देवस्थान समितीसाठी व्ही. बी. पाटील यांचे नाव पुढे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 3, 2021 04:16 IST2021-07-03T04:16:02+5:302021-07-03T04:16:02+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क कोल्हापूर : पश्चिम महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थापन समिती आपल्याच पक्षाकडे कशी राहील, अशा हालचाली प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेसच्या ...

देवस्थान समितीसाठी व्ही. बी. पाटील यांचे नाव पुढे
लोकमत न्यूज नेटवर्क
कोल्हापूर : पश्चिम महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थापन समिती आपल्याच पक्षाकडे कशी राहील, अशा हालचाली प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेसच्या पातळीवर सुरू आहेत. या पदासाठी पक्षाचे नेते व्ही. बी. पाटील यांचे नाव आघाडीवर असून पक्षाध्यक्ष शरद पवार यांनीच त्यांचे नाव सुचवल्याचे सांगण्यात येते.
काँग्रेसकडे असलेले व राज्यातील सर्वात श्रीमंत देवस्थान अशी ओळख असलेले शिर्डी देवस्थान उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आग्रह करून राष्ट्रवादीकडे घेऊन तिथे अध्यक्षही जाहीर करून टाकला आहे. न्यायालयाने मुदत घालून दिल्याने ही घाईगडबड करण्यात आली, परंतु शिर्डी देवस्थान सोडायला अजूनही काँग्रेस आणि मुख्यत: महसूल मंत्री बाळासाहेब थोरात तयार नाहीत. त्यामुळे पश्चिम महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थापन समिती राष्ट्रवादीकडेच राहण्याची शक्यता जास्त आहे. मागच्या सरकारच्या काळात ही समिती भाजपकडे होती, परंतु महाविकास आघाडी सरकारने ती बरखास्त केली आहे. आता थेट शरद पवार यांच्या पातळीवरच ही समिती राष्ट्रवादी काँग्रेसकडेच राहावी यासाठी आग्रह आहे. पवार यांनी राष्ट्रवादीच्या ज्येष्ठ नेत्यांच्या बैठकीत गेल्याच आठवड्यात ही समिती राष्ट्रवादीकडे राहील व त्यावर व्ही. बी. पाटील यांना संधी देण्याचे सुतोवाच केले आहे. त्यामुळे व्ही. बी. यांचे नाव नव्याने चर्चेत आले आहे. महाविकास आघाडीसमोर रोज नवीनच काहीतरी प्रश्न निर्माण होत असल्याने महामंडळे, देवस्थान समिती व इतर राजकीय महत्त्वाच्या पदांचे वाटप रखडले आहे.
व्ही. बी. पाटीलच का....
व्ही. बी. पाटील हे राष्ट्रवादीच्या स्थापनेच्या आधीपासूनच शरद पवार यांच्याशी एकनिष्ठ आहेत. त्यांनी पक्षाचे जिल्हाध्यक्षपद सांभाळले आहे. कोल्हापूरचे छत्रपती घराणे व पवार यांच्यातील दुवा म्हणूनही व्ही. बी. यांनी उत्तम भूमिका पार पाडली आहे. पक्षाच्या शहर कार्यालयासाठी त्यांनी स्वत:ची इमारत स्थापनेपासून विनामोबदला वापरण्यास दिली आहे. पदरमोड करुन अनेक सामाजिक कामात ते पुढाकार घेतात. देवस्थान समिती हे आर्थिक सत्ताकेंद्र असल्याने व्ही. बी. यांच्यासारख्या निष्कलंक व्यक्तिमत्त्वाचा समितीला लाभ होईल असे नेतृत्वाला वाटते. दोन्ही काँग्रेसच्या जिल्ह्यातील व राज्यातीलही प्रमुख नेत्यांशी त्यांचे जिव्हाळ्याचे संबंध असल्याने ही समिती राष्ट्रवादीला देण्यास व त्यांच्या निवडीमध्येही फारशा राजकीय अडचणी येणार नाहीत, असे आजचे चित्र दिसते.
फोटो : ०२०७२०२१-कोल- व्ही. बी. पाटील-समिती