आजऱ्यात यंदा होणार ‘सगुणा’ भातपिकाचा प्रयोग
By Admin | Updated: May 28, 2015 01:12 IST2015-05-28T01:09:15+5:302015-05-28T01:12:50+5:30
तालुक्यातील २० शेतकऱ्यांना प्रशिक्षण : कमी श्रमात, कमी खर्चात भाताचे अधिक उत्पादन घेता येणार

आजऱ्यात यंदा होणार ‘सगुणा’ भातपिकाचा प्रयोग
ज्योतीप्रसाद सावंत - आजरा
आजरा तालुक्यामध्ये भातशेती क्षेत्रात विविध प्रयोग केले जाऊ लागले असून, उत्पादन खर्चात बचत करणाऱ्या सगुणा भात उत्पादन तंत्राचा वापर यावर्षी केला जणार असून, खरीप हंगामात होणाऱ्या या प्रयोगासाठी तालुक्यातील २० शेतकऱ्यांना प्रशिक्षित करण्यात येणार आहे. तालुका कृषी विभागाच्या पुढाकाराने हे शेतकरी नेरळ (ता. रायगड) येथील सगुणा भात शेतीतंत्राला भेट देण्यासाठी सज्ज झाले आहेत.
याबाबत बोलताना तालुका कृषी अधिकारी श्रीकांत निकम म्हणाले, हा प्रयोग पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशिप याअंतर्गत राबविण्यात येणार आहे. यासाठी जिल्ह्यात १२० हेक्टरवर, तर आजरा तालुक्यात १५ हेक्टरवर हा प्रयोग केला जाणार आहे. सगुणा भात शेतीतंत्र हे काही वर्षांत नेरळमधील सगुणा बागेतील काही शेतकऱ्यांनी विकसित केले आहे. कमी श्रमात, कमी खर्चात भाताचे अधिक उत्पादन घेता येते. यामुळे उत्पादकाला खर्चात बचत होते.
या तंत्राद्वारे शेतामध्ये नांगरणी करून एक मीटर रुंदीचे गादी वाफे तयार केले जातात. वाफसा आल्यावर लोखंडी मार्करद्वारे खुणा करून प्रत्येक खुणेवर एक किंवा दोन बियांची टोकणणी करावी. दुसऱ्या दिवशी वाफ्यावर तणनाशकाची फवारणी करावी. यामुळे भांगलणीचा खर्च कमी होतो. चार रोपांमध्ये एका युरिया ब्रिकेटची टोकणी करावी. हे तंत्र धूळवाफ पेरणीसारखे आहे. तंत्रशुद्ध पद्धतीने पेरणी असल्याने पिकाच्या उत्पादनात भरपूर वाढ होते. गादी वाफ्यांवरील भात कापणीनंतर कडधान्याची पिके घेता येतात. नांगरणीची तीन वर्षे गरज नाही, असेही निकम यांनी स्पष्ट केले.
पी. पी. चा तालुक्यातील हा पहिलाच प्रयोग राहणार आहे. शेतकऱ्यांचा यामध्ये सहभाग घेऊन संशोधन केलेल्या तंत्राचा अवलंब करून कमी खर्चात पीक घेतले जाणार आहे. यामध्ये शेतकरी कंपनीबरोबर शासनाचा सहभाग राहणार आहे.
या प्रकारामध्ये भाजावळ व राब लावणे हे बंद होणार आहे. याचबरोबर चिखलणीही गरजेची राहणार आहे.