सत्तेसाठी धर्माचा वापर चुकीचा
By Admin | Updated: December 22, 2015 00:59 IST2015-12-22T00:26:44+5:302015-12-22T00:59:36+5:30
कुमार सप्तर्षी : शहाजी महाविद्यालयात राज्यशास्त्र परिषदेच्या अधिवेशनाला प्रारंभ

सत्तेसाठी धर्माचा वापर चुकीचा
कोल्हापूर : हिंदू धर्माच्या नावाखाली चार हजार संप्रदाय आहेत. आपल्या देशाच्या बोलीभाषेत धर्माला एकही ‘शब्द’ नाही. धर्माच्या नावाखाली विविध संप्रदाय लोकांच्या अज्ञानाचा गैरफायदा घेतात. सत्ता हस्तगत करण्यासाठी धर्माचा वापर करणे हे चुकीचे आहे, असे प्रतिपादन ज्येष्ठ विचारवंत डॉ. कुमार सप्तर्षी यांनी सोमवारी येथे केले.येथील शहाजी महाविद्यालय, शिवाजी विद्यापीठाचा राज्यशास्त्र विभाग आणि राज्यशास्त्र परिषदेतर्फे आयोजित राज्यस्तरीय अधिवेशनात डॉ. के. के. कावळेकर व्याख्यानमालेत ते बोलत होते. ‘हिंदू धर्म आणि हिंदुत्व’ हा त्यांच्या व्याख्यानाचा विषय होता. अध्यक्षस्थानी डॉ. बाळासाहेब भोसले होते.सप्तर्षी म्हणाले, हिंदुत्व हे राजकीय सत्ताप्राप्तीचे साधन बनले आहे. मात्र, हिंदुत्वाचा हिंदू धर्माशी काही संबंध नाही. धर्माचे स्वरूप हे वैयक्तिक आहे. एक व्यक्ती एकापेक्षा अधिक धर्माचे आचरण करू शकते. आपल्या देशवासीयांमध्ये एकत्रित राहण्याची मोठी कला असून, यात ते निष्णात आहेत. जगभरातील अभ्यासकांसाठी आपला देश मोठी प्रयोगशाळा आहे.
दरम्यान, या राज्यस्तरीय अधिवेशनाचे उद्घाटन जिल्हा व सत्र न्यायालयाचे न्यायाधीश सुनील वेदपाठक यांच्या हस्ते झाले. अध्यक्षस्थानी शाहू छत्रपती शिक्षण संस्थेचे अध्यक्ष बी. के. पाटील होते. कार्यक्रमात प्रा. आर. आर. गायकवाड, विनायक पाटील यांचा सत्कार आणि ‘राजमुद्रा’ अंकाचे प्रकाशन उपस्थितांच्या हस्ते झाले. यावेळी अधिवेशनाचे अध्यक्ष प्राचार्य डॉ. दिनकर पाटील, राज्यशास्त्र विभागप्रमुख प्रा. भारती पाटील, नेहरू अभ्यास केंद्राच्या समन्वयक प्रा. वासंती रासम प्रमुख उपस्थित होत्या. डॉ. एच. एस. वनमोरे यांनी प्रास्ताविक तर प्रा. पी. के. पाटील यांनी सूत्रसंचालन केले.
चांगल्या विचारांची गरज
अणुबॉम्ब तयार करणे हे मतिमंदपणाचे लक्षण आहे. पाकिस्तानची केवळ चार मोठी शहर आहेत. मात्र, भारताची ८५ शहरे मोठी असून, त्यांना अणुबॉम्बचा धोका आहे. अणुबॉम्बपेक्षा चांगले विचार आणि ज्ञानाची आवश्यकता आहे, असे मत डॉ. सप्तर्षी यांनी व्यक्त केले.
कायद्याचे ज्ञान आवश्यक
कायदा हा जीवनाचा अविभाज्य घटक आहे. प्रत्येक नागरिकाला कायद्याच्या ज्ञानाची आवश्यकता आहे, असे प्रतिपादन कोल्हापूरचे जिल्हा व सत्र न्यायाधीश सुनील वेदपाठक यांनी केले. ते म्हणाले, महाविद्यालयीन शिक्षणात कायद्याचे ज्ञान देण्यात यावे. हे ज्ञान मिळाल्यास सक्षमपणे जीवन जगता येईल. ते लक्षात घेऊन प्रत्येकाने कायद्याचे ज्ञान संपादन करण्यासाठी प्रयत्नशील राहावे.