स्त्रियांमधील मूत्रविकार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 3, 2019 23:58 IST2019-04-03T23:58:05+5:302019-04-03T23:58:10+5:30

डॉ. भारती अभ्यंकर नवीन नवीन लग्न झालेले जोडपं- राहुल आणि रिया कन्सल्टिंगमध्ये आले. मला वाटलं कदाचित कुटुंब नियोजन जाणून ...

Urine disorders in women | स्त्रियांमधील मूत्रविकार

स्त्रियांमधील मूत्रविकार

डॉ. भारती अभ्यंकर
नवीन नवीन लग्न झालेले जोडपं- राहुल आणि रिया कन्सल्टिंगमध्ये आले. मला वाटलं कदाचित कुटुंब नियोजन जाणून घेण्यासाठी, चर्चेसाठी आले असावेत; परंतु रिया मला बरीचशी काळजीग्रस्त आणि आजारी असल्याचे जाणवले. त्यांच्याशी बोलल्यानंतर तिनं आपल्या तक्रारी सांगितल्या. त्या अशा- ओटीपोटात दुखतंय, सारखं सारखं लघवीला होतंय, थोडा ताप, थंडी असंपण होतंय. नक्की काय होतंय तेच समजेना झाले होते तिला. तिच्या एकंदर वर्णनावरून तिला सिस्टायटीस झाल्याचं माझ्या लक्षात आले. सिस्टायटीस म्हणजे लघवीच्या पिशवीचे (व१्रल्लं१८ इ’ंििी१) इन्फेक्शन!
स्त्रियांमध्ये युरिनरी ट्रॅक्ट इन्फेक्शन खूप प्रमाणात दिसतात. युरिनरी ट्रॅक्टमध्ये मूत्रपिंड, मूत्राशय, मूत्रनलिका या अवयवांचा समावेश होतो.
मूत्रपिंड : यापैकी कोणत्याही अवयवांमध्ये जंतू प्रादुर्भाव होतो आणि इन्फेक्शन वाढत जाते.
याची प्रमुख कारणे : १) मूत्राशयाचे विकार असल्यास लघवी करताना कळ येणे, ओटीपोटात दुखणे, लघवी स्वच्छ न होणे, लघवीला दुर्गंध येणे यासारखी लक्षणे दिसतात. २) मूत्रपिंडाचे विकार : मूत्राशयाचा आजार बरा न झाल्यास किंवा त्याची तीव्रता वाढल्यस तो मूत्रपिंडापर्यंत पोहोचतो. वरील सर्व लक्षणांबरोबरच पाठीत दुखणे, ताप येणे, थंडी वाजणे, उलट्या होणे अशी लक्षणे दिसू लागतात.
स्त्रियांच्यामध्येही इन्फेक्शन मूत्रनलिकेद्वारे होते. जंतू सहजासहजी प्रवेश करतात व तेथून त्यांचे मार्गक्रमण सोपे होते. जंतू मूत्रनलिकेमार्फत मूत्राशयात जातात आणि मूत्रवाहकाद्वारे मूत्रपिंडात जातात. त्यामुळे वेळीच निदान होणे आणि त्यावर उपचार होणे खूपच गरजेचे असते.
अनेक प्रकारचे लैंगिक आजार उदा. सिफोलीस (र८स्रँ्र’’्र२) गनोरिया वगैरे अशीच लक्षणे दाखवतात.
मूत्रविकार कोणाला होऊ शकतात?
१) अतिशय कमी पाणी पिणाऱ्या व्यक्ती - साधारणपणे माणसाला दिवसभरात आठ ते दहा ग्लास म्हणजे अडीच ते तीन लिटर पाणी पिणे गरजेचे असते. पाणी जास्त पिल्यामुळे जंतंूचा निचरा होण्यास मदत होते. २) लघवीला खूप उशिरा जाणे म्हणजे लघवी बराच काळ पोटात साचून राहणे - नोकरी करणाऱ्या स्त्रियांच्यामध्ये हा प्रॉब्लेम जाणवतो. कारण नोकरीच्या ठिकाणी शौचालये नीट नसतात. ३) मूतखडे झालेल्या व्यक्तींमध्येसुद्धा इन्फेक्शनचे प्रमाण खूप असते. ४) गरोदर स्त्रियांमध्ये मूत्रविकार जास्त प्रमाणात होतात. ५) ज्येष्ठ स्त्रिया, मधुमेही स्त्रिया, प्रतिकारशक्ती कमकुवत असणाºया स्त्रियांमध्ये मूत्रविकार जास्त प्रमाणात आढळतात.
मूत्रविकाराचे दुष्परिणाम म्हणजे दोन्ही किडनीत हे जंतू पसरतात आणि मूत्रपिंडाचे म्हणजे किडनीचे काम हळूहळू मंदावते व किडनी फेल्यूअर होऊ शकते.
बºयाच वेळा हे जंतू रक्तात मिसळून बाकी अवयवांवर आपला परिणाम दाखवतात व सेप्सिस आणि शेवटी मृत्यूही संभवतो. या आजाराचे निदान साध्यासोप्या लघवीच्या तपासणीतून होते. यामध्ये लघवीतले जंतू आणि त्याबरोबर आढळणाºया दोषांमुळे याचे निदान होते. याची तीव्रता लक्षात येते. यामध्ये दोष आढळल्यास युरिन कल्चर केले जाते. ज्यामुळे नक्की कोणते जंतू आहेत व कोणते औषध त्यांना लागू पडेल ते कळू शकते. अल्ट्रासोनोग्राफीद्वारेसुद्धा नक्की कोणता अवयव मूत्रविकारात बळी पडतोय हे समजते. एकदा निदान झाल्यावर योग्य प्रकारचे प्रतिजैविक वापरून हे इन्फेक्शन आटोक्यात आणले जाते.
एकदा हे इन्फेक्शन होऊन गेले की परत होण्याची शक्यता असते. परत परत जर इन्फेक्शन होत असेल तर त्याला रिकरंट (फीू४११ील्ल३ वळक) इन्फेक्शन म्हणतात. अशावेळी मूत्रविकारतज्ज्ञांचा सल्ला घेऊन याचे कारण शोधावे लागते. अशा स्त्रियांमध्ये मूत्रमार्गाचे काही दोष असू शकतात.
गरोदर स्त्रियांनी या जंतूसंसर्गाबद्दल जागरूक राहणे गरजेचे आहे. कारण हे इन्फेक्शन वाढून वेळेपूर्वी प्रसूती होऊ शकते. मधूमेह असणाºया स्त्रियांनी वरील कोणतेही लक्षण आढळल्यास रक्तातील साखरेचे प्रमाण तपासणे गरजेचे आहे. कारण रक्तातील साखर वाढल्यास जंतूंचा शिरकाव झपाट्याने होतो.
लघवीमधून रक्त जाणे एक चिंताजनक बाब आहे. मुख्य कारण मूतखडा हे असले तरी जंतूसंसर्ग, मूत्रपिंडाचे आजार, कॅन्सर, मूत्रमार्गाला इजा होणे ही कारणे असू शकतात. याशिवाय काही औषधे उदा. अ‍ॅस्पिरीन, हिपॅटीन आदींमुळेसुद्धा लघवीतून रक्त जाऊ शकते. अधिक व्यायामसुद्धा यासकारणीभूत ठरतो.
(लेखिका कोल्हापुरातील स्त्री रोग व
प्रसूतिशास्त्र तज्ज्ञ आहेत.)

Web Title: Urine disorders in women

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.