१८ वर्षांवरील दिव्यांग, परदेशी जाणाऱ्या विद्यार्थ्यांना दर सोमवारी लसीकरण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 20, 2021 04:17 IST2021-06-20T04:17:04+5:302021-06-20T04:17:04+5:30
कोल्हापूर जिल्ह्यातील दिव्यांग आणि परदेशी विशेष कारणासाठी जाणाऱ्या विद्यार्थ्यांची गैरसोय टाळण्यासाठी या सर्वांचे ...

१८ वर्षांवरील दिव्यांग, परदेशी जाणाऱ्या विद्यार्थ्यांना दर सोमवारी लसीकरण
कोल्हापूर जिल्ह्यातील दिव्यांग आणि परदेशी विशेष कारणासाठी जाणाऱ्या विद्यार्थ्यांची गैरसोय टाळण्यासाठी या सर्वांचे विशेष वेळेत लसीकरण करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. कोल्हापूर जिल्ह्यात दर सोमवारी सकाळी ९ ते दुपारी १२ या वेळेत हे लसीकरण होणार आहे. उद्यापासूनच या मोहिमेची सुरुवात होणार आहे. जिल्ह्यात सुमारे ४५ हजार दिव्यांग आहेत.
१८ वर्षावरील दिव्यांगाना लस घेण्यासाठीची प्रक्रिया त्रासदायक ठरत होती. लस कधी येणार याची आधी माहिती मिळत नव्हती. त्यामुळे केंद्रावर जाणे, तेथे रांगेमध्ये थांबणे, लस संपल्यास परत येणे असे प्रकार घडत होते. याची दखल घेत सामाजिक न्याय विभागाने या सर्वांना विशिष्ट वेळेत लस देण्याच्या सूचना दिल्या होत्या. त्यानुसार कोल्हापूर जिल्ह्यात दर सोमवारी सकाळी ९ ते दुपारी १२ या वेळेत ठरवून दिलेल्या केंद्रांवर लसीकरण केले जाणार आहे.
दिव्यांग लाभार्थ्यांसाठी अपंगत्वाचा दाखला, दिव्यांग पोर्टलवर नोंदणी केल्याचा पुरावा, आधारकार्ड ही कागदपत्रे आवश्यक आहेत. अगदीच ज्याला ठरवून दिलेल्या केंद्रावर येणे शक्य नसेल त्यांना जवळच्या केंद्रावर लस देण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. तसेच परदेशात शिक्षण, नोकरी आणि टोकियो ऑलम्पिकसाठी जाणाऱ्यांनाही याच सत्रात लस देण्यात येणार आहे.
चौकट
खालील ठिकाणी दिली जाणार लस
ग्रामीण रुग्णालय आजरा, गारगोटी, चंदगड, गगनबावडा, हातकणंगले / इचलकरंजी लालनगर, कागल, गांधीनगर, मलकापूर, शिरोळ, प्राथमिक आरोग्य केंद्र तारळे, उपजिल्हा रुग्णालय गडहिंग्लज, उपजिल्हा रुग्णालय कोडोली या ठिकाणी लसीकरण करण्यात येणार आहे.
चौकट
समन्वयांची नियुक्ती
दिव्यांगांना लसीकरण प्रक्रियेत अडथळा येऊ नये यासाठी कोल्हापूर शहरात ११, नगरपालिकांच्या ठिकाणी १४, लसीकरण केंद्राच्या पातळीवर १२ समन्वय नियुक्त करण्यात आले असल्याची माहिती जिल्हा समाजकल्याण अधिकारी दीपक घाटे यांनी दिली.