कोल्हापुरात आज सरसकट लसीकरण बंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 9, 2021 04:25 IST2021-05-09T04:25:09+5:302021-05-09T04:25:09+5:30
कोल्हापूर : लस उपलब्ध नसल्याने आज रविवारी सरसकट लसीकरण बंद ठेवण्यात येणार असून १८ ते ४४ वयोगटातील पोर्टलवर ...

कोल्हापुरात आज सरसकट लसीकरण बंद
कोल्हापूर : लस उपलब्ध नसल्याने आज रविवारी सरसकट लसीकरण बंद ठेवण्यात येणार असून १८ ते ४४ वयोगटातील पोर्टलवर नोंदणी केलेल्यांसाठी विक्रमनगरातील एकच केंद्र सुरू राहणार आहे. दरम्यान, शनिवारी दहा प्राथमिक आरोग्य केंद्रांत २ हजार ११७ जणांनी लस टोचून घेतली, यात दुसरा डोस घेणाऱ्यांनाच प्राधान्य देण्यात आले.
लसीचा तुटवडा शनिवारीही कायम राहिला. त्यामुळे शहरातील आरोग्य केंद्रासमोर लस मिळवण्यासाठी गर्दी कायम होती. गर्दी हटत नसल्याने आरोग्य विभागाकडून आरोग्य केंद्रासमोर दुसऱ्या डोसची नाेंदणी असणाऱ्याच लस दिली जाईल, असे लिहिलेले फलक दर्शनी भागात लावण्यात आले होते, तरीदेखील लोकांचे जथ्ये लसीकरण केंद्राकडे येताना दिसत होते. नोंदणी असणाऱ्यांना प्राधान्याने लस देण्याचे धोरण केंद्रावर दिसत होते.
शनिवारी दिवसभर सावित्रीबाई फुले १६४, फिरंगाई १५५, पंचगंगा १७८, कसबा बावडा २९०, महाडिक माळ ३६६, आयसोलेशन २५५, फुलेवाडी १७८, सदरबाजार १६५, सिद्धार्थनगर २२४, मोरेमानेनगर १७२ अशा एकूण २ हजार ११७ नागरिकांना लसीकरण करण्यात आले. शहरात आजअखेर एक लाख ११ हजार ४ जणांनी पहिला तर ३२ हजार २६२ जणांनी दुरसा डोस घेतला आहे.
महानगरपालिकेकडे लस उपलब्ध नसल्याने सर्व प्राथमिक नागरी आरोग्य केंद्राकडील ४५ वर्षांवरील नागरिकांचे कोविड लसीकरण बंद राहणार आहे, तर १८ ते ४४ वयोगटातील कोविन पोर्टलवर नोंदणी केलेल्या तरुणांनी विक्रमनगरातील भगवान महावीर दवाखाना येथे उपस्थित राहावे, असे आवाहन महापालिका आरोग्य विभागाने केले आहे.
०८०५२०२१-कोल-लसीकरण
फोटो ओळ: कोल्हापुरात शनिवारी लस कमी प्रमाणात उपलब्ध झाल्याने आरोग्य विभागाने केंद्राबाहेर नोंदणी असलेल्यांनाच लस दिली जाईल, असे फलक लावले होते, तरीदेखील लोक गर्दी करताना दिसत होते.
(छाया : आदित्य वेल्हाळ)