वडगावात १८ ते ४४ वयोगटातील नागरिकांचे लसीकरण थंड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 21, 2021 04:18 IST2021-07-21T04:18:05+5:302021-07-21T04:18:05+5:30
पेठवडगाव : वडगाव पालिकेकडून १८ ते ४४ वयोगटातील नागरिकांचे लसीकरण अद्याप सुरू नाही. त्यामुळे नागरिकांतून नाराजी व्यक्त होत ...

वडगावात १८ ते ४४ वयोगटातील नागरिकांचे लसीकरण थंड
पेठवडगाव : वडगाव पालिकेकडून १८ ते ४४ वयोगटातील नागरिकांचे लसीकरण अद्याप सुरू नाही. त्यामुळे नागरिकांतून नाराजी व्यक्त होत आहे. सध्या ६० वर्षांवरील तर ४५ वर्षांवरील नागरिकांचे पहिल्या डोसचे ८० टक्के, तर दुसऱ्या डोसचे ५१ टक्के लसीकरण झाले आहे. शहरातील वाढत्या कोरोनाबाधित रुग्णसंख्येमुळे आमचे लसीकरण करा, ही आर्त हाक सोशल मीडियावर सुरू आहे. याबाबतची मागणी हा शहरात चर्चेचा विषय झाला आहे.
शहरात कोरोनाबाधित रुग्णसंख्येची वाटचाल ९०० कडे सुरू आहे.यातील तब्बल ७६६ रुग्ण बरे झाले आहेत. त्यांतील २५ रुग्णांचा मृत्यू झाला असून सध्या ७० रुग्ण कार्यरत आहेत. हे प्रमाण ८.१३ आहे, तर मृत्यूचे प्रमाण २.९० इतके आहे. शहरात सुमारे ९६४५ नागरिकांचे लसीकरण पूर्ण झाले आहे. तसेच दुसरा डोसही नियमित देण्यात येतो.
शहरातील १८ ते ४४ वयोगटातील नागरिक सुमारे १३ हजार एवढे आहेत. शासनाने त्यांना लसीकरण करण्यात येणार असल्याचे विविध माध्यमांतून जाहीर केले आहे. मात्र जिल्हा पातळीवरून सूचना न आल्यामुळे तसेच वाढीव लसीकरण कोटा न मिळाल्यामुळे या ४५ वर्षांच्या आतील वयोगटातील लसीकरण ठप्प आहे.
पालिकेच्या बळवंतराव यादव हाॅस्पिटलमध्ये फक्त फार्मासिस्ट, नर्स कायमस्वरूपी, तर डाॅक्टरसह २३ उर्वरित स्टाफ हा रोजंदारीवर आहे. तरीसुद्धा शहरातील आरोग्य यंत्रणा, लसीकरण, साथीचे रोग आटोक्यात आणण्यास युद्धपातळीवर यंत्रणा राबवितात. शहरातील कोरोनाबाधित रुग्ण आढळून आलेल्या भागात कोरोना ॲन्टिजन व आरटीफीसीआर चाचण्या घेण्यात येतात.
हे सगळे सुरू असले तरी यात सरकारी, खासगीमध्येसुद्धा लसीकरण सुरू नाही. पालिकेत जिल्हाधिकारी कार्यालयातून आदेश नाहीत. आम्ही काय करू, अशी हतबलता आहे. तर कौटुंबिक आधार असलेल्या १८ ते ४४ वयोगटात लसीकरण सुरू नसल्यामुळे तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. ही हतबलता सोशल मीडियावर व्यक्त होत आहे.
पालिकेने उर्वरित लसीकरण चांगल्या पद्धतीने केले असले तरी सध्या पाच-दहा टक्के उदासीन असलेल्या नागरिकांचा फटका उर्वरित नागरिकांच्या लसीकरणाला बसला आहे. त्यामुळे या गटात अस्वस्थता निर्माण होत आहे.