दारू दुकानातील कर्मचाऱ्यांचे लसीकरण करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 11, 2021 04:24 IST2021-05-11T04:24:41+5:302021-05-11T04:24:41+5:30
कोल्हापूर : आम्ही शासनाला एवढा महसूल मिळवून देतो तेव्हा आमच्या दारू दुकानातील ...

दारू दुकानातील कर्मचाऱ्यांचे लसीकरण करा
कोल्हापूर : आम्ही शासनाला एवढा महसूल मिळवून देतो तेव्हा आमच्या दारू दुकानातील कर्मचाऱ्यांचे प्राधान्यक्रमाने लसीकरण करून द्या, अशी मागणी शहरातील वाईन शॉपच्या मालकाने केली. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संजयसिंह चव्हाण यांच्याकडे लेखी मागणी करताच उपस्थितांना डोक्यावर हात मारण्याची वेळ आली.
जिल्हाधिकारी आणि उत्पादन शुल्क विभागाने घरपोच करण्याबाबत ज्या सूचना केल्या आहेत त्यामध्ये संबंधितांचे लसीकरण करणे आवश्यक असल्याचे नमूद केले आहे. संबंधित वाईन शॉपमालक या पत्रांच्या झेरॉक्स घेऊन संजयसिंह चव्हाण यांना भेटण्यासाठी आले. माझ्या दुकानात सात, आठ कर्मचारी आहेत; परंतु ते आता येण्यास तयार नाहीत. त्यामुळे प्राधान्यक्रमाने या कर्मचाऱ्यांना लस मिळावी अशी त्यांची मागणी होती. त्यांच्या या मागणीमुळे उपस्थितही अवाक् झाले.
‘अत्यावश्यक सेवे’मध्ये तुमचा विभाग येत नसल्यामुळे तुमच्या कर्मचाऱ्यांना लसीकरणासाठी नोंदणी करावी लागेल आणि रांगेमध्ये उभे राहूनच लस घ्यावी लागेल, असे चव्हाण यांनी स्पष्ट केल्यानंतर मग संबंधित मालक निघून गेले.