स्टॅन्ड, रेल्वे स्टेशनसह गर्दीच्या ठिकाणी लसीकरण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 9, 2021 04:30 IST2021-09-09T04:30:16+5:302021-09-09T04:30:16+5:30
कोल्हापूर : जिल्ह्यात कोरोनाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेचा धोका टाळण्यासाठी लसीकरण मोहीम व्यापक प्रमाणात राबवा, मध्यवर्ती बसस्थानक, रेल्वे स्टेशनसह कोल्हापूर, ...

स्टॅन्ड, रेल्वे स्टेशनसह गर्दीच्या ठिकाणी लसीकरण
कोल्हापूर : जिल्ह्यात कोरोनाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेचा धोका टाळण्यासाठी लसीकरण मोहीम व्यापक प्रमाणात राबवा, मध्यवर्ती बसस्थानक, रेल्वे स्टेशनसह कोल्हापूर, गडहिंग्लज व इचलकरंजी येथील अन्य गर्दीच्या ठिकाणीदेखील लसीकरण शिबिर घ्या, गणेशोत्सव मंडळांना त्यासाठी आवाहन करा, अशा सूचना जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी बुधवारी दिल्या.
जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या जिल्हा कृतिदल समितीच्या बैठकीत ते बोलत होते. यावेळी अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. विलास देशमुख, जिल्हा लसीकरण अधिकारी डॉ. फारुख देसाई, महापालिकेचे आरोग्य अधिकारी डॉ. प्रकाश पावरा, डॉ. अमोलकुमार माने, महिला व बाल विकास विभागाच्या कार्यक्रम अधिकारी शिल्पा पाटील यांच्यासह अधिकारी उपस्थित होते.
जिल्हाधिकारी रेखावार म्हणाले, जिल्ह्यातील पहिला डोस झालेल्या नागरिकांना दुसरा डोस वेळेत मिळावा, याचे नियोजन करा, लसीकरण वाढण्यासाठी तालुका, गाव, प्रभागनिहाय नियोजन करा, गावा-गावात लसीकरण समिती स्थापन करा, वेळापत्रक करून लसीकरणासाठी धर्मगुरू, नेहरू युवा केंद्र, एनसीसीच्या विद्यार्थ्यांची मदत घ्या, तसेच गणेशोत्सवामध्ये गणेश मंडळांना लसीकरण शिबिर आयोजित करण्यासाठी प्रोत्साहन द्या, प्रभागामध्ये आयोजित केलेल्या लसीकरणाची व्यापक प्रसिद्धी करा, या मोहिमेेसाठी स्वयंसेवी संस्थांचा सहभाग वाढवा, अशा सूचना त्यांनी केल्या.
----
जंतनाशक मोहीम २१ तारखेला
आरोग्य विभागाच्यावतीने २१ सप्टेंबर रोजी राष्ट्रीय जंतनाशक मोहीम राबविण्यात येणार आहे. याअंतर्गत १ ते १९ वर्षे वयोगटातील सर्व मुला-मुलींना जंतनाशक गोळी देऊन ही मोहीम यशस्वी करा, अशा सूचना जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी जिल्हा समन्वय समितीच्या बैठकीत केली. शाळेत जाणाऱ्या मुलांना शाळेत, तर कोरोनामुळे शाळा बंद असलेल्या मुला-मुलींना घरोघरी आशा स्वयंसेविकांमार्फत जंतनाशकाच्या गोळ्या दिल्या जातील. ग्रामीण भागासाठी ६ लाख ९२ हजार १८५ ,तर शहरी भागासाठी १ लाख ४८ हजार ७८० तसेच महापालिका क्षेत्रामधील १ लाख १६ हजार ३० इतके उद्दिष्ट असल्याची माहिती जिल्हा लसीकरण अधिकारी डॉ. फारुख देसाई यांनी दिली.
---