लस द्या अन्यथा ॲन्टिजेन चाचणी बंद करुन निर्बंध झुगारु
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 3, 2021 04:15 IST2021-07-03T04:15:51+5:302021-07-03T04:15:51+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क कोल्हापूर : कोरोनाचा संसर्ग कमी करण्यासाठी प्रशासन ॲन्टिजेन चाचणीसह इतर कडक निर्बंध लादत आहे. मात्र, दुसऱ्या ...

लस द्या अन्यथा ॲन्टिजेन चाचणी बंद करुन निर्बंध झुगारु
लोकमत न्यूज नेटवर्क
कोल्हापूर : कोरोनाचा संसर्ग कमी करण्यासाठी प्रशासन ॲन्टिजेन चाचणीसह इतर कडक निर्बंध लादत आहे. मात्र, दुसऱ्या बाजूला लोकसंख्येच्या तुलनेत लस देत नसल्याने नागरिकांकडून संतप्त भावना व्यक्त होत आहेत. पहिला डोस घेऊन ९० दिवस झाले तरी लस मिळत नाही, हेच लसीचे नियोजन आहे का? नियम, निर्बंध फक्त जनतेनेच पाळायचे का? लस मिळाली नाही तर गावात होणाऱ्या ॲन्टिजेन चाचणीसह सर्व निर्बंध झुगारु, असा इशारा बालिंगे (ता. करवीर) येथील ग्रामस्थांनी दिला आहे.
बालिंगे गाव शहरालगत असल्याने कोरोनाचा संसर्ग अधिक आहे. संसर्ग कमी करण्यासाठी ग्रामपंचायत आपल्यापरीने निकराचे प्रयत्न करत आहे. गावात प्रबोधन, ॲन्टिजेन चाचणीच्या माध्यमातून साखळी तोडण्यासाठी प्रयत्न सुुुरु असताना आरोग्य विभागाकडून मात्र सहकार्य मिळत नाही. दहा हजार लोकसंख्येच्या या गावात जेमतेम १ हजार नागरिकांचे लसीकरण झाले आहे. पहिला डोस घेऊन ९० दिवस पूर्ण झालेल्यांची संख्या तीनशेपेक्षा अधिक आहे. हे नागरिक रोज ग्रामपंचायतीमध्ये येऊन लसीबाबत विचारणा करत आहे. आरोग्य विभागाकडे विचारले असता, लस उपलब्ध नसल्याचे सांगितले जाते. एकीकडे लस देणार नाही आणि दुसऱ्या बाजूला संसर्ग वाढत असल्याचे सांगत निर्बंध कडक करणार असाल तर निर्बंध झुगारले जातील, असा इशारा सरपंच मयूर जांभळे यांनी दिला.
याबाबतचे निवेदन जिल्हा लसीकरण अधिकारी फारूक देसाई यांना देण्यात आले. यावेळी राष्ट्रवादीचे जिल्हा उपाध्यक्ष मधुकर जांभळे, उपसरपंच पंकज कांबळे, नंदकुमार जांभळे, रंगराव वाडकर, अजय भवड, विजय जांभळे, कृष्णात माळी उपस्थित होते.
फोटो ओळी : बालिंगे (ता. करवीर) गावाला लस द्या, या मागणीचे निवेदन सरपंच मयूर जांभळे यांनी जिल्हा लसीकरण अधिकारी फारूक देसाई यांना दिले. यावेळी पंकज कांबळे, मधुकर जांभळे उपस्थित हाेते. (फाेटो-०२०७२०२१-कोल-बालिंगे)