपचे तालुकाध्यक्ष अनिल भोसले, दिलीप तुपे, तानाजी देशमुख, राजाभाऊ देशमुख, मनसे जिल्हाध्यक्ष धैर्यशील पाटील यांची भाषणे झाली. यावेळी प्रा. बंडा गोडसे, ‘रिपाई’चे किशोर सोनवणे, सतीश शेटे, शिवाजी पवार, सदाशिव खाडे, सोमनाथ माळी, प्रशांत गोडसे, सुरेश राऊत, हेमंत जाधव, रणजित घाडगे, दिगंबर शिंगाडे, संतोष जाधव ,अंजनकुमार घाडगे, सचिन मोरे, पंढरीनाथ तुपे, विकास जाधव, प्रशांत कणसे आदिंसह हजारो कार्यकर्ते सहभागी झाले होते. (प्रतिनिधी)

Web Title: Vaduz: Urmodi water in Sangli district protests

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.